गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

केमिकल लोचा

तुम्ही, इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत,  सर्दीने हैराण झाल्यावर, सुट्टीवर गेलेले डॉक्टर कधी एकदा क्लीनिक उघडतील आणि कधी त्यांना भेटाल ह्याची वाट पाहता. हो, इथे साधारण क्रिसमसच्या आधीच्या शनवार रैवारपासून ते सहा जानेवारीपर्यंत, मधल्या एखाद दोन सन्माननीय दिवसांचे अपवाद वगळता, अख्खी जर्मनी सुट्टीवर असते. इमर्जन्सी सेवेतले काही कर्मचारी वगळता! 

दोन जानेवारीला आजारी लोकांची दया येऊन डॉक्टर अर्धा दिवस क्लिनिक उघडतात. तुमचे हे तुमची परिस्थिती पाहून आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवतात. क्लिनिकमध्ये शिरताच तिथे उसळलेला आजारी लोकांचा जनसागर पाहून तुम्ही गपगार होता.  

डॉक्टर दादा एशियन असतो, त्याला भेटल्यावर कळतं की आपली जर्मन डॉक्टर फारच प्रेमळ आहे. तपासून झाल्यावर तो स्पष्ट शब्दात सांगतो की “गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन तुमच्या इन्शुरंस कार्डवर आहे”. तरी बाहेर येऊन तुम्ही बावळटसारखं ते कार्ड रिसेप्शन ताईला देता आणि तिच्याकडे बघत बसता. 

दोन्ही नाकपुड्यांमध्ये, ओठांत आणि कानांत मोरण्या घातलेली रिसेप्शन ताई “काय बाई आहे!” असे भाव डोळ्यांत आणून तुमच्याकडे बघते आणि सांगते “ओ ताई, तुमच्या गोळ्या इन्शुरन्स  कार्डवरच आहेत (हे कार्ड मला कशाला दिलंय? निघा आता!“). 

ते ऐकून तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तुम्ही तिथून निघता.  अवतार नीट करायला वॉशरूममध्ये जाता. तुमच्या डोक्यात ट्रेन मिळेल का? मैत्रिणींना भेटायला उशीर तर नाही होणार ना? वगैरे विचार चालू असतात. त्याच नादात तुम्ही खालीच असलेल्या औषधांच्या दुकानात जाता आणि तुम्हाला तुमचं इन्शुरन्स कार्डच सापडत नाही. सैरभैर होऊन तुम्ही जॅकेटचे खिसे, पर्स, लिफ्ट सगळं शोधलेलं असते. 

गडबडीत वर जाऊन तुम्ही क्लीनिकमध्ये मोरणी रिसेप्शनिस्टला विचारता की माझं कार्ड इथे राहिलंय का? ती थोबा.. तोंडही वर न करता नाही म्हणते. आता तुम्ही वॉशरूममधे जाऊन शोधता. तिथले टॉयलेट पेपर्सचे रोल पाहून तुमची नुसती चिडचिड होते. “अरे काय लोक आहेत राव, एका कागदाच्या तुकड्यावर प्रिस्क्रिप्शन छापून द्यायला काय होतं ह्यांना आधीसारखं? काय तर म्हणे कागद वाचवा मोहीम! इथं एवढे भसाभसा टॉयलेट पेपर वापरता, ते गेलं का गाढवाच्या गां**? हे मेलं, घाला ते पेपर चुलीत आणि इकडं कागदं वापरा!”

वॉशरूममधून बाहेर येऊन तुम्ही दोन वेळा अख्ख क्लिनिक आणि लिफ्ट शोधता पण कार्ड सापडेल तर शपथ! आता तुमची सहानशक्ती संपायला लागते आणि तुम्ही क्लिनिकच्या खाली असलेल्या स्टेशनवर येता. आधीच थंडीने जीव नकोसा केलेला असतो, त्यात तुम्हाला मैत्रिणींना भेटायला जायला उशीर होत असतो आणि सगळ्यांत महत्वाचं “उस कार्ड का कही नामोनिशान” मिळत नसतो. तुम्हाला वाटतं मरो तेज्या** ते औषध, कार्डच नाहीये  तर “मी चालले मैत्रिणींना भेटायला". 

