शनिवार, १४ एप्रिल, २०१८

भाषा

दोन वेगवेगळे देश, त्यांच्या वेगळ्या भाषा आणि दोन अगदी टोकाचे अनुभव!

मी इथे आल्यापासुन पाहतेय सगळीकडे जर्मन भाषेशिवाय पर्याय नाहीये फारसा. थोड्याफार प्रमाणात जर्मन समजणे आणि बोलणे इथे अनिवार्य आहे नाहीतर आपल्याला प्रचंड त्रास होतो. बऱ्याच लोकांना इंग्रजी कळत नाही; आणि कळत असेल तर ते तसं दाखवत नाहीत. आपल्याशी जर्मन मधेच बोलतात. दुकानदार, डॉक्टर, तिकीट चेकर, शिक्षक, अशा ज्या ज्या लोकांशी बोलावे लागते त्यांच्यापैकी फक्त १-२% लोकांना इंग्रजी समजते पण त्यांना बोलता येत नाही. माझ्या लेकाच्या शाळेच्या मुख्याध्यापक बाईंना इंग्रजी फारशी समजत नाही.

ह्यांचे धोरण सरळ आहे. तुम्ही आमची भाषा शिका; आम्ही तुम्हाला नोकरी देतो, तुमच्या मुलांना फुकट शिक्षण देतो. आमची भाषा शिकायची नसेल तर तुमचं आमच्या देशात अवघड आहे. खरोखर हे असंच आहे; आम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घेतो आहोत. मुलाच्या शाळेविषयी विचार करत असताना ह्या गोष्टीची प्रखरतेने जाणीव झाली. इथल्या शासकीय शाळांमध्ये पूर्णपणे विनामूल्य शिक्षण आहे आणि इथल्या इंग्रजी माध्यमाच्या आंतराष्ट्रीय शाळेच्या (International School) एका वर्षाच्या शुल्कामध्ये(fees) कदाचित भारतात एक घर घेऊ शकतो आपण. त्यामुळे आंतरराष्ट्रिय शाळेचा विचार जास्त्त कोणी करत नाही. जर मुलाना दुसरी शाळा सोडून शासकीय शाळेत जायचे असेल तर त्यांच्यासाठी चवथीमध्येच पूर्वपरीक्षा घेतात. ही परीक्षा बऱ्यापैकी अवघड असते. जर्मन भाषा त्यांच्या अपक्षेप्रमाणे आलीच पाहजे नाहीतर ह्या परीक्षेत उत्तीर्ण होणे तसे कठीणच आहे. तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्णपणे जर्मन भाषेत आहे. किंवा इथलं सगळं शिक्षणच मातृभाषेत आहे असं म्हणणं योग्य ठरेल. ठिकठिकाणी मोठमोठी वाचनालयं आहेत जिथे १८ वर्षांपर्यन्तच्या मुलांना विनामूल्य सुविधा आहेत. तिथे प्रत्येक विषयावरची सगळी पुस्तके उपलब्ध आहेत. मला १ टक्का सुद्धा इंग्रजी पुस्तके दिसली नाहीत तिथे.

एकंदर काय तर इथे दुसऱ्या कोणत्याही भाषेला फारसा वाव नाही आणि जर्मन भाषा शिकायची नसेल तर तुम्ही तुमच्या देशात परत जाणे हाच एक पर्याय आहे. हा झाला माझा अनुभव.

ह्याच्या अगदी विरुद्ध अनुभव माझ्या मैत्रिणीचा. आपल्या देशातला, महाराष्ट्रातला, पुण्यातला.

माझ्या एका मैत्रिणीने शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एका प्रतिथयश शाळेत एका जागेसाठी अर्ज केला. १०-१२ वर्षांचा तगडा अनुभव, मराठी आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आणि अत्यंत हुशार असलेल्या तिला अर्ज केल्यावर २ दिवसात काहीही उत्तर आले नाही त्यामुळे तिला जरा आश्चर्यच वाटले तरी तिने विचार केला आपण अजुन १-२ दिवस वाट पाहु. तरीही कोणतेही उत्तर न आल्याने तिने त्या शाळेतील ओळखीच्यांना फोन करुन परिस्थिती सांगितली आणि जरा चौकशी करतात का म्हणून विचारले. त्या गृहस्थांनी लगेच माहिती काढली की "या व्यक्तीचा Resume मिळाला का? असेल तर त्यांना मुलाखतीसाठी का नाही बोलावले? वगैरे वगैरे". तर शाळेकडून जी माहिती मिळाली ते ऐकून तर मैत्रिणीला धक्काच बसला. धक्का बसण्यासारखीच गोष्ट घडली होती. शाळा सांगत होती की "त्यांचा Resume फार छान आहे, पण त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातुन झालेले असल्यामुळे आम्ही त्यांचा Resume रिजेक्ट केला." ही माहिती शाळेच्या व्यक्तीने मराठीतच सांगितली बरंका! तिथे असलेले बरेचसे लोक मराठीतच बोलत होते.

आपण आपल्याच देशात, आपल्याच राज्यात आपल्याच मातृभाषेत शिक्षण घेतलं असेल तर आपल्याला लोक चक्क नोकरीसाठी नाकारतात. हे मराठीसाठी कोणतं धोरण आहे आपल्याकडे खरंच? इंग्रजीवर प्रभुत्व असुन सुद्धा फक्त मराठी माध्यमातून शिक्षण घेतले म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरी का मिळु नये?



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                #rajashrismunichdiaries 

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

स्वप्नातली "ती"

नविन वर्ष सुरु होताना इतकं छान वाटतंय म्हणून सांगु! उद्या "ती" येणार आहे. किती दिवस झाले खरंच. खरंतर २-४ वर्षच झाले आहेत पण असं वाटतंय की युगे लोटलीत भेट होऊन. कसं आणि काय करावं; काही म्हणून सुचत नाहीये. पाडवा आहे म्हणुन पुरण तर घालणार आहेच मी पण अजून काय विशेष करावं बरं? तसं आधी गुलाबजामूनच करायचा बेत होता. पण "ती" येणार आहे असं कळाल्यावर बिनधास्त पुरणाचा घाट घालणार आहे मी.

इथे आल्यापासून नुसती वाटच पाहणे चालू आहे "तिची". "ती" कधी इथे येईल असं वाटलंच नव्हतं; पण अगदी उद्या येतीये म्हणजे दुधात साखरच जणु! माझ्या आनंदाला तर पारावारच नाही उरला. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि "ती" येतेय असं झालंय. वेळ अगदी मुंगीच्या पावलाने पुढे सरकतोय असं वाटतं आहे. मनाला एक प्रकारची शांती मिळतेय "ती" येणार म्हटलं की. नाचावसं वाटतंय, पंख लावून उडावसं वाटतंय. अहाहा "ती" येतीये!

इतकं भारी वाटत आहे ना! मैत्रिणीला भारतात फोन करून ही आनंदाची बातमी सांगिलीच मी. तिला वाटलं मला हर्षवायुच झालाय. पण शेवटी तिलाही माझ्या भावना कळल्याच कारण तीही कधी ना कधी तरी अशा परिस्थितीतून गेलीये ना. आम्ही खूप गप्पा मारल्या मग तिच्याविषयी. हा तर नेहमीचा जिव्हाळ्याचा विषयच आहे म्हणा!

माझा एकंदर नुर पाहुन नवऱ्याला काळजी वाटतेय. पण त्याला काय कळणार; मला किती निवांत वाटतं आहे ते. तो सारखा म्हणतोय "तु बरी आहेस ना गं?"  मी सांगितलं त्याला "अरे "ती" येतीये ना त्यामुळे मला कीनई फार भारी वाटतंय रे." तर म्हणे " माझी पण इतकी वाट पाहत नाहीस कधी!" आता त्याला काय सांगणार फरक. असो. माझ्या मनात उकळ्या फुटत आहेत हे कसं समजवणार त्याला. कोणी काहीही म्हणो पण ती आली की फेसबुकवर पोस्टच टाकणार आहे मी "फिलिंग व्हेरी हॅप्पी किंवा फिलिंग रिलॅक्सड किंवा फिलिंग फेस्टिव्ह विथ ती. "

एकदाचा पाडव्याचा दिवस उजाडला. सगळं पटकन आवरून, पुरणावरणाचा स्वयंपाक करुन, मस्तपैकी जेवण उरकुन मी आपली तिची वाट पाहत बसले आणि कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. आनंदाच्या भरात झोपेतही अचानक कुठून तरी मंद संगीताचे सूर ऐकू यायला लागले. पण हळुहळू आवाज खूपच वाढायला लागला, मला वाटलं दारावरची बेल वाजली. तीच आली असेल. धडपडत उठले, वाटलं पटकन दार उघडु आणि पाहते तर.....

आजूबाजूला सगळी शांतता होती आणि माझ्या फोनमधला अलार्म वाजत होता.
.
.
.
.

हाय रे कर्मा! म्हणजे ती स्वप्नात सुद्धा माझ्या इथल्या घरी आलीच नाही? म्हणजे सगळे पुरणाच्या स्वयंपाकाचे भांडे मलाच घासावे लागणार??



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                    

बुधवार, १४ मार्च, २०१८

अजबच आहे खरं!

काहीकाही लोकांचं खरंच फार आश्चर्य वाटतं कधीकधी! अजब प्रकार असतात एकंदर.

आता माझी शेजारीण मॅगी काकुचेच बघा ना; त्या कुठून बाहेरून येत असतील आणि मी बाहेर निघाले असेल आणि आमची जिन्यात अथवा लिफ्ट मध्ये भेट झाली तर इतकं हसून आणि प्रेमानी बोलतील की बास. जसं  काही जन्मल्यापासुन मी ह्यांच्याच शेजारी राहतेय! त्याच मॅगी काकु त्यांच्या घरातुन बाहेत पडायच्या तयारीत असतील आणि मी माझ्या घरातून बाहेर पडुन त्यांच्या घरात डोकावत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर चक्क तोंडावर दार लावतात. तू कोण अन मी कोण? असं कुठं असतय होय? इथे आपण आपल्या घराबाहेर शेजारी उभे असतील तर पटकन घरात बोलवतो. एक दिवस बळजबरी त्यांच्या घरात घुसावच  म्हणतेय. कळेल तरी काय खजिना दडवून ठेवलाय ते. 

