सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

जर्मन लोणचं

साधारणपणे लोणचं म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर कैरीचं, लिंबाचं, मिरचीचं, आवळ्याचं, मिश्र भाज्यांचं इत्यादी लोणची येतात. तसं तर संपूर्ण भारतात हजारो प्रकारची लोणची असतील. पण त्यात “बिनतिखटाचं लोणचं” ही कल्पनाही करवत नाही, कारण तिखटाशिवाय आपली लोणची अपूर्ण आहेत. 

पण जर्मन लोकांना तिखटाचं तर वावडं आहेच पण मिठाचंही आहे. तरीही ते लोणचं करतात आणि खातात सुद्धा. इथल्या लोकांचं सगळ्यात आवडीचं लोणचं म्हणजे काकडीचं लोणचं! 

ते करण्याची पद्धतही सोपी आहे. व्हिनेगरमध्ये जेवढ्यास तेवढं पाणी, थोडं मीठ, भरपूर साखर, एक चमचाभर पिवळी मोहरी, ८-१० मिरे टाकून ३-४ मिनिट उकळून घेतात. एका बाटलीत थोडा शेपू (बाबो शेपू!), छोटे कांदे टाकल्यावर, स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काकड्या घट्ट बसवतात आणि त्यावर उकळलेलं व्हिनेगरचं पाणी टाकतात. चोवीस तास ही लोणच्याची बाटली बाहेर ठेवून नंतर फ्रिजमध्ये ठेवतात. झालं लोणचं! ह्याच पद्धतीने ह्या लोकांनी हाताला येईल त्या भाजीला व्हिनेगरमध्ये बुडवलं आहे आणि त्याला अमुक, ढमुक, तमुक भाजीचे लोणचे असे गोंडस नाव दिलंय! 

त्या लोणच्यांमध्ये इथे उपलबध असणाऱ्या झाडून सगळ्या भाज्या म्हणजेच अजिबात तिखट नसलेली वेगवेगळ्या रंगाची सिमला मिरची, श्रवणघेवडा, बेबीकॉर्न्स, गाजर, बीट, मश्रुम, हालापिनो, शतावरी, ऑलिव्ह, तिखटाचा लवलेशही नसलेल्या मिरच्या इत्यादी आहेत. महत्वाचं म्हणजे युरोपमधील अत्यंत आवडत्या बटाट्यालाही व्हिनेगरमधे बुडवलंय ह्या लोकांनी. 

इथल्या लोकांना एकंदरच आंबट गोष्टी आवडतात. म्हणजे इथलं प्रत्येक फळ बऱ्यापैकी आंबट आहे, संत्री, सगळ्या बेरीज, इत्यादी. त्यामुळे कदाचित त्यांना ती व्हिनेगरची अती आंबट चव चांगली वाटत असावी पण आपल्या टेस्ट बड्सला आंबटचिंच व्हिनेगर जरा त्रासदायकच आहे! 

मी एक पाहिलंय जर्मन लोक स्वयंपाकाचा फार त्रास करून घेत नाहीत. सोपं आहे आयुष्य त्याबाबतीत त्याचं. दुकानातून, बेकरीतून लागेल त्या गोष्टी आणायच्या आणि घरी येऊन त्या फक्त एकत्र (Assemble) करायच्या आणि खायच्या. उदाहरणार्थ बेकरीतून आवडता ताजा ब्रेड आणायचा, दुकानातून एखादा चिजस्प्रेड आणि हॅम स्लाईसेस आणायच्या, त्याचं सँडविच करायचं आणि दुकानात तयारच असलेलं मिक्सड सलाड आणि काकडीच्या लोणच्यासोबत ते खायचं. झालं ह्यांचं जेवण!! बाकी हे सगळं पचायला बिअर आणि वाईनचचे कारखाने आहेतच की, हाय काय अन नाय! 

जर्मन लोकांची हीच असेम्बलिंगची आवड ओळखून आयकियाने (IKEA) इथे जम बसवला असावा! असो, विषय भरकटतोय. जर्मन लोणच्यांचा व्हिडीओ टाकायचा होता म्हणून हा पोस्टप्रपंच! 


#माझी_म्युनिक_डायरी 

#gewürzgurken #pickles 


Video Link:

https://www.facebook.com/share/r/1KUEyb1Bfs/?mibextid=wwXIfr



मंगळवार, २० जानेवारी, २०२६

ईतना अंधेरा क्यूँ है भाई

२०२६ सुरु झालं नाही तोच बर्लिन मधे बरेच दिवस चक्क लाईट गेले होते. तेव्हा तापमान शून्याच्या खाली होतं. असं म्हणतात की साधारणपणे चाळीस पंचेचाळीस हजार लोक त्यामुळे परेशान झाले होते. तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. 