पण कार्ड हरवलेलं सांगायला तुम्ही पॅनिक मोडमधे तुमच्या “आयुष्यभराच्या स्वीय सहायकाला” फोन करता! तुमचा फोनवरचा सगळा रागराग ऐकून, सुट्टीमुळे घरात असलेला लेक, कार्ड हरवल्याचं ऐकून, पुस्तकातून डोकं वर काढून “व्वा" असं जोरात ओरडतो आणि पुन्हा त्याच्या कामाला लागतो. तेव्हा हे शांतपणे म्हणतात “तू तुझं जॅकेट आणि पुलोवरचे खिसे तपासलेस का?” 

पुन्हा तुमची ट्यूब पेटते आणि तुम्ही जॅकेट काढून पुलोवरचा खिसा तपासता आणि तुम्हाला तुमचं कार्ड हाताला लागतं. खिश्यात कार्ड आणि क्लिनिकला वळसे! यथावकाश पुन्हा दुकानात जाऊन तुम्ही औषध खरेदी करता आणि आनंदाने मैत्रिणींना भेटायला रवाना  होता. 

ह्या प्रसंगानंतर तुम्हाला कळतं की आजकाल असे किस्से तुमच्या रोजच्या आयुष्याचा भागच झालेत. ब्रेन फॉग की कायसं! एकदा सकाळची डब्याची गडबडीचा वेळ असते. भाजीत मीठ टाकायला म्हणून सरावाच्या ठिकाणी ठेवलेलं मिठाचं पाळंच जागेवर नसतं. स्वयंपाकघरातले झाडून सगळे कपाटं शोधूनही ते काही सापडत नाही. थकूनभागून तुम्ही शोध थांबवता आणि कोथिंबीर काढायला फ्रिज उघडता. तर समोर मिठाचं पाळं! आदल्या रात्री सगळं आवरताना तुम्ही मीठ फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं! मीठ आणि फ्रिजमध्ये? ये कौनसा केमिकल लोचा है भाई? 

लोकांची नावं न आठवणं, त्याऐवजी “त्या ह्यांची ही नाही का, ती जर्मनीतल्या त्या ह्या गावात आलीये” असं सांगणं! “ती ही खाली आलीये का?” आता समोरच्या माणसानेच ठरवायचं की मी कचऱ्याच्या बिनविषयी बोलतेय, मुलीविषयी नाही. एखादी वस्तू कुठे आहे विचारल्यावर “ते हे आहे ना तिथे". काहीतरी आठवून एखाद्या खोलीत जाणं आणि आपण इथे नक्की कशासाठी आलोय हेच विसरून जाणं. एक काम डोक्यात योजून भलतंच काम करणं! इत्यादी इत्यादी. 

तुम्ही ठरवता की आता बास्स! ह्या आणि अशा गोष्टींची यादी करूच म्हणून फोन हातात घेता आणि स्वयंपाक घरातून काहीतरी जळाल्याचा वास येतो!! 

#हाय_रे_कर्मा  #न_जाने_मेरे_दिमाग_को_क्या_हो_गया 

#माझ_म्युनिक_डायरी 


तटी: फोटोचा आणि लिखाणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाहीये हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल ह्याठिकाणी!





मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

मन धावतया

यंदा इथे थंडीचा कहर झालाय. बरेच दिवस झाले पारा शून्याच्या वर गेला नाहीये. सतत उणे तापमान. मागच्या दोन चार दिवसांत तर जर्मनीतल्या काही भागात उणे २१ पर्यंत पारा गेला होता, त्यामानाने म्युनिकमधे उणे १४ वगैरे आहे, म्हणजे बरंच म्हणायचं. 

अशी थंडी पडली आणि जानेवारी आला की माझं मन राधिका भिडेच्या गाण्यातल्यासारखं भारतात धावतं. ”मन धावतया माहेरच्या शेतात, डोलतया जोंधळ्याच्या मागं। जावं जिथं कुठं तिथं, नाव येई “हुरड्याचं” व्हटी!” असं काहीतरी वाटायला लागतं. माहेरच्या शेतातला #हुरडा ही माझ्यासाठी फार भारी आठवण आहे. 

छ. संभाजीनगरला आईकडे गेलं की, वडील गावाकडे आमच्या दाजींना कळवतात की आम्ही उद्या हुरडा खायला येतोय. मग आईची हुरड्याबरोबर खायच्या चटण्यांची तयारी सुरु होते. मी आपली  लहान मुलीसारखी तिला जी लागेल ती तयारी करून देते. पण ती लसूण, लाल तिखट घातलेली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची खरपूस चटणी तिनेच करायची. ती चव माझ्या हाताला कुठे! 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून आधी कडेठाणच्या देवीला जायचं आणि मग शेतात, हा आमचा शिरस्ताच आहे. कडेठाण आमच्या गावापासून जवळच आहे. देवीची ओटी भरून, छान दर्शन घेऊन, तिथल्या लोकांशी बोलून तिथून गावच्या रस्त्याला लागायचं. 

आता ते दोन चार मैलांचं अंतरही जास्त वाटायला लागतं. तिकडे दाजींनी शेतात आगटी पेटवून ठेवलेली असते. आम्ही शेतात पोहोचायचा अवकाश की लगेच ज्वारीची टपोरी कणसं आगटीत भाजायला गेलेले असतात. त्या आगटीच्या आजूबाजूला जाजमं अंथरून, कागदावर मीठ, चटण्या घेऊन कणीस भाजायची वाट पाहणे म्हणजे “ब्रह्मानंदी टाळी" वगैरे! दाजी जेव्हा ते भाजलेलं गरम गरम कणीस हातावर चोळून तो हुरडा आपल्या हातात देतात तेव्हा कुठे जीव भांड्यात पडतो. 

सुख म्हणजे नक्की काय असतं? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, “शेतात विहिरीजवळ बसून गरमगरम हुरडा खाणे. हे झाल्यावर शेतात चक्कर मारत असताना, यंदाच्या लागवडीवरची दाजींची कमेंट्री ऐकणे. नंतर दाजींची बायको बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी आणि ठेचा घेऊन येताच त्यावर ताव मारणे. नंतर द्रोणात  दहीसाखर घेऊन ते कणसाच्या ओंबीने खाणे!” अहाहा!! 

पण.... हे सगळं दरवर्षी अनुभवता येतंच नाही. मग मी घरात जपून ठेवलेल्या, वाळलेल्या हुरड्याची उसळ करते. सकाळी उठल्यावर थोडे हरबरे गरम पाण्यात भिजत घालायचे. ते चांगले भिजले की कुकरच्या भांड्यात वाळलेला हुरडा, भिजलेले हरबरे आणि थोडे शेंगदाणे टाकायचे. अंदाजाने पाणी आणि मीठ टाकून, हे भांडं कुकरला लावायचं. भरपूर शिट्या होऊ द्यायच्या. हुरड्याचा खरपूस वास दरवळला की गॅस बंद. कुकर शांत होईपर्यंत तेलात थोडी मोहरी आणि छानपैकी हिंग घालून फोडणी तयार ठेवायची. फोडणीत जिरे नकोच. हुरड्याची चव घालवायची नाही. 

आता एका वाटीत गरम हुरड्याची उसळ, त्यात यथेच्छ फोडणीचं तेल घ्यायचं (आवडत असेल तर थोडं लाल तिखट) आणि बर्फाच्छादीत आल्प्सकडे बघत, मराठवाड्यातल्या गावाची आठवण काढत, भुरका मारत त्यावर ताव मारायचा! 

#माझी_म्युनिक_डायरी 

#सुख_म्हणजे_नक्की_काय_असतं




वाचकांना आवडलेले काही