मी रोज ज्या वेळेला स्टेशनला जाते त्याच वेळेला तिथे तिकीट मशीनच्या आसपास एक इसम फिरत असतो. चांगला तरणाताठा आहे. पण तरीही लोकांना तिकिटासाठी पैसे मागत फिरत असतो. बरेच लोक पैसे देतात; त्या लोकांना ओरडून सांगावंसं वाटतं "अहो नका देऊ पैसे, बिअर पितंय ते येडं तुमच्या पैशात". कारण मी लेकाला घेऊन येताना पाहते तर स्टेशनवरच्याच दुकानात बिअर घेत असतो. त्याच स्टेशनवर एक आजोबा हातात पुस्तक उंचावून सलग उभे असतात कारण त्याचं पुस्तक विकलं जावं म्हणून. मी जातानाही ते उभेच असतात आणि येतानाही. किती हा विरोधाभास.

दुसऱ्या एका स्टेशनवर एक आज्जी, आज्जीच बरंका; एकदम सुकड्या, हवा आली तरी पडतील अश्या आणि अविर्भाव एखाद्या बॉडीबिल्डरचा. एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बिअरची बाटली घेऊन अक्षरशः झुलत असतात रोज. एवढ्या झुलतात तर गपगुमान लिफ्टने यावं ना स्टेशनवर; पण नाही त्या पायऱ्यांनींच येतात. दोन पायऱ्या चढतात एक उतरतात पुन्हा दोन चढतात एक उतरतात; वाटतं पडतेय आता ही बाई दाणकन पण नाही त्या असं करत वर पोहोचतात. बरं कोणी मदत करायला गेलं तर त्या माणसाला शिव्यांची लाखोली अगदी ठरलेली. मी खाल्या आहेत एकदा शिव्या. जर्मन भाषेतील बऱ्याच शिव्या कळायला त्यांच्यामुळे फार मदत झाली मला. सिगरेट पितच ट्रेनमध्ये चढतात आणि मग इतर प्रवाश्यांवर आरडाओरड करतात. मग ट्रेनचालक येऊन त्यांना समज देतो तेव्हा कुठे सिगरेट बाहेर फेकतात आणि मग एकदाची ट्रेन निघते.

जवळच्या सुपरमार्केटमध्ये एक आजोबा अधूनमधून दिसतात. "ह्या ह्या ह्या ह्या" हसत असतात; तेही जोरजोरात. बिलींच्या रांगेत त्यांच्या पुढे मागे असणाऱ्या लोकांचे सामान स्वतःचं म्हणून घेऊन टाकतात आणि पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". आपण पुन्हा लेकाला पिटाळायचं सामान आणायला. आज आम्हाला विचारलं "तुम्ही इंडियन आहेत का? फारच छान देश आहे. मी इंग्लडला असताना गेलो होतो." पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". भारताला गरीब न म्हणता चांगला म्हणणारा परदेशी माणुस; हा तर चमत्कारच म्हणायचा! मग लक्षात आलं की आजोबांच्या डोक्यावर  परिणाम झालाय.

मुलाला मस्त सरप्राईज देऊ वगैरे विचार डोक्यात ठेवुन, आई खूप दिवसांनी उत्साहाने शाळेत जाते त्याला घायला. आईला पाहुन "काय यार आई; तु कशाला आलीस मला घ्यायला? मी येतोय ना माझा माझा" असं म्हणणारा लेक! फार म्हणजे फारच गंमत वाटते बुआ.


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                         

गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिलादिन वगैरे

आज घराबाहेर पडले आणि गेटच्या बाहेर गेले तर समोर एक इतकी गोंडस मुलगी प्रॅममध्ये होती जसं काही बाहुलीच आणि तिची आई पण एकदम गोड हसली माझ्याकडे पाहुन. त्या सुरेख बाहुलीला बाय करून सुपरमार्केटमध्ये गेले तर बिलिंग काउंटरला त्याच पिअर्सड काकु; मस्त स्माईल दिली त्यांनी निघताना.

कपड्यांच्या दुकानात गेले तर तिथल्या काकु एकदम टापटीप आणि वेल ड्रेस्ड. पुढे एका बेकरीत गेले तर तिथल्या दोघी जणी हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाला जे जे पाहिजे ते पटापट देत होत्या. अंडरग्राउंड ट्रेनमध्ये बसले आणि पुढच्या स्टेशनची अनाउन्समेंट ऐकली तर एका काकूंचा आवाज आला; अरेवा म्हणजे ट्रेन काकू चालवत होत्या.

काय मस्त योगायोग होतो ना कधीकधी! सगळीकडच्या ह्या स्त्रिया आणि त्यांचा आत्मविश्वास बघुन मलाही एक वेगळाच आत्मविश्वास आला. त्यात पुन्हा चिरंजीवांनी भेटल्याभेटल्या "अग आई तुला Happy Women's Day! मला शाळेत कळालं आज Women's Day आहे."  घरी आलो आणि फ्रिजमध्ये ठेवलेलं चॉकलेट दिलं मला; भेट म्हणुन. मी काहीच न सांगता स्वतःचं सगळं नीट आवरलं आणि मला प्रश्न विचारला..

.
.
.
.

"आई आज रात्री जेवायला काय करणार आहेस?"


#जागतिक_महिला_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जरा उशीरच झालाय.. पण तरीही.



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                       

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

पुनश्च मोबाइलपुराण

आज दुपारी स्टेशनवर आले तेव्हा अचानक आजूबाजूला जरा गोंधळ सुरु झाला. लोक ट्रेन ट्रॅककडे बघुन काहीतरी बोलत होते. मला काहीच कळेना. मी आपलं वाकुन बघायचा प्रयत्न केला पण काय झालंय ते कळायला काही मार्गच नव्हता. उगाच मनात विचार आला, काही काम वगैरे तर नाही चालु ना? नाही कारण आपल्याकडे असं काही काम चालू असलं कि बघणारे दहा टाळके असतात ना.

आधी वाटलं कोणाचं कुत्रं तर पडलं नाहीये ना ट्रॅकवर? नाही काही सांगता येत नाही.. इथल्या लोकांसोबत लहान मुले क्वचित दिसतात पण कुत्रे हमखास असतात. पण मग लक्षात आलं की आजकाल जीवापाड जपलेली एक फार महत्वाची गोष्ट ट्रॅकवर पडली होती आणि त्या दादाचा जीव पार टांगणीला लागला होता. हि गोष्ट हातात नसेल तर माणूस सैरभैर होतो बिचारा, मग जर हि गोष्ट ट्रॅकवर पडली म्हटल्यावर त्या दादाची काय अवस्था झाली असेल खरंच.

हो हो.. बरोबर.. आलं तुमच्या लक्षात.. त्याचा मोबाईल.. नाही नाही.. त्याच्या गर्लफ्रेंडचा मोबाईल पडला होता ट्रॅकवर. तेच म्हंटल बिचाऱ्याला एवढं टेन्शन का आलं ते.

मुझे लगा अभी वो मर्द का बच्चा कुदके अपने जानेमनका मोबाईल लाके देगा.. पण कसचं काय. त्या दादाने दुसऱ्या बाजूच्या ट्रेन चालकाला विचारलं कि आता काय करावं. कारण जिकडे मोबाइल पडला होता तिथली ट्रेन यायला फक्त ९ मिनिट बाकी होते. आता तो दादा आणि त्याची GF ह्यांच्याबरोबर मलाही प्रचंड टेन्शन आलं. कसं होईल काय होईल? कोणत्या ब्रँडचा असेल बरं मोबाईल? मिळेल ना त्याला की जातोय ट्रेनखाली? हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. एकीकडे वाटलं च्या$%% आपणच उडी मारून पटकन देऊ त्याला काढुन, ६ मिनिट आहेत की ट्रेन यायला. पण नाही.. रुलबुकप्रमाणे प्रोसेस फॉलो झालीच पाहिजे. जर्मनीत राहतेय ना मी. उडी मारली तर मोबाईल राहिला दूर, मलाच ट्रॅकवरून उचलायला पोलीस येतील.

आता माझी पण घालमेल वाढत होती. आता फिल्मी विचार यायला लागले. "क्या ईस स्टेशनपर ऐसा कोई माईका लाल नही है जो कुदके मोबाईल ना निकाल सके?" "अबे तुझ्या GF चा आहे ना मोबाईल मग मार की उडी लेका वाट कशाची बघतोस?" ह्या सगळ्या असंख्य विचारांमध्ये मला नक्की कुठल्या ट्रेनमध्ये जायचं आहे हेच लक्षात येईना. त्याची GF फुल्ल टेन्शनमध्ये असुन सुद्धा शांत उभी होती. मी असते तर जीव खाल्ला असता नवऱ्याचा. ते असोच.

त्या ट्रेन चालकाने नक्की काय करावं लागेल ते सांगितलं बहुतेक त्या दादाला. मग त्याने स्टेशनवरील SOS(Emergency call) कॉल केला आणि मिनिटभरात पोलीस वॅनचा आवाज यायला लागला. आयला.. आपली मॅगी पण २ मिनिटात बनत नाही.. पण ह्यांचे पोलीस कॉल केल्यावर मिनिटभरात आले पण. लगेच त्यांनी नक्की काय झालंय ते विचारलं. त्या दादाने सांगितलं कि मोबाईल पडलाय. त्यांनी पटकन कम्प्लेंट रजिस्टर केली. आता ट्रेन यायला फक्त ३ मिनिट उरले होते. माझाच जीव खालीवर होत होता. पण त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चिमटासदृश्य वस्तूने मोबाईल वर काढला आणि त्या सैरभैर दादाला दिला. दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता, बहुतेक उष्ट्या सफरचंद ब्रॅण्डचा असावा मोबाईल. जसं काही त्या दादाने उडी मारूनच मोबाईल काढून दिलाय, असा आनंद त्याच्या GF च्या चेहऱ्यावर होता आणि बाकी माझ्यासारख्या लोकांनी हुश्श केलं. आणि हे सगळं मोबाइलपुराण घडलं अवघ्या १० मिनिटात.

शेवटी मी माझा मोबाईल घट्ट पकडून मला कोणत्या ट्रेनमध्ये जायचं आहे ह्याचा विचार करायला लागले.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

अनपेक्षित

   परवा बाहेरून घरी येत होते, स्टेशनमधुन वर आले आणि घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अगदी वाहता रस्ता आहे. पण २-३ वर्षात एकदाही पोलीस कार आणि ऍम्ब्युलन्स शिवाय एकाही गाडीच्या हॉर्नचा आवाज नाही ऐकला कधी! वेगवेगळ्या आवाजांसाठी वेळा ठरलेल्या आहेत कदाचित इथल्या रुलबुकमध्ये कारण एकदा सकाळी पावणे सात वाजता आम्ही बस पकडायला स्टॉपकडे पळत चाललो होतो. आमच्या पायांच्या आवाजामुळे जवळच असलेल्या बेकरीमधले आजोबा बाहेर आले वसक्कन वसकलेच आमच्यावर, "इथे सकाळी सातच्या आत पायांचा आवाज नाही करायचा, एवढं माहिती नाही तुम्हाला! पळू नका चालत जा." हे ऐकुन लेक तर टरकलाच बिचारा. तेव्हापासून भर दिवसाही पळायची भीती बसलीये.
  
   पण "अगा जे घडलेची नाही" असं काहीसं झालं. अचानक ४-५ गाड्यांचे हॉर्न ऐकु यायला लागले; तेही अगदी जोरात आणि तालासुरात.जवळच्या सगळ्या दुकानांमधून लोक बाहेर आले नक्की काय चाललंय ते पाहायला. माझ्या सहित आजूबाजूचे सगळे लोक गाड्या येत होत्या त्या दिशेने बघायला लागले. मी पण जागीच थबकले आणि "आँ" असे भाव चेहऱ्यावर आले. बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर "काय कटकट आहे" तत्सम भाव. त्याला कारणही तसेच होते. ती लग्नाची वरात होती!! मला गंमतच वाटली. वरात जर्मन लोकांची नव्हती पण, तुर्कीश होती. "परवानगी बरी मिळाली त्यांना" असा बालिश विचार मनात आला. जसं काही लेकाच्या मुंजीची वरात काढायची परवानगीच नाकारलीये मला. 

  असाच अजून एक विलक्षण अनुभव आला. मागच्या आठवड्यात आम्हाला फोन आला की घरात नवीन "स्मोक डिटेक्टर्स" बसवायचे आहे. तुमचा वेळ सांगा त्यावेळी आमचे लोक बसवून जातील. आम्ही वेळ सांगितली. शुक्रवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता बेल वाजली. मला वाटलं एखादा मनुष्य असेल पण दार उघडल्यावर अक्षरशः धक्काच बसला. वयवर्षे ७० ते ७५ च्या आसपासचे आजी-आजोबा दारात उभे होते. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य त्यांना कळलं बहुतेक कारण आजोबा जर्मन मध्ये म्हणाले " हो आम्हीच बसवणार आहोत स्मोक डिटेक्टर्स." 

  दोघेही घरात आले, मला आणि लेकाला प्रेमाने ग्रीट केलं आणि कामाला लागले. आजी सगळं पेपरवर्क तपासत होत्या आणि आजोबांनी डिवाइस लावायची तयारी सुरु केली. आजोबानी खुर्ची घेतली आणि चढायला लागले, तर लेक पटकन म्हणाला " मी मदत करतो तुम्हाला." आजोबा म्हणतात कसे " अरेवा हुशार आहेस तु. पण धन्यवाद. मी एकदम फिट अँड फाईन आहे." आजोबानी पटापट तिन्ही स्मोक डिटेक्टर्स लावून टाकले आणि आज्जीनी माझी सही घेतली. मी विचारलं कॉफी घेता का दोघे? तर मला नम्रपणे नकार दिला त्यांनी आणि म्हणाले "आम्हाला अजुन तीन ठिकाणी जायचं आहे. तुमचा मुलगा खूपच काईन्ड आहे. गॉड ब्लेस हिम!" आणि निरोप घेऊन निघून गेले. अशा अनपेक्षित गोष्टी घडल्या की फार मस्त वाटतं!!

सकाळी आपल्या आधी उठुन, नवऱ्याने विचारलेला "चहा टाकु का?" हा प्रश्न मात्र अनपेक्षितच्या लिस्टमध्ये नेहमीच पहिला असेल. 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                             

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

हाय मिरची

आज भाजीपाला, फळे वगैरे आणायला जवळच्या दुकानात गेले होते. दुकान म्हणताच नाही येत खरंतर कारण बऱ्यापैकी मोठं दुकान आहे, मॉलच म्हणुया. सगळ्या गरजेच्या वस्तु एकाच छताखाली. एकतर इथे सुट्टी असली की एकुणएक दुकानं बंद असतात. रविवारला जोडुन एखादी सुट्टी असेल तर त्याआधीच दुध इत्यादी गोष्टी आठवणीने आणून ठेवाव्या लागतात. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानं बंद असण्याची आपल्याला सवयच नाहीये. पण इथे आल्यापासून असल्या भयंकर गोष्टींची सवय होतीये हळुहळु!

शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे आज बरीच गर्दी होती. मी आपलं माझं बास्केट घेऊन पेमेन्टच्या रांगेत उभी होते. हम जिस लाईनमें खडे होते है वो लाईन हमेशा... मुंगीच्या पावलाने पुढे सरकते! बिलिंग काउंटरला एक टॅटूड काकु होत्या. चेहरा सोडुन, काकुंच्या गळ्यावर, मानेवर, हातावर टॅटूवाल्याकडचे सगळे टॅटु होते बहुतेक. फक्त नाक आणि कान टोचलेले असतात अशा गैरसमजात लहानाची मोठी झालेल्या मला काकुंना बघुन कळले की नाक आणि कान न टोचता गाल, ओठ आणि भुवई टोचतात म्हणजे पिअर्सिंग की काय ते! काकुंच्या दोन्ही गालावर आणि ओठात मोरण्या होत्या आणि भुवयांना छोट्या रिंग्ज.

रांगेतील सगळ्यात पुढे असलेल्या नव्वद वर्षीय आज्जींचे काकूंसोबत काहीतरी वाद चालले होते. त्यांना कुठलीतरी वस्तू परत करायची होती आणि काकु नाही म्हणत होती. असे नव्वदीचे आजी-आजोबा एकएकटे किंवा जोडीने हमखास दिसतात खरेदी करताना. वॉकर घेऊन चालतात. त्यांच्याकडे बघून नेहमी दोन टोकाचे विचार माझ्या मनात येतात. एक, बापरे या वयातही स्वतःचं सगळं किती व्यवस्थित करतात आणि दोन, आईगं या वयात यांना एकटंच सगळं करावं लागतं! 

तर आजी-काकूंचा वाद सुटला एकदाचा आणि रांग थोडी पुढे सरकली. माझं  हे सगळं निरीक्षण चालू होतं त्यामुळे माझ्या समोर उभ्या असलेल्या ताईच्या सामानाकडे अजिबात लक्ष गेलं नाही. ती माझ्या समोरच असल्यामुळे तिच्या सामानाचं जेव्हा बिलिंग सुरु झालं तेव्हाच मी पाहिलं. ताई पिशवी घेऊन उभी होती आणि बिल झालेली एकेक गोष्ट पिशवीत टाकत होती. तिच्या सगळ्या वस्तूंचं बिलिंग काकू इतक्या शांतपणे करत होत्या की जसंकाही त्या बरेच वर्ष हिमालयात तपश्चर्या करून आल्या आहेत किंवा सहनशक्तीच बाळकडु त्यांच्या आईने घुटीमध्येच त्यांना दिलंय कारण ताईचं सामान बघुन मला बिलिंगवल्या काकूंचे चरणस्पर्श करावे वाटले!

ताईच्या सामानात प्रत्येकी फक्त एक नग खालील गोष्टी होत्या - सफरचंद,बटाटा, टमाटा, कांदा, लसूण, काकडी, संत्री, लिंबू, गाजर, बेबीकॉर्न, प्लम, केळी, ब्रेड, छोटसं चॉकलेट, कांद्याची पात आणि सरतेशेवटी एकच छोटीशी हिरवी मिरची. त्या छोट्या मिरचीचेही
व्यवस्थित वजन वगैरे करून काकुंनी बिल लावलं. किती सेण्टला एक मिरची पडली हो? असा प्रश्न ओठांपर्यंत आलेला मागे घेतला मी आणि उगाचच आपलं ताईचं बास्केट आणि बिलिंग काउंटर पुन्हा चेक केलं म्हटलं एखादं पालकचं पान किंवा कोथिंबिरीची दांडी विसरलेली असायची. तर खरंच  बेसिलची एक दांडी राहिली होती. ती दांडीही यथोचित सोपस्कार होऊन ताईच्या पिशवीत दिमाखात विराजमान झाली आणि बिल काकूंच्या कम्प्युटरवर पोहोचले. एवढं सगळं झाल्यावर बिलाचे पैसेही ताईने एक एक सेंट मोजुन दिले अक्षरशः आणि काकूंनीही हसतमुखाने बिलाचे पैसे घेऊन ताईला "बाय हॅव अ नाईस डे" विश केलं. हे सगळं बघुन एक विचार माझ्या मनात चमकुन गेला की असं काही पाहिल्यावर डोळे मिटायला मोकळी वगैरे बोलुन तर बसले नाहीये ना मी? उगी जीव वगैरे द्यावा लागायचा!!

या धक्क्यातून कसबसं सावरून बिलिंगला सुरुवात झाल्यावर मात्र वाटलं की माझ्याजवळ असलेल्या चार लिटर दूध, २ किलो बटाटे, २ किलो कांदे, एक किलो टमाटे, अर्धा डझन केळी, २ मोठ्या कॅडबऱ्या आणि असं बरच काही सहित धरणीमातेने मला पोटात घ्यावे!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                     
              

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

अच्छे दिन

  आपण आपलं रोज WA वर आलेले गुड मॉर्निंग, गुड नाईट, शुभ सकाळ, शुभ रात्र, शुभ दुपार, सुविचार, जागतिक अमका दिवस, ढमका दिवस, हे खा - ते खाऊ नका, वपुंचे वाक्य पुलंच्या नावाने लिहिणे, गेला बाजार नाना, नांगरे इत्यादी इत्यादी मेसेज निगुतीने डिलीट करावे (चित्रमय असेल तर डाऊनलोडही न करता). इतकं प्रचंड ज्ञानामृत उभ्या आयुष्यात मिळालं नाही जे आजकाल WA आणि FB वर मिळतं. इतकी संस्कारी शाळा शिक्षकांनीही कधी घेतली नाही आपली. असो.

   एक दिवस ईमेल चेक करताना एका मेलने लक्ष वेधुन घेतले. एका जर्मन काकांनी मेल केला होता. मेलमध्ये लिहिले होते कि "तुमचा प्रोफाइल अमुकतमुक ट्रान्सलेशन साईटवर दिसला. तुम्ही भारतीय आहेत हे कळाले.मला तुम्ही जरा मदत केलीत तर चांगलं होईल. हिंदी-जर्मनमध्ये अनुवाद करून देऊ शकतात का आपण? माझ्याकडे काही फार मोठे डॉक्युमेंट्स नाहीत, अधुनमधून छोट्या फाईल्स किंवा टेक्स्ट मी तुम्हाला पाठवेन." मी उत्तरादाखल "हो" म्हणून कळवले. पण माझी उत्सुकता मला शांत बसु देईना, म्हणुन मी काकांना मेलमध्ये विचारलेच, "नक्की कोणत्या डोमेनमधले काम आहे ट्रान्स्लेशनचे?" काकांचे उत्तर आले की "डोमेन वगैरे काही नाही साधे वाक्य आहेत. जमेल ना तुम्हाला?" मी पुन्हा मेल केला "कृपया एखादा नमुना पाठवला तर मला लक्षात येईल."


  यावर काकांचं जे उत्तर आलं त्या उत्तराने "Karma is a बी**" ह्या उक्तीवर पूर्णपणे विश्वास बसलाय माझा. काकांनी मला मेलमध्ये अनुवादासाठी पाठवलेले वाक्य-


 *```👁आँख दुनिया की हर एक चीज देखती है, मगर जब आँख के अन्दर कुछ चला जाए तो उसे नहीं देख पाती.....

```**```बिल्कुल इसी तरह इंसान दूसरो कि गलती तो देखता है पर अपनी गलती उसे नजर नही आती है।```*

निंदा से घबराकर अपने लक्ष्य को ना छोड़े.

क्योंकि लक्ष्य मिलते ही निंदा करने वालों की बदल जाती है... 
सुप्रभात

   हे वाचून भोवळ कि काय म्हणतात तेवढीच यायची बाकी होती. कहर म्हणजे काकांनी मेलमध्ये लिहिलंय की त्यांचा एक भारतीय फेसबुक फ्रेंड त्यांना असे मेसेजेस WA वर पाठवतो म्हणे आणि म्हणतो कि तू तुझा अर्थ शोध! ती नक्कीच फेसबुक फ्रेंडीन असावी अशी मला दाट शंका आहे खरंतर कारण हे भारी काका पैसे देऊन ह्या मेसेजेसचा अनुवाद करून घेत आहेत म्हणून वाटलं आपलं!झुकरबर्गांच्या मार्कनी खुप होतकरूंना कामाला लावलं खरंच.अजुन किती अच्छे दिन पाहिजे म्हणते मी!!


   काका मला एक दिवसाआड असे सुंदर सुंदर वाक्य मेल करतात आणि मी त्यांना अनुवाद करून पाठवते. तर ह्या स तर हे धन्य काका आता गळ्या जर्मन अनुवादांचे एक सुंदर पत्र लिहावं आणि मॅगी काकूंच्या दारात ठेऊन द्यावं म्हणतेय!! ते सिक्रेट सँटा कि काय असतं ना काहीतरी!!


 सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                             #rajashrismunichdiaries 

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

चवदार

रविवारची बोअरिंग संध्याकाळ... त्यात मी विचारलं " फुलकोबीची भाजी करू का?"... इतका भयंकर प्रश्न विचारल्यामुळे घरात प्रचंड विरोध आणि निषेधाचं वातावरण तयार झालं... भारतात उद्या होईल... पोस्ट अजिबात राजकीय नाहीये त्यामुळे राजकीय रंग देऊ नये.. असो.
तर अशा बोअरिंग संध्याकाळी मोठा फुलकोबीचा गड्डा बघुन प्रचंड दडपण आलं... म्हणून मग युट्युबला शरण जाऊन.. फुलकोबीला मस्त खुसखुशीत बनवलं... फुलकोबीच्या नावाने नाकं मुरडणाऱ्यानी "वाह..वाह" म्हणुन मुटुमुटू संपवला हा पदार्थ... फुलकोबीचे मन्चुरअन स्टाईल भजे!
कोणत्याही प्रकारचे भजे केल्यावर कांदाभजी केली नाहीत तर पाप लागतं, हो ना? म्हणून मग रविवारच्या बोअरिंग संध्याकाळला अजून खुमासदार करण्यासाठी कांदाभजी... बाहेर पडणारा पांढराशुभ्र बर्फ आणि घरात मस्त खुसखुशीत भजे आणि मसाला चहा.. अहाहा!!
खूप दिवसांनी रविवार संध्याकाळ चवदार झाली!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                 


मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

फिलिंग भारतात असल्यावानी...

महत्वाच्या कामासाठी घरातून निघायलाच उशीर होणे. 
म्यूनिचमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच चक्क ट्रॅफिक जॅम मध्ये बस अडकणे आणि कर्मधर्मसंयोगाने तुम्ही त्याच बसमध्ये असणे. पंधरा मिनिटांच्या प्रवासाला एक-सव्वा तास लागणे. 
बसमधील प्रामधारी लेकराने ट्रॅफिक जॅमला कंटाळुन पुर्ण प्रवासभर रडका सूर आळवूण समस्त बसवासियांचे मनोरंजन करणे. बसवासियांनी आणि  बसचालकाने वेगवेगळे लूक देऊनही प्रामधारी लेकराची आई स्थितप्रज्ञ असणे.
त्या प्रामधारी लेकराच्या माऊलीची सहनशक्ती पाहुन तुमच्या सहनशक्तीविषयी (लेकासाठी असलेली) तुम्हाला प्रचंड कॉम्प्लेक्स येणे.
कसंतरी ट्रॅफिक जॅममधुन बाहेर पडून, स्टॉपवर उतरून, बावळटसारखं सायकल ट्रॅकवरच उभं राहुन भारतीय दूतावासाचा पत्ता शोधणे आणि मागुन आलेल्या सायकलवाल्याने "काय अडाणी बाई आहे" असा लुक देणे. 
बरोबर वेळेवर इंटरनेट आणि गुगल मॅप्स लोड व्हायला उशीर झाल्याने पत्ता शोधत चारीही दिशांना भटकणे आणि गुगल मॅप्स लोड झाल्यावर तुमच्या लक्षात येणे की तुम्ही बरोबर उलट्या दिशेला अर्धा किलोमीटर पुढे गेलेले आहात. म्हणून पुन्हा आल्या पावली परत जाणे. 
भारतीय दूतावासासमोरील तिरंगा पाहून मन भरून येणे. 
कामाची वेळ संपायच्या फक्त वीस मिनिटे आधी ऑफिसला पोहचणे आणि तिथला अधिकारी फॉर्म घेण्याच्या खिडकीत नसणे. तुमच्या आधी आलेल्या बऱ्याच लोकांनी टोकन मशीन मधुन वचावचा(एकाच वेळी फर्रर्रर्रर्र करून ३-४ टोकन) टोकन घेणे आणि त्यातले एक टोकन जवळ ठेऊन बाकीचे कचऱ्यात टाकणे. कचऱ्याचा डबा वेगवेगळ्या कागदपत्रांनी आणि टोकन्सनी भरून वाहणे, इतस्ततः कागदी कचरा सांडलेला असणे. 
एक महाभाग तुमच्या बाजुलाच येऊन बसणे ज्यांना फॉर्म कसा भरायचा हे माहित नसणे. त्यांनी प्रत्येक वाक्याचा तुम्हाला अर्थ विचारणे आणि सांगितल्यावर,  वाक्यागणिक म्हणणे "ये सही तो है ना? नही तो मुझे फिरसे नया फॉर्म भरना पडेगा." 
.  
पाच मिनिटांनी अधिकाऱ्याचे आगमन होणे आणि तुमच्या आधी अख्ख एक कुटुंब (हम दो हमारे दो) पासपोर्ट रिन्यू करायला असणे. त्या अधिकाऱ्याची आणि कुटुंबप्रमुखाची आधी इंग्लिशमध्ये सुरुवात होऊन नंतर राष्ट्रभाषेमध्ये शाब्दिक बाचाबाची होणे. 

अ: This form is not properly filled. 
कुप्र : Its okay, I will fill that now. You please check other forms. 
अ: What is this? Birth place की जगह birth date लिखा है आपने. बच्चे के नाम के जगह अपना नाम लिखा है. ये फोटो किस साईज के है? ५ बाय ५ के चाहिये. आपके वाईफकी सिग्नेचरकी जगह आपने अपने सिग्नेचर किये है. 
कुप्र: सर एकही फॉर्म मी गलती हुई है आप अड्जस्ट कर लिजिए ना. 
अ: एक फॉर्म में नही सभी फॉर्म में गलत है. आप लोग ऐसे कुछ भी फॉर्म भरके लेके आते हो और हमें गलिया देते हो कि पासपोर्ट गलत छपवाया. आप कल आईये. 
कुप्र: सर प्लिज देखिये ना कुछ अड्जस्ट होता है तो. बच्चे लेकर इतनी ठंडमें फिरसे आना पडेगा. 
अ: नही भाई, टाईम खतम हो गया, आप कल आईये. 
अशा प्रेमळ संवादानंतर, तुमचा टोकन नंबर स्क्रीनवर झळकणे आणि वैतागलेल्या अधिकाऱ्याने तुमचा फॉर्म नीट न पाहताच, हे नाहीये ते नाहीये उद्या या असे राष्ट्रभाषेतच सांगणे. तरीही दिल चाहता है मधील सैफ सारखे तुम्ही मध्ये मध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणे आणि तो फसणे. जसं की -

अ: ये क्या है? यहाँ सिग्नेचर क्यु नहीं है?
मी: लेकीन ये तो... 
लगेच अ: ये विजा पुराना है 
मी: आप ठिकसे.. 
लगेच अ: कार्ड की कॉपी नही है
मी: मगर हमें तो... 
लगेच अ: मॅडम टाईम खतम हो गया, आप कल आईये. 

आणि खिडकी बंद होणे. 
"आ बैल मुझे मार" या उक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नवऱ्याला स्वतःच फोन लावुन वरील अनुभवाचे कथन करणे आणि त्याच्या शिव्या खाणे. 
मी तेच म्हटलं, खुप दिवसांपासून फार चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं मला. आज कळालं मी काय मिस करत होते ते!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                          #rajashrismunichdiaries

वाचकांना आवडलेले काही