आजच WA वर "vitamin N" असा काहीतरी व्हिडीओ पाहिला. मुलांना "नाही" ऐकायची सवय लावा वगैरे वगैरे; कुठलेतरी फॉरेनचे काका सांगत होते म्हटल्यावर आपल्याकडचे लोक आवर्जुन शेअर करणार. आमच्यासारखे पालक मुलांनी काही मागायच्या आतच नाही म्हणून मोकळे होतात आणि बरेचसे भारतीय पालक मुलांना फक्त नाहीच ऐकवतात हे त्या काकांना माहित नसावं बहुधा.
तर हे "नाही" म्हणण्यावरून इथे आल्यानंतरची पहिली मॉल व्हिजिट आठवली. लेक तसा लहान होता तेव्हा आणि भारतीय विचारसारणीचाही होता (आता जर्मन रुलबुक घेऊन फिरतो आणि आम्हा दोघांना शिकवत राहतो ती गोष्ट वेगळी). इथे शनिवारीच काय असेल नसेल ती खरेदी करावी लागते; रविवारी एकही मॉल अथवा दुकान उघडं नसतं. सुट्टी म्हणजे सुट्टी. शनिवारी आम्ही आपले मॉल फिरायच्या उद्देशाने बाहेर पडलो. तर लेकाने ट्रेनमध्येच भुणभुण सुरु केली. " मग तिथे तु मला काय घेऊन देणार ते सांग तरच मी येतो." मी म्हटलं " तु चल तर मग बघु ". पण त्याने तिथे जाईपर्यंत भुणभुण चालुच ठेवली. शेवटी मी रागावलेच त्याला. मग जरा शांत बसला. पण आम्हा मायलेकाचा हा प्रेमळ संवाद ऐकून ट्रेनमधील जनता भारावून गेली.
त्या मॉलमध्ये स्टेशनवरून आत जायचा रस्ता एका मोठ्या दुकानातून जातो. आणि बरोबर तिथेच त्यांचं खेळण्यांचे सेक्शन आहे. झालं, आम्ही आत शिरलो कि लेकाला खेळण्यांचे सेक्शन दिसलं आणि तो तिकडेच धावला. हेच घ्यायचं, तेच घ्यायचं, नाहीतर मी पुढे येतच नाही, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीला "नाही" एवढंच म्हणत होतो. त्याला जरा समजावलं की सध्या तु इथून चल आपण जाताना बघु. कसंतरी निघाला तो तिथुन. पण पुढे मी ज्या ज्या दुकानात जात होते त्या प्रत्येक दुकानात त्याने अक्षरशः जीव नकोस केला.
शेवटी माझ्या सहनशक्तीच अंत झालाच आणि मी जरा जोरात त्याला रागावले आणि थोडा हात उगारल्यासारखं केलं (माझं नशीब जरा बरं असावं त्या दिवशी म्हणून मी त्याला धपाटा नाही घातला पाठीत, नाहीतर..). त्याने लगेच रडायला सुरुवात केली म्हणुन आम्ही एका ठिकाणी बसलो आणि त्याला शांत करायला लागलो तर आम्हाला दिसलं की एक पोलीस मामा आमच्याकडेच पाहत आहेत. आम्हा दोघांची जाम टरकली. म्हंटल कोणी कंप्लेंट केली की काय आमची. इकडच्या लोकांचं काही सांगता येत नाही. इथले कायदे पण भारी आहेत. "मुलांना मारायचं नाही" हा कायदा आहे. त्यासाठीही तुम्हाला शिक्षा होते. रस्त्यावर जर एखादे आजोबा/आजी चुकून चालताना पडले किंवा कोणाचा तरी ऍक्सीडेन्ट झालाय आणि तुम्ही तिथे असाल आणि तुम्ही त्यांना मदत केली नाही तर तुम्हाला कायद्याने शिक्षा होते.
आम्ही आपलं घाबरलेल्या अवस्थेत कसंतरी लेकाला समजावलं आणि तिथून पोबारा केला. स्टेशनवर पोहोचलो तर नेमकी ट्रेन आताच गेलेली आणि पुढची ट्रेन यायला १० मिनिट. तिथे बसलो तर पोलीस मामा तिथे आले. त्यांची संशयित नजर आमच्यावर रोखलेली आणि त्यात लेकाची भुणभुण सुरूच. त्यात पुन्हा नवऱ्याचं अजून तिसरच, "तरी मी तुला सांगत असतो, त्याच्यावर चिडत जाऊ नकोस, तू ऐकशील तर शपथ." आता जर का लेक सतत तुमच्या कानाशीच "आई, आई" करत असेल तर आणि पूर्ण मॉलभर तुमच्या जॅकेटला (ओढणी नसल्यामुळे) पकडून मागमागे भुणभुणत हिंडत असेल तर कितीवेळ पेशन्स टिकणार, नाही का?
मी आपला मनात देवाचा धावा करत होते "देवा पोलीस मामाला इथून घेऊन जा रे बाबा". पण कर्माची फळं इथेच भोगावी लागतात म्हणे त्यामुळे देवही धावला नाही. आणि पोलीस मामाच आले धावून.. म्हणजे ते न राहवून आले जरा आमची विचारपुस करायला. त्यांनी सरळ लेकालाच जर्मन मधून प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण पुन्हा माझं नशीब आडवं आलं, लेकाला तेव्हा जर्मनचा ज पण येत नव्हता.. हुश्श.. नाहीतर आईच्या पापांचा पाढा वाचला असता त्याने जर्मनमध्ये. असो.
पोलीस मामाना इंग्लिश फार चांगली येत नसल्यामुळे कसबसं तोडकंमोडकं "Is everything okay?" असं लेकाला त्यांनी विचारलं. आणि आमच्या सुपूत्रांनी त्या वेळी अक्षरशः आमच्यावर उपकार केले आणि म्हणाले " yeah fine." आम्ही कानात प्राण आणुन ह्याच उत्तराची वाट पाहत होतो दोघे, कारण जर लेक नाही म्हणाला असता तर पुढे काय झाले असते ते पोलिस मामाच जाणे. इथे मुलांना आधी विचारतात, आईबापाला नाही. मुलांनी आईबाप चांगले आहेत हे एकदा अप्रूव्ह केलं की "कोई माईका लाल आईबापको बुरा नाही बोल सकता!!" लेकाच्या उत्तराने समाधान होऊन पोलिसमामा शेवटी त्यांच्या वाटेने निघुन गेले आणि आम्ही "वसुदेव व देवकी" होता होता वाचलो.
तर इथे मी फार मोठा धडा शिकले कि मुलांचा कितीही राग आला तरी पब्लिक प्लेसमध्ये हसत हसत मराठीत रागवायचं किंवा मुलगा आणि त्याचे बाबा हे आपल्याबरोबर नाहीतच असं समजायचं, जमतं ते!! आई मुलांना रागावणार नाही, असं कधी होत असत का??
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #rajashrismunichdiaries
२ टिप्पण्या:
"वसुदेव व देवकी होता होता वाचलो..." Awesome ��������
मनपूर्वक धन्यवाद! :)
टिप्पणी पोस्ट करा