बर्लिनचं हे प्रकरण एका मित्राला समजलं आणि त्याने मला असंच मेसेज केला की “म्युनिक मधे लाईट आहेत ना? का तिथे पण बर्लिनसारखं झालंय?” ह्या प्रश्नावर नुसतं “इथे लाईट नाही गेले” असं उत्तर मला देता आलं असतं! पण लैच श्यानपना करून मी “अरे म्युनिकमधे कधीच लाईट जात नाहीत 😎” असं उत्तर दिलं! लगे गॉगलवाली ईमोजी, जसं काही इथली वीजपुरवठा कंपनी माझ्या भावाचीच आहे!  

आणि पुढच्या दोनच दिवसांत, लहानपणी शाळेत शिकलेले सगळे सुविचार, म्हणी माझ्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागल्या! अती शहाणा त्याचा बैल रिकामा, माणूस सवयीचा गुलाम आहे, गर्वाचे घर खाली, अती तेथे माती, देवाच्या काठीला आवाज नसतो! इत्यादी (ह्यात तुम्ही अजून भर घालू शकता). कारण आमच्या घरातल्या अर्ध्या भागातले लाईट्स अचानक फड्फडायला लागले. एक खोली आणि स्वयंपाकघरातला लाईट लावला की घरात भीतीचं वातावरण पसरत होतं. त्यात इथं सध्या अंधारही साडेचार पाचलाच पडतो आणि दिवस सकाळी आठला उजाडतो त्यामुळे तर अजूनच पंचाईत झाली होती. 

माझ्या मनात भीतीदायक विचार यायला लागले. अती भयकथा वाचल्या आणि भयपट पहिले की असंच होतं! पण मग विचार आला, की ही कुठली विचित्र भुताटकी आहे बुआ? ये भूत आखिर चाहता क्या है? हॅंये! अर्ध्याच घरातले लाईट फडफड करत आहेत. लेकाला म्हणाले मी, तर त्याने light fluctuations ची वैज्ञानिक कारणे सांगून माझी बोलती बंद केली. 

नेमका दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्यामुळे कोणीच दुरुस्त करायला येणार नाही हे माहीतच होतं. मी मागे म्हणल्याप्रमाणे वरून ब्रह्मदेव जरी झाले आले आणि त्यांनी इथल्या लोकांना शनिवार रविवारी काम करायला लावलं तर ते त्यांचंही नाही ऐकणार नाहीत (अपवाद वगळता)! आम्ही आमच्या घरमालकीण ताईंना सगळी  हकीकत कळवली. तर त्या म्हणाल्या “ही काही इमर्जन्सी नाही त्यामुळे आज तर कोणीच येणार नाही दुरुस्त करायला. आता सोमवारीच येतील कोणीतरी.” आता आमच्यावर म्हणायची वेळ आली की “सेह लेंगे थोडा!”

कसचं सेह लेंगे!! सवयच नाही राहीली बिना लाईटचे कामं करायची. शनिवारी संध्याकाळी तर अर्ध घर अंधारात. अर्ध्या घरातल्या विजेने पूर्णपणे असहकार पुकारला होता! मनात म्हणलं कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि गॉगलवाली ईमोजी पाठवत शहाणपणा केला, गेले ना लाईट आता. बस आता हरी हरी करत. 

माझी नुसती तगमग तगमग चाललेली. स्वयंपाकघरात जाताना पटकन बोट खटक्यावर जायचं की लेक म्हणायचा ”आई, अगं लाईट गेलेत ना!“ मी लगेच जेन झी भाषेत “अरे मसल मेमरी रे, काय करू?“ 

स्वयंपाकघरात वीजपूरवठा नव्हता त्यामुळे काहीच सुचत नव्हतं. तरी मेणबत्त्या आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट ह्यावर काम भागवलं कसबसं. नशीब इथले हिटर्स विजेवर चालत नाहीत. नाहीतर उणे तापमानात रात्री गारठायची वेळ आली असती. 

सोमवारी एक दादा दुपारी आला अन त्याने काहीतरी तात्पुरता उपाय करून वीजपुरवठा सुरु करून दिला. जाताना म्हणाला सगळं नीट बघावं लागेल, मी माझ्या बॉसला घेऊन येतो गुरुवारी. 

गुरुवारी दोघे आले. तो दादा इटालियन, आम्ही मराठी आणि ते बॉसकाका जर्मन. असे सगळे वेगवेगळ्या अक्सेंटमध्ये जर्मन बोलत होतो. हा सगळा जर्मन भाषेचा जांगडगुत्ता झालेला असताना, आम्ही सगळे कसंबसं समोरच्याला काय म्हणायचं आहे ते समजून घेत होतो. 

त्यात बॉसकाकांना आमचं घर इतकं आवडलं की विचारूच नका. “म्युनिकमध्ये आठव्या मजल्यावर घर म्हणजे फारच छान हो! वा वा, बाहेर काय छान दिसतंय सगळं, अरेच्या त्या बाजूला गॅलरी आहे आणि आल्प्सही दिसत आहेत, छान छान!“ हे सगळं आम्हाला सांगून झाल्यावर काकांनी बायकोला फोन लावून हे सगळं सांगितलं. आमच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारल्या. मधे मधे त्या इटालियन दादाला सूचना देणं चालूच होतं त्याचं. वल्ली होते काका एