गुरुवार, १० जानेवारी, २०१९

Let it snow

दोन दिवस झाले बर्फवर्षाव चालूच आहे. कालपासुन जरा जोर वाढला आहे आणि तापमान पण -२ आहे. रात्री आकाशाचा रंग हलका केशरी वाटत होता बर्फ पडत असताना. सगळीकडे कापूस पिंजून ठेवल्यासारखा पांढराशुभ्र बर्फ, खिडकीतून बाहेर पाहिल्यावर दिसणारा मोत्यासारखा बर्फवर्षाव, जाडजूड जॅकेट्स, टोप्या, बूट, हातमोजे  घालून एवढ्या बर्फातही शाळेत जाणारी मुलं, जपून पावलं टाकणारे आजी आजोबा, लगबगीने ऑफिसला जाणारे लोक. इतक्या बर्फातही जनजीवन बऱ्यापैकी सुरळीत चालू असतं.

आत्ताही हे सगळं लिहिताना बाहेर पडणाऱ्या शुभ्र मोत्यांवरून नजर हलत नाहीये.आपल्याकडे श्रावणात पाऊस पडून गेल्यावर निसर्गसौंदर्य बघताना आपसूक मनात "हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे" येऊन जातं. तसं इथे "Since we have no place to go. Let it snow, let it snow, let it snow" म्हणावं वाटतं.




























सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

चष्मेबद्दुर

इथे आल्यापासून सोप्या गोष्टी अवघड आणि अवघड गोष्टी सोप्या वाटायला लागल्या आहेत. म्हणजे भारतात जी कामं पटकन होतात त्या कामांना इथे काही दिवस ते महिने लागतात. उदाहरणच द्यायचे झाले तर डॉक्टरची अपॉइंटमेंट, चष्मा खरेदी इत्यादी आणि ज्या गोष्टी अवघड वाटायच्या जसं कि सिटी बसने गर्दीत प्रवास, टु व्हीलर शिवाय पान न हलणे वैगरे इथे एकदम सोपं आहे; बस, ट्राम, मेट्रोचा प्रवास सोपा आणि सुखकर आहे.

बाकी सगळ्या गोष्टींमध्ये घरात माझा कितीही वरचष्मा असला तरीही चष्मा खरेदी किंवा चष्मा ह्या विषयावर मी घरात चष्मेवाल्यांबरोबर बोलणे किंवा मत प्रदर्शित करणे म्हणजे आ बैल मुझे मार आहे. मला नसलेला चष्मा ह्याला कारणीभूत आहे!  तर चष्मा खरेदी आणि चष्मा दुरुस्ती म्हणजे डोळे दाखवून अवलक्षण आहे इथ! पुण्यातल्या सारखं इथेही बरचसे दुकानदार आणि तिथे काम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असतं "इथे अपमान करून मिळेल"!!

चष्मा खरेदी

आपण आपलं दुकानात जातो चष्म्याची आवडलेली फ्रेम घेतो आणि नंबर वाला कागद दुकानदाराला देऊन ३-४ दिवसात किंवा जास्तीत जास्त आठ दिवसात चष्मा आणतो. पण इथे तसं अजिबात नाहीये बरं; कमीत कमी आम्ही ज्या दुकानात गेलो तिथे तरी. आम्ही त्या दुकानात साधारण संध्याकाळी साडेपाच सहाला गेलो. मोठं होतं बऱ्यापैकी. आजूबाजूच्या भिंतीवर लाकडी रॅक्स मध्ये फ्रेम्स ठेवलेल्या होत्या. दुकानात अलीकडे छोटस काउंटर आणि पुढे ७-८ टेबल्स आणि त्याच्याभवती खुर्च्या. एखाद्या कम्पनित मुलाखतीला आलोय कि काय वाटायला लागलं. कारण आम्ही आत गेल्यावर त्यांनी आम्हला एका टेबलाजवळच्या खुर्च्यांवर बसायला सांगितलं आणि आमचा माणुस येईलच म्हणे बोलायला. अरे भाऊ त्यात काय बोलायचं असतं नक्की?


म्हटलं अरे दादा आम्हाला फ्रेम बघायची आहे चष्मा करायला तर म्हणे बसा हो. १० मिनिट वाट बघावी लागली तर ज्युनिअर चष्मेवाल्याने त्याला कसा चष्मा नकोय आणि आपण घरी जाऊ ह्यावर आमची शाळा घेतली. शेवटी एक पोरगेलासा इसम आमच्याशी बोलायला आला आणि म्हणाला तुम्ही फ्रेम पसन्त केली का एखादी? म्हटलं आम्हाला सांगितलंच नव्हतं तर तो आमच्याकडे "कौन है ये लोग? कहासे आते है ये लोग?" वाला लूक देऊन पाहायला लागला. पटकन उठून ज्युनिअर चष्मेवाल्यासाठी आवडेल अशी फ्रेम सिनियर चष्मेवाल्यानी ठरवली. माझा काहीच वरचष्मा नाहीये म्हटलं ना!!

आता फ्रेम घेतल्यावर झालं आता घरी जायचं असं वाटून ज्युनिअर चष्मेवाले खुश झाले. लेकिन पिक्चर अभी बाकी था. मग त्या पोरगेलेश्या इसमाने आम्हाला  पुन्हा त्याच टेबल खुर्च्यांवर नेले. त्याच्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या उपकरणांनी त्याने आधीची फ्रेम आणि नवीन फ्रेम तपासली. नवीन फ्रेम तीन चार वेळा चिरंजीवांना घालायला लावून कानाच्या मागे नीट बसली आहे का? नाकावर व्यवस्थित आहे का? अँगल नीट आहे का वगैरे चेक केलं. काचा कश्या हव्यात., अश्या घ्या तश्या नका घेऊ वगैरे वगैरे. हे सगळे सोपस्कार करून तो म्हणाला बसा थोडा वेळ मी आलोच. एव्हाना तासभर होऊन गेला होता.

पुन्हा चिरंजीवांनी औरंगाबादलाच चष्मा घेणं कसं योग्य आहे ह्यावर आमची शाळा घेतली. तेवढयात एक आजोबा तिथे आले ज्यांना इंग्लिश बोललं तर चालेल का विचारल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला "नाही" म्हणाले त्याला तोड नव्हती. पुन्हा त्यांनी वेगवेगळे कागदपत्र आमच्याकडून भरून घेतले आणि स्वतः पण भरले. घर खरेदीला गेल्याचा फील आला हो.

दोन तासांनी आम्हाला चष्मा कसा तयार होईल ह्याचा साक्षात्कार झाला. चष्मा कधी मिळेल विचारल्यावर "एक महिन्याने" असं जेव्हा आजोबा म्हणाले तेव्हा चक्क सिनियर चष्मेवाल्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. एकंदर डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला एक महिना आणि चष्मा मिळायला एक महिना असं मिळून चिरंजीवाचा डोळ्यांचा नम्बर नक्की काय होईल ह्याविषयावर चक्क आम्हा दोघांचं एकमत झालं.

माझ्या सहनशक्तीचा अंत पहिल्या दहा मिनिटातच झाला होता हे वेगळं सांगायला नकोच!

चष्मा दुरुस्ती

तर कसाबसा चष्मा महिन्याभराने मिळाला आणि त्यानंतर चिरंजीवांना तो पंधरा दिवसातच ढिला व्हायला लागला. त्याला म्हटलं चल जाऊ आपण नीट करून आणायला तर मागच्या अनुभवावरून शहाणा होत नाही म्हणाला आणि पुन्हा त्याचं आजकालचे पालुपद त्याच्याजवळ होतेच "मॉल मध्ये गेलं कि तू खूप दुकानांमध्ये जातेस".

मग मनाची तयारी करून आम्ही पुन्हा त्याच दुकानात गेलो. मी गेल्या गेल्या काउंटर मागच्या माणसाला नेहमीप्रमाणे इंग्लिश बोललं तर चालेल का असं विचारल्यावर त्याच "नाही" म्हणजे " आ गये मुह उठाके" वाटलं. मग मी मोडक्यातोडक्या जर्मन मध्ये "चष्मा नीट करून देताल का प्लिज" विचारलं. प्लिज ह्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे इथे.
तर तो "तुमचा आहे का चष्मा?"
मी "नाही माझ्या मुलाचा आहे."
तो "चष्म्यातला मुलगा कुठंय?"
मी "मुलगा कशाला पाहिजे? चष्मा नीट करून द्या ना प्लिज!"

ह्यावर त्याने चष्मा नीट करायला ज्याचा चष्मा आहे तो माणूस कसा गरजेचा असतो ह्यावर माझी जर्मन भाषेत यथोचित शाळा घेतली आणि चडफडत चष्म्याचे स्क्रू टाईट केले. मग जवळच असलेल्या छोट्या बेसिन मधील दोन प्रकारच्या लिक्विड्स मध्ये दोन वेळा चष्मा बुडवून स्वच्छ करूनच माझ्या जवळ दिला. निघतांना पुढच्या वेळी चष्म्यामधील मुलाला नक्की घेऊन या हि तंबी दिली!

आणि सिनिअर चष्मेवाल्यानी हे सगळं पाहून "औरंगाबादलाच गेल्यावर माझा चष्मा करूयात" असं म्हटल्यामुळे माझ्या डोक्यावरचा मणामणाचा भीतीचा चष्मा उतरला!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 



Featured post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

सौंदर्य


इथे मेट्रोने प्रवास करताना दरवेळी एक से एक अनुभव येतात. त्यातले काही अगदी न विसरता येण्यासारखे असतात. 


आता परवाच किराणा सामान आणायला इंडियन स्टोअरला निघाले होते. माझ्यासमोरच्या सीटवर एक मूर्तिमंत कि काय म्हणतात ते सौंदर्य बसलेलं होतं. नजर हटतच नव्हती चेहऱ्यावरून. अत्यंत अप्रतिम अशा केशरचनेत बांधलेले केस, रेखीव भुवया आणि बोलके डोळे, चाफेकळी नाक, जबरदस्त फीचर्स होते. चेहऱ्याला हलकासा मेकअप. अगदी मेंटेन्ड बांधा आणि तिला शोभेल असा पोशाख. गळ्यात मोत्याची नाजुकशी माळ, कानात मोती, हातात त्याच मोत्यांचे ब्रेसलेट. मंद अशा अप्रतिम परम्युमचा दरवळत असलेला सुगंध. माझं हे सगळं निरीक्षण चालू असताना तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, ओशाळले ना मी. पण सावरून बसत तिला स्माईल दिली. तिने दिलेली दिलखेचक स्माईल मी विसरूच शकत नाही. तितक्यात त्या सौंदर्यवतीचे स्टेशन आले आणि मला चक्क बाय करून ती निघूनही गेली. 


मनात आलं हिच्या वयाची होईपर्यंत मी जगले तरी खूप झालं.... ८० वर्षांच्या आज्जी होत्या त्या!


ह्या आज्जीना पाहून माझ्या आजी (आईची आई) आणि आजीसासूबाई आठवल्या. दोघीही इतक्या सुंदर आणि सोज्ज्वळ दिसायच्या ना कि बघतच राहावं. 


आजीसासूबाई एकदम उंचापुऱ्या, सडसडीत, गोऱ्यापान. कोणत्याही रंगाचे नऊवार इतकी मस्त दिसायची ना त्यांना. मी लहान असतांना रोज त्या मंदिरात जायच्या तेव्हा त्यांना बघायचे. चापुनचोपुन नेसलेली नऊवार, हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, छानसा अंबाडा, कधीकधी त्यावर लावलेलं एखादं फुल. 


माझी आजी म्हणजे पुलंच्या भाषेतली सुबक ठेंगणी. ती जेव्हा सकाळी तिची वेणीफणी करायची तेव्हा मला तिला बघायला फार आवडायचं. तिचा तो स्पेशल डबा ज्यात तिची फणी, आरसा, कुंकू, मेण वगैरे असायचं. छान अंबाडा घालून त्यात आकडे वगैरे लावून झालं की कपाळावर मेण लावून अप्रतिम गोल गरगरीत कुंकू रेखायची. तिच्या चेहऱ्यात फार गोडवा होता. 


दोघींच्याही चेहऱ्यावरचे शांत आणि सात्विक भाव जसं कि देव्हाऱ्यातली समईच जणु! 


तशी सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतच असते त्यामुळेच सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यातच असतं म्हणतात हो ना?? पण हे आज्जी लोकांचं सात्विक सौंदर्य बघायला नजर मात्र नातीचीच हवी हं!!



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

आशिर्वाद

                                                          
        त्या दिवशी मोदक करायला घ्यायच्या आधी हात आपसूक फोनकडे गेला. आईला फोन लावला तर वडील म्हणाले ती गणपती मंदिरात गेलीय. मला सांग तुझं काय काम आहे तिच्याकडे. मी म्हट्लं " काही नाही मोदकासाठी किती रवा घ्यायचा ते विचारायचं होतं तिला." तर हसायला लागले आणि म्हणाले कि ती आल्यावर सांगतो तिला फोन करायला.

       दरवर्षी मोदक केलेले असतात तरीही आईला विचारून केल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास येतो कि अजिबात बिघडणार नाहीत. यथावकाश रवा भिजवला, सारण बनवलं, मोदक केले आणि आईचा फोन आला.

"झाले का ग मोदक? बरोबर घेतलास कि रवा, मोहन घातलस ना?" वगैरे वगैरे.

       तिकडे म्हणजे पुण्यात होते तेव्हा प्रत्येक सणाला सासूबाई सोबत असायच्याच. एखाद्या विद्यार्थिनीप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच केलेली असायची त्यामुळे बिघडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. पण इथे आल्यापासून सणावाराला आईला नाहीतर सासूबाईंना हमखास फोन होतोच. ४-५ लोकांसाठी पुरण किती घालायचं, पंचामृतामध्ये चिंच गुळाचं प्रमाण किती, एक नाही दहा. एकदा तर मी माझा मावशीला पुरणाला चटका देताना फोन करून हैराण केलं होतं आणि तिनेही तिच्याकडे गौरीजेवणाची गडबड असताना मला सगळ नीट समजावून सांगितलं. खरंतर सगळं प्रमाण माहित असतं, सगळे पदार्थ दरवर्षी बनवलेले असतात पण त्यांना विचारून केल्यावर खरंच आत्मविश्वास येतो.


      लहानपणीपासून वाटायचं कि आशिर्वाद म्हणजे नेमकं काय? आता विचार केला कि वाटतं कि मोदकासाठी आईला फोन केल्यावर तिने दिलेला आत्मविश्वास आणि बिघडणार नाही ह्याची दिलेली शाश्वती, पुरण करताना सासुबाईंनी नीट समजावून सांगितलेलं प्रमाण आणि कृती, शेअर मार्केट मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट वर वडलांनी दिलेले सल्ले आणि शेअर मार्केट संबंधी नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिलेली प्रेरणा, कार शिकत असताना सासऱ्यांनी दिलेले धडे आणि दिलेलं प्रोत्साहन, नवीनच लिहायला सुरुवात केल्यावर दादाने दिलेली शाबासकी आणि त्याचे "लिहीत रहा" म्हणणे, ह्यालाच मोठ्यांचे आशिर्वाद म्हणत असतील! हो ना?   


PC Google


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक







गाणं

एखादया दिवशी नाही का सारखं सारखं एकच एक गाणं डोक्यात राहतं पण त्याचे बोल आठवत नाहीत किंवा कोणत्या सिनेमा मधलं आहे ते आठवत नाही. अगदी तसंच आज सकाळपासून एक गाणं सारखं मनात येत होतं. कुठे ऐकलं तेही आठवत नव्हतं. पण राहुन राहुन मनात तेच तीन शब्द पिंगा घालत होते. बरं पुढचे बोलही आठवत नव्हते कि त्या गाण्याचा सिनेमा.

सकाळी स्वयंपाक करायला लागल्यापासून ते आत्ता थोड्यावेळापुर्वी चारचा चहा करण्यापर्यंत फक्त तीन शब्द, तेही तालासुरात. विचार करून डोकं बधिर झालं आणि मी त्या गाण्याचा शोध लावायला अधीर झाले पण ते गाणं काही दाद देत नव्हतं. त्या तीन शब्दांनंतरची एखादी ओळ तर आठवावी; पण शपथ. जीव खाल्ला त्या गाण्याने.

मी चार वाजायच्या थोडं आधी चहा टाकला आणि सासूबाईंसोबत टीव्ही पाहत बसले तर अचानक "युरेका" झाला ना! बरोब्बर ४ वाजता टीव्हीवर ते तीन शब्द असलेलं गाणं सुरु झालं एकदाचं! और फिर मुझे समज में आया की अर्रर्रर्र हि तर मराठी मालिका आणि त्याच मालिकेच्या शीर्षक गीतातले तीन शब्द माझ्या डोक्यात (गेलेले) होते सकाळपासून. भारतीय वेळेनुसार इथे सगळ्या मराठी मालिका दिसतात.

ओळखलं का तुम्ही?
.
.
नाही?
.
.
सांगूनच टाकते आता
.
.
"तुझ्यात जीव रंगला!"

आता पुढचं गाणं मला पुर्ण पाठच होईल बहुतेक थोड्या दिवसात!


#मराठी_मालिका


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

गर्दी

मागच्या शनिवारी दुपारी बाहेर निघालो असताना गेटच्या बाहेर पडलो अन समोर हे एवढी मोठी गर्दी. आपल्याकडे गणपतीत असते तशी किंवा दिवाळीच्या खरेदीला असते तशी नाही काही. पण इथल्या हिशोबाने गर्दीच. ती गर्दी बघून इथे नवीनच आल्यावरचा किस्सा आठवला.

इथे नवीनच राहायला आल्यावर असच एके शनिवारी फिरायला बाहेर पडलो होतो आणि तर बाहेरच्या प्रचंड मोठ्या गर्दीने भांबावून गेलो. तसे आमच्या गेटच्या उजव्या बाजूलाच एक छोटा बार आणि रस्ता क्रॉस करून समोरच जरा मोठा बार आहे. ह्या दोन्ही बारच्या समोर मोठमोठे घोळके करून लोक प्रचंड थंडीत भयंकर थंड अशा बिअरचा आस्वाद घेत होते. सगळ्या वयोगटातले लोक दिसत होते. लहान मुले सोबत असेलेले लोक बारमध्ये जाता आमच्या गेटसमोरून पुढे जात होते. बाकी आजोबा, पणजोबा, आज्जी, पणजी, काका, काकु वगैरे प्रकारचे लोक बारसमोर निवांत टाईमपास करत होते. आमच्या घराच्या जवळपास असलेले छोटे छोटे रेस्टारंट्स,बेकऱ्या गर्दीने अगदी फुलून गेले होते.

इथे आल्यावर आमच्या समोरच्या रस्त्यावर इतके लोक मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे माझी वाचाच बसली. सवय नाही हो गर्दी वगैरे बघायची. सगळ्या ट्राम्स, बसेस आणि अंडरग्राउंड ट्रेन्स मधून लोक एका विशिष्ट दिशेला निघाले होते. सगळ्यांच्या पोशाखात एक खास निळ्या रंगातील गोष्ट होती. टीशर्ट, स्कार्फ, किंवा टोपी ह्यातलं काहीतरी त्या खास रंगाचं होत. तशाच प्रकारचे झेंडे सुद्धा होते लोकांच्या हातात. मला काहीच समजेना नक्की काय चाललंय ते. वाटलं नक्कीच कुठल्या तरी नेत्याची सभा आहे.

गर्दी ज्या दिशेला चालली होती आम्ही पण तिकडेच निघालो. हळुहळू प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसायला लागला. नक्की पन्नासेक गाड्या होत्या पोलिसांच्या. शेकडो पोलीस रस्त्यावर फिरत होते. दोन चार ऍम्ब्युलन्स, एक दोन फायरब्रिगेडच्या गाड्या. आता मात्र माझी खात्रीच झाली कि सभाच आहे म्हणून. तसं मी ह्यांना बोलून पण दाखवलं. पण म्हटलं सभा असेल तर सगळीकडे प्रचंड प्रमाणात फ्लेक्स लावलेले हवे होते. सभेच्या जागी नेत्यांचे कटाऊट्स वगैरे. म्हटलं छे! काय हे लोक. एवढी गर्दी खेचण्याचे सामर्थ्य असलेल्या नेत्याचा साधा एक फ्लेक्स नाही. भारतीय मनाला पटतच नव्हतं ना!

आम्ही आपलं गर्दी जाईल तिकडे चाललो होतो. बरं एवढी गर्दी होती पण ना गोंधळ, ना गोंगाट, ना धक्काबुक्की, ना किळसवाणे स्पर्श, ना अरेरावी. असं कुठं असतंय होय? मला वाटलं मी नक्कीच स्वप्न पाहतेय. पुढे गेल्यावर एक मोठ्ठा साक्षात्कार झाला. स्टेडियम आहे हो इथे. फुटबॉलची मॅच होती त्या दिवशी! त्यामुळेच एवढी प्रचंड गर्दी, एवढा पोलीस बंदोबस्त!

फुटबॉल धर्म आहे इथला आणि त्यात १८६० म्युनिच नावाच्या टीमची मॅच म्हणजे काही विचारायलाच नको. कोणत्या टीमसोबत मॅच होती तेही कळलं नाही कारण त्यांचे फॅन्स नसल्यातच जमा. मॅच संपल्यावर १८६० टीम जिंकली किंवा हरली तरीही पोलिसांची गरज पडते इथे. आम्ही अनुभवलं आहे. मॅच सम्पली कि पुन्हा सगळी गर्दी आमच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर बिअरच्या बाटल्या घेऊन फिरत असते. १८६० जिंकली असेल तर उत्साह बघण्यासारखा असतो गर्दीचा. एखादा घोळका मस्त गाणी म्हणतो. कोणीतरी फ्लॅशमॉब सुरु करतात. रात्री उशिरापर्यंत त्यांचं सेलिब्रेशन चालू असतं. एरवी अगदी शिस्तीत वावरणारे लोक त्या गर्दीचा हिस्सा झाले कि ट्राम्सच्या, बसेसच्या समोरच फतकल मारून बसतात नाहीतर रस्त्यावर बाटल्या फोडतात. पोलीस मग समज देऊन लोकांना रस्त्यावरून बाजूला करतात. तोपर्यंत ट्राम किंवा बस जागची हालत नाही त्यामुळे ट्रॅफिक जॅम. स्टेडियम आमच्या घरापासून साधारण एखादा किलोमीटर असेल पण गोल झाला कि तिथल्या जल्लोषाचा आवाज थेट घरात येतो. रात्रीच्या वेळी मॅच असेल तर तिथले फ्लड लाईट्स दिसतात घरातून.

असं काही इथे होत असेल ह्यावर विश्वासच बसत नव्हता. आम्हाला हे सगळं बघून धक्क्यावर धक्के बसत होते. ह्या धक्क्यामुळे आमची अवस्था जाना था जपान पोहोच गये चीन झाली. जायचं होतं एका दुकानात गेलो तिसऱ्याच दुकानात. घरी आलो तर तोच गोंधळ. रात्री उशिरापर्यंत गाणे, गोंगाट चालू होता. जिथे रात्री सात नंतर टाचणी पडली तरी आवाज होऊन शेजारच्या लोकांना त्याही आवाजाचा त्रास होईल असं वाटत होतं तिथे असा गोंधळ बघून जाम मजा वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी ठिकठिकाणी बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. प्रचंड प्रमाणात सिगरेट्सची थोटकं सगळीकडे विखुरलेले होती.  

पण ही मॅच अधूनमधून असावीच असं वाटत राहतं कारण उत्साहाने गर्दी करणारे लोक आजूबाजूला तेव्हाच दिसतात आणि कसं का होईना आपण माणसातच राहतो ह्याची म्यूनिचमधे खात्री पटते!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

PC Google




शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

वेड सिरीजचे

तिच्या मोबाईलच्या गॅलरीत सापडलेला एक फोटो पाहुन...
तो: (अतीच भीषण काहीतरी बघितल्यासारखा चेहरा करून) हा फोटो कुठून डाउनलोड केलास आणि कशासाठी?
ती: (चित्रविचित्र जोक्समध्ये आलेले फोटोज आपण नक्की डिलीट केले आहेत ना? असा विचार करून) कोणता रे?
तो: (काय आहे हे?हिचं नक्की काय चाललंय? चेहरा) डिलीट करतोय मी. btw तु सांगितलंच नाहीस, कुठून डाउनलोड केलास आणि कशासाठी?
ती: (आमच्या तीर्थरुपांनी आम्हाला कधी विचारलं नाही आणि हा काय तोंड वर करून विचारतोय?) कुठून का करेना... तुला काय करायचं आहे? मला आवडला मी केला. अजिबात डिलीट करायचा नाही सांगून ठेवते.
तो: (तीर्थरूप मोड मध्ये ) अगं खरच... this is not good. असे फोटो ठेवणं बरोबर नाही.
ती: (आता बास झालं.. जास्त डोक्यात जाऊ नकोस मोड) अरे पण तु कशाला लक्ष देत आहेस? relax... काहीही होत नसतं अश्या फोटोमुळे आणि मला आवडतो तो.
तो: (तीर्थरुपांचे तीर्थरूप मोड) पण हे अजिबात बरोबर नाहीये.. एखाद्या गोष्टीमध्ये इतकं involve होणं. चांगलं नसत ते. मी डिलीट करणारच आता.
ती: (अपनी माँ से बहस करता है?) तू जर हा फोटो डिलीट केलास ना तर तुला माझा मोबाईल यापुढे गेम खेळायला अजिबात मिळणार नाही लक्षात ठेव!
तो: (ईसका कुछ नही हो सकता.. चेहरा ) अगं पण आई... you are impossible!
इतका वेळ शांतपणे आई-लेकराचा प्रेमळ सुसंवाद ऐकत असलेला ..
बाबा तो: (विजयी हास्य करून) करून टाक रे डिलीट!
ती: देवा काय दिवस आलेत रे? (पुन्हा एकदा जॉन स्नो चा बळी घेताय. लक्षात ठेवीन मी! )
बाबा तो: (इथे लोक मुलांवर संस्कार कसे करावे, त्यांच्याशी टीनएज मध्ये कसे वागावे इत्यादींवर पुस्तकं लिहीत आहेत.. आणि ही ... असो.आपलीच बायको अन आपलाच लेक!) हे सगळं मनातच बरं!
ती: (आता फोटो पुन्हा शोधावा लागेल..) मनातच!

PC Google

#GOT गेम ऑफ थ्रोन्स 

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

मन तळ्यात...

मागचे चार पाच महीने कसे गेले कळलंच नाही. दोन्ही आई बाबा सोबतचा वेळ कापरासारखा पटकन उडुन गेला. आमचे चिरंजीव तर "सातवे आसमान में" म्हणतात तसे वागत होते. दोन्ही आजी आजोबांसोबत त्याने मस्त वन डे ट्रिप्स एंजॉय केल्या.

आम्ही जर्मनीच्या ज्या भागात राहतो तो म्हणजे बायर्न; ज्याला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलेलं आहे. इथल्या लोकांनी ज्या आत्मीयतेने हा निसर्ग सांभाळला आहे त्याला तोड नाही!

कुठेही कागदाचा कपटाही नजरेस पडत नाही. स्वच्छ, सुंदर, रमणीय निसर्ग. वसंत ऋतु सुरु झाला की झाडांना नवीन पालवी फुटते, वेगवेगळ्या झाडांवर रंगीबेरंगी फुलं आणि फुलपाखरं बागडायला लागतात. जिथे जाऊ तिथे हिरवीगार झाडे, निळेशार आणि नितळ तलाव आणि जवळच एखादा किल्ला किंवा चर्च. रेल्वेतून जाताना दिसणारी टुमदार युरोपिअन शैलीची घरे असणारी गावं, बाजूने वाहणारी नितळ नदी. स्वप्नवत प्रवास असतो सगळा. कितीही लांबचे अंतर असले तरी आपण हरखुन गेलेलो असतो बाहेर बघताना.

म्युनिच पासून २-४ तासाच्या अंतरावर २-३ भुईकोट किल्ले, ७-८ मोठे मोठे तलाव, जर्मनीमधील सर्वात उंच शिखर असे बरेचसे सुंदर ठिकाणं आहेत जे आपण एका दिवसात फिरून येऊ शकतो. ह्या सगळ्यात माझं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे" किंग्ज लेक" जर्मन मध्ये ह्याला konigsee असं म्हणतात. म्युनिचहुन ह्या लेकला जाणे म्हणजे तसा जरा द्रविडीप्राणायामच आहे. इथून एका ट्रेन ने दीड तास अंतरावरच्या एका स्टेशनला जा तिथून दुसरी छोटी ट्रेन पकडून एका बर्चटेसगाडेन नावाच्या स्टेशनवर उतरा आणि पुन्हा तिथून बस पकडुन किंग्ज लेकला जा. हा जो छोट्या ट्रेनचा प्रवास आहे ना त्यात इतकी सुंदर गावं दिसतात कि वाटतं इथेच उतरावं! आजूबाजूला मोठी मोठी कुरणं आणि त्यात चरणार्या गायी, छोटे छोटे हिरवेगार डोंगर, टुमदार घरं; त्या घरांच्या गॅलरीत असलेली बहुरंगी मनमोहक फुले आणि खळाळत वाहणारी नितळ नदी. अहाहा!

पुढे बसमधून उतरल्यावर आजूबाजूला फक्त डोंगर दिसतात. इवले इवले पांढरे ढग त्यांच्यावर उतरलेले असतात. स्वच्छ सूर्यप्रकाशात डोंगराचे कडे चमकत असतात. कुठे कुठे अजूनही न वितळलेला चुकार बर्फ डोंगरांच्या कडांवर, शिखरावर अधिराज्य गाजवत असतो. एक नागमोडी रस्ता आपल्याला त्या तळ्याच्या काठी घेऊन जातो आणि समोर तळ्याचा छोटासा भाग दिसत असतो आणि आजूबाजूला डोंगर असतात. वाटतं अरेच्या फक्त हेच आहे का तळं? पण ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना.. wait for it. तसं काहीसं बोटीतुन तळ्याची सफर करताना वाटतं.

त्या शंभर वर्ष जुन्या बोटीतून एका बेटापर्यंत जाताना पाण्याचा रंग नक्की कसा आहे हा विचार करत असताना आजूबाजूच्या डोंगरांमध्ये असलेली झाडं आणि धबधबा लक्ष वेधून घेतात. बोटीतून प्रवास करताना ह्या लोकांनी एक अप्रतिम जागा शोधलीये जिथे बोट आली की डोंगराच्या जरा जवळ थांबते आणि बोट चालवणाऱ्या काकांचे सहकारी काका दरवाज्यात उभे राहून अप्रतिम ट्रम्पेट वाजवायला सुरुवात करतात. आपण विचार करत राहतो ते छान वाजवत आहेत कि त्या सुरवटींचा डोंगरातून येणार प्रतिध्वनी जास्त छान आह? पाच ते दहा मिनिटांचा हा सुरांचा सोहळा सम्पुच नये वाटतं!

बोट दोन डोंगरांच्यामधून प्रवास करत असते आणि समोर दिसणाऱ्या निसर्गाच्या अविष्कारावरून नजर हटत नाही. डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे बेट त्यावर असलेलं चर्च, हिरवीगार झाडे आणि निळे, हिरवे नितळ पाणी असलेले तळे. बोट हळुहळु त्या बेटाच्या किनाऱ्याला पोहोचते. तिथे उतरल्यावर मनाला लाभलेली प्रसन्नता काही वेगळीच असते. Serenity म्हणतात ना तेच.

चर्चला वळसा घालून पुढे गेलं की देखणा किनारा आहे. त्या किनाऱ्यावर शांतपणे बसून समोर दिसणारं निळंशार आकाश, हिरवनिळं पाणी आणि त्यात असणारी बदकं, ये जा करणाऱ्या बोटी, किनाऱ्यालगतची जंगलात जाणारी पांढरीशुभ्र पायवाट, त्या पायवाटेला लागून पसरलेली हिरवळ हे सगळं डोळ्यातून मनात झिरपत जातं! ह्यावेळी रोजामधलं गाणं हमखास आठवतं -

ये हँसी वादियाँ
ये खुला आसमां

आपण हे सगळं मनात साठवत असताना वेळेचं भानच राहत नाही आणि तिथून निघायची वेळ येते. जड पावलांनी आपण त्या मोहक जागेचा निरोप घेतो. शेकडो फोटोज काढून सुद्धा कुठल्याच फोटोमधुन तो स्वर्गीय अनुभव पुन्हा घेता येतच नाही!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक







मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

माणुसकी

(माझ्या वडिलांचा अनुभव माझ्या शब्दात!)

आज गजर व्हायच्या आधीच जाग आली. तशी रात्रभर शांत झोप लागलीच नाही म्हणा. लांबचा प्रवास करायचा म्हणजे असं होतंच. त्यात नातवाला सोडून निघताना मनाची घालमेल होतेच. लेक-जावयाच्या घरून निघायची वेळ झाली!

आता पुन्हा सगळ्या विमानतळांवरचे सगळे सोपस्कार करा. सगळं व्यवस्थित पार पडलं म्हणजे मिळवलं. त्यात आज काय म्हणे तर हरितालिका. "हिला" मधुमेह आहे तरीही उपवास करायचाच म्हणतेय. पोरगी, सुन सांगत आहेत हिला नको करू आज उपवास. काही बिघडत नाही, नाही केला तर. पण हिचं काहीच सांगता येत नाही, ह्यांना हो हो म्हणतेय पण उपवास रेटूनच नेईल ती. ऐकेल ती बायको कुठची. विमानात ठीक आहे फळं, ज्यूस मिळतात पण अबूधाबीच्या विमानतळावर काही मिळेल का नाही काय माहित. त्यात तिथे किती वेळ मिळेल तेही माहित नाही. पुन्हा लोकांचे विमानाचे आणि विमानतळांवरचे ऐकलेले चित्रविचित्र अनुभव डोक्यातून जात नाहीत.

असे एक ना अनेक विचार मनात घोळतच होते तेवढयात आमची मेट्रो म्युनिच विमानतळावर पोहोचली. तिथले सगळे सोपस्कार पार पाडून आणि लेकीने सोबत आणलेला नाश्ता; अर्थातच उपासाचे थालीपीठ खाऊन आम्ही सिक्युरिटी चेक साठी लेक जावयाचा निरोप घेऊन निघालो.

विमानप्रवास सुखद होता अबुधाबी पर्यंत. पण "सौनी" हरितालिकेला अजिबात न दुखावल्यामुळे त्यांच्या खाण्याची काळजी होतीच! विमानातून उतरून पुन्हा सगळे सोपस्कार करून पुण्याला जाणाऱ्या विमानाचा गेट नंबर शोधून एकदाचे त्या गेटजवळ विसावलो. पण माझ्या डोक्यात हिच्यासाठी काहीतरी खायला आणायचे विचार घोळतच होते. आजूबाजूला पहिले ;चहाकॉफीच्या दुकानांव्यतिरिक्त काही दिसले नाही. म्हणून हिला तिथे बसवून मी एखादे फळांचे दुकान तरी दिसते का ते शोधत निघालो. एक दुकान कसंबसं सापडलं. जिवात जीव आला. वेळ जास्त नव्हता ना हातात!

अरबन फूड कि काय नाव होते दुकानाचे. तिथल्या मुलीला इंग्रजी नीट कळत नव्हती आणि मला तिची अरबी भाषा. मी आपलं एक सफरचंद घेतलं आणि तिला "मनी?" असं विचारलं. तिने काहीतरी अरबी मध्ये सांगितलं पण मला काही हिशोब लागला नाही. मी माझ्याजवळ असलेले युरो तिला दाखवले ती नाही म्हणाली . मग मी रुपये दाखवले त्यालाही ती नाहीच म्हणाली. आता आली का पंचाईत? ती मुलगी अरब करन्सीच मागत होती. विमान सुटण्याची वेळ जवळ येत होती, हिला भूक लागली होती. मधुमेह असल्यामुळे तिला काहीतरी खाणे गरजेचे होते. जवळ कुठे करन्सी बदल करण्याचे ऑफिस दिसत नव्हते.

माझ्या चेहऱ्यावर माझ्या मनातली चलबिचल स्पष्ट दिसत असणार. मी त्या मुलीला विनंती करत होतो की तू जास्त युरो घे पण सफरचंद दे पण ती "लिराच" पाहिजे म्हणुन अडून बसली. तिथे बसलेला एक तिशीतला प्रवाशी आमच्यातला संवाद शांतपणे ऐकत होता. मग तो उठून माझ्याजवळ आला आणि त्या मुलीला त्याने अरबी भाषेत विचारले "किती झाले?" तिने पैसे सांगितले तर त्याने लगेच तिला सहा लिरा दिले आणि माझ्याकडे बघून आश्वासक हसला. माझ्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद त्याच्याही चेहऱ्यावर दिसला!

मी त्याला माझ्याजवळचे युरो दिले. त्याने अगदी अदबीने पैसे नाकारले आणि म्हणाला, "आप मेरे अब्बा के उम्रके हो! आपसे कैसे पैसे ले सकता हूँ मैं?"  त्याच्या ह्या उत्तराने तर मला वाटलं कि "देवासारखा धावून आला पोरगा!" वेळेअभावी तिथून निघताना मी त्याला अगदी मनातून धन्यवाद देऊन छोटी गळाभेट घेतली त्याची आणि आणि त्याचा निरोप घेतला. पण अचानक लक्षात आलं कि आपण साधं नावही नाही विचारलं पोराला. मागे वळून मी त्याला विचारलं  "नाम क्या है बेटा तुम्हारा?"

निखळ हसत तो उत्तरला " मोहम्मद!"

जगात असणाऱ्या माणुसकीवरचा माझा विश्वास अजूनच दृढ झाला त्या दिवशी!



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

गंगेत घोडं नहालं

आई बाबा येऊन महिना दीड महिना झालाय पण त्यांना त्यांचं दर्शनच होत नव्हतं. रोज वाटायचं आज तरी भेटतील किंवा दिसतील पण कसचं काय. आमच्या आणि त्यांच्या बाहेर पडायच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे भेटीचा योग जुळतच नव्हता. तरीही एक दीड महिन्यात एकदाही दर्शन होऊ नये म्हणजे फार झालं. भारतातून बहिणीचा फोन आला तर तिलाही चिंता लागून राहिली होती की मावशीला अजून चक्क त्याचं दर्शन नाही!

 आपण अंदाज घेऊन त्या बाहेर पडत आहेत असं वाटुन पटकन दार उघडावं तर लिफ्टचा दरवाजा लागत असायचा आणि त्या गायब. घरात होणारी हळहळ तर वेगळीच. "अरेरे थोडक्यात भेट हुकली."  म्हणजे एकंदर लोकांना शंका यायला लागली होती की इतक्या दिवस हि पोस्ट लिहितेय ह्यांच्यावर ते काय एखादं काल्पनिक पात्र आहे कि काय? माझा उगीचच स्वतःवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागला ना! मेल्याहून मेल्यासारखे होणे म्हणजे काय हे कळायला लागलं. म्हटलं फेबुवर लोकांना कळलं तर पोस्ट टाकायचे वांदे होतील.

  पण नाही.. देवालाच डोळे हो! एक दिवस माझा विश्वास सार्थ ठरला आणि मला एक आयडियाची कल्पना सुचली. ते फुल न फुलाची पाकळी सारखं भेट नाहीतर दर्शन तरी म्हणून आईला म्हटलं "अगं काकू बाहेर निघाल्या आहेत बहुतेक. पटकन गॅलरित जा. सायकल घेऊन जात असतील तर दिसतील." बिचारी आई देवाचा जप सोडून गॅलरीत हजर झाली. काकूंनी सायकल काढताना वर कटाक्ष टाकला आणि आईला "हॅलो" म्हटले एकदाचे आणि माझा जीव भांड्यात पडला. म्हटलं म्युनिचला बोलावून मॅगी काकूंना नाही भेटवलं तर भारतात तोंड दाखवायला जागा नाही राहणार आणि लोक म्हणायचे "हॅट तेरी जिंदगानीपें!"

आणि मनाला शांती तेव्हा लाभली जेव्हा काकू समक्ष आईला भेटल्या.

 उपवास म्हटलं कि साबुदाणा वडे करण्याचा शिरस्ता फार जुना आहे. काल रात्री वडे तळल्यामुळे स्मोक डिटेक्टेर कोकलू नये म्हणून रात्री जरा वेळ दार उघडं ठेवलं आणि तेवढ्यात काय आश्चर्य काकू बाहेरून आल्या! माझ्याशी बोलायला थांबल्या आणि म्हणाल्या "अगं तुझ्या घरातलं ते हे", बापरे केवढा मोठा गोळा आला पोटात! आता कशाचा आवाज येतोय ह्यांना? कोणी "ते हे" म्हणाले कि भीतीच वाटते आणि मॅगी काकू असं बोलल्या म्हणजे नक्की काय असेल देव जाणे. शेवटी त्यांना आठवलं "ते हे" म्हणजे इंटरकॉम. पोटातला भीतीचा गोळा गायब! मी पटकन सांगून टाकलं " इंटरकॉम नीट चालू आहे." हे " ते हे" प्रकरण जागतिक आहे एकंदर.

  आईला बाहेर बोलावून काकुंशी रीतसर ओळख करून दिली. काकूंचे जर्मन मिश्रित इंग्लिश आणि आईचे मराठी मिश्रित इंग्लिश असा त्यांचा मनोरंजनात्मक संवाद ऐकून मला माझ्या मराठी, इंग्लिश आणि जर्मन ज्ञानाविषयी जरा शंका आलीच आणि मी आता ह्या दोघींमध्ये नक्की कोणत्या भाषेत बोलावे हा मोठा प्रश्न पडला! शेवटी गुड नाईट म्हणून त्या दोघीनी एकमेकींचा आरोप घेतला.

  काल रात्री "गंगेत घोडं नहालं" म्हणीची प्रचिती आल्यामुळे फार निवांत झोप लागली!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शुक्रवार, ८ जून, २०१८

सौजन्यदिन

ज्या ज्या दिवशी बाहेरूंन येताना किंवा बाहेर जाताना मॅगी काकु (माझी जर्मन शेजारीण) भेटतात त्या त्या दिवशी मला त्यांचा धाक वाटला नाही असं कधीच होतच  नाही. बाहेरून येताना त्या दिसल्या कि माझे पाय जागीच थबकतात.

काल असंच बाहेरून येत होते तर मला लांबुनच दिसलं कि मॅगी काकु बिल्डिंगचं दार उघडत आहेत. मी आपली एका जागीच थांबले म्हटलं त्यांना वर जाऊ देऊ आधी आणि मगच आपण जाऊ. पुन्हा काहीतरी कारण काढून शाळा घेतील माझी. त्या आपलं किल्लीने दार उघडत होत्या, काहीतरी सामान आत ठेवत होत्या, बराच वेळ त्यांचं हे काम चालू होतं. शेवटी मी हळुहळु घाबरतच दाराकडे निघाले. मी त्यांच्याजवळ पोहोचायला आणि त्यांनी मागे वळून पाहायला एकच गाठ पडली आणि काकू भूत बघितल्यासारख्या  किंचाळल्या ना! खरंतर इथे माणसंच दिसत नाहीत; भुतं तर दूरची गोष्ट. मला पाहून इतकं कोणी घाबरेल हे आयुष्यात कधी वाटलं नव्हतं.. "कोणी" मध्ये नवऱ्याला धरू नये!

मी पण मग घाबरून त्यांना सॉरी म्हटलं आणि अगदी मावाळ आवाजात " माझा तुम्हाला घाबरवण्याचा कोणताही उद्देश नव्हता कृपया गैरसमज करून घेऊ नका."  असं बोलून टाकलं. उगी पुन्हा हि बाई मला घाबरवते म्हणून माझी कम्प्लेंट करायच्या. त्यांना बाय करून तिथून निघाले तर काकू हसल्या ना चक्क! म्हणाल्या "अगं असं  काही नाही. मी माझ्याच गडबडीत होते. तू कशी आहेस?"  मी बरी आहे म्हणून पुन्हा बाय केलं तर काकू गप्पांच्या मूड मध्ये होत्या. काकूंचे एक एक प्रश्न चालू होते आणि मला प्रत्येक प्रश्नागणिक आश्चर्याचे धक्के बसत होते.

"तुझ्या सासू सासर्यांना म्युनिच आवडलं का? त्यांना हे दाखवलं का ते दाखवलं का?  तुझा मुलगा खुश असेल ना एकदम आजी आजोबा आलेत तर.. वगैरे वगैरे".
मला वाटलं मी स्वप्नच पाहतेय कारण शेवटचं वाक्य जे बोलल्या त्याने तर मी उडालेच. "तुझा ड्रेस खूपच छान आहे."  काकुंच्या अश्या एकानंतर एक सौजन्यपूर्ण वाक्यांनी  माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना म्हणून मग एक बारीक चिमटा काढूनच पहिला स्वतःला आणि बावळटसारखं त्यांच्याकडे पाहतच राहिले.

ह्या नक्की मॅगी काकूच आहेत ना, असा एक विचार मनात चमकुन गेला कारण मागच्या वेळी भेटल्या तेव्हा सुद्धा त्या त्यांना रात्रीच्या वेळी ऐकू येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांविषयीच बोलत होत्या पण माझ्या नशिबाने ते आवाज माझ्या घरातल्या दाराचे नव्हते!

त्यांनी पुन्हा मला विचारलं "तुझा ड्रेस खूपच छान आहे. समरमध्ये असे कॉटनचे कपडे छानच वाटतात. तू कुठे घेतलास?" भारतीय पेहरावाचं इतकं कौतुक! तेही मॅगी काकूंच्या तोंडून ऐकून धन्य झाले मी. मी सांगितलं भारतातुनच मागवला तर काकू म्हणाल्या पुढच्या वेळी माझ्यासाठी पण मागाव आणि बाय करून निघून गेल्या.

ह्या सौजन्याच्या कहरामुळे काल काही लिहायला सुचलंच नाही. जर्मन कॅलेंडर बघावं लागेल खरं.. जर्मन सौजन्यदिन होता कि काय काल!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                 

वाचकांना आवडलेले काही