शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

अनपेक्षित

   परवा बाहेरून घरी येत होते, स्टेशनमधुन वर आले आणि घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अगदी वाहता रस्ता आहे. पण २-३ वर्षात एकदाही पोलीस कार आणि ऍम्ब्युलन्स शिवाय एकाही गाडीच्या हॉर्नचा आवाज नाही ऐकला कधी! वेगवेगळ्या आवाजांसाठी वेळा ठरलेल्या आहेत कदाचित इथल्या रुलबुकमध्ये कारण एकदा सकाळी पावणे सात वाजता आम्ही बस पकडायला स्टॉपकडे पळत चाललो होतो. आमच्या पायांच्या आवाजामुळे जवळच असलेल्या बेकरीमधले आजोबा बाहेर आले वसक्कन वसकलेच आमच्यावर, "इथे सकाळी सातच्या आत पायांचा आवाज नाही करायचा, एवढं माहिती नाही तुम्हाला! पळू नका चालत जा." हे ऐकुन लेक तर टरकलाच बिचारा. तेव्हापासून भर दिवसाही पळायची भीती बसलीये.
  
   पण "अगा जे घडलेची नाही" असं काहीसं झालं. अचानक ४-५ गाड्यांचे हॉर्न ऐकु यायला लागले; तेही अगदी जोरात आणि तालासुरात.जवळच्या सगळ्या दुकानांमधून लोक बाहेर आले नक्की काय चाललंय ते पाहायला. माझ्या सहित आजूबाजूचे सगळे लोक गाड्या येत होत्या त्या दिशेने बघायला लागले. मी पण जागीच थबकले आणि "आँ" असे भाव चेहऱ्यावर आले. बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर "काय कटकट आहे" तत्सम भाव. त्याला कारणही तसेच होते. ती लग्नाची वरात होती!! मला गंमतच वाटली. वरात जर्मन लोकांची नव्हती पण, तुर्कीश होती. "परवानगी बरी मिळाली त्यांना" असा बालिश विचार मनात आला. जसं काही लेकाच्या मुंजीची वरात काढायची परवानगीच नाकारलीये मला. 

  असाच अजून एक विलक्षण अनुभव आला. मागच्या आठवड्यात आम्हाला फोन आला की घरात नवीन "स्मोक डिटेक्टर्स" बसवायचे आहे. तुमचा वेळ सांगा त्यावेळी आमचे लोक बसवून जातील. आम्ही वेळ सांगितली. शुक्रवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता बेल वाजली. मला वाटलं एखादा मनुष्य असेल पण दार उघडल्यावर अक्षरशः धक्काच बसला. वयवर्षे ७० ते ७५ च्या आसपासचे आजी-आजोबा दारात उभे होते. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य त्यांना कळलं बहुतेक कारण आजोबा जर्मन मध्ये म्हणाले " हो आम्हीच बसवणार आहोत स्मोक डिटेक्टर्स." 

  दोघेही घरात आले, मला आणि लेकाला प्रेमाने ग्रीट केलं आणि कामाला लागले. आजी सगळं पेपरवर्क तपासत होत्या आणि आजोबांनी डिवाइस लावायची तयारी सुरु केली. आजोबानी खुर्ची घेतली आणि चढायला लागले, तर लेक पटकन म्हणाला " मी मदत करतो तुम्हाला." आजोबा म्हणतात कसे " अरेवा हुशार आहेस तु. पण धन्यवाद. मी एकदम फिट अँड फाईन आहे." आजोबानी पटापट तिन्ही स्मोक डिटेक्टर्स लावून टाकले आणि आज्जीनी माझी सही घेतली. मी विचारलं कॉफी घेता का दोघे? तर मला नम्रपणे नकार दिला त्यांनी आणि म्हणाले "आम्हाला अजुन तीन ठिकाणी जायचं आहे. तुमचा मुलगा खूपच काईन्ड आहे. गॉड ब्लेस हिम!" आणि निरोप घेऊन निघून गेले. अशा अनपेक्षित गोष्टी घडल्या की फार मस्त वाटतं!!

सकाळी आपल्या आधी उठुन, नवऱ्याने विचारलेला "चहा टाकु का?" हा प्रश्न मात्र अनपेक्षितच्या लिस्टमध्ये नेहमीच पहिला असेल. 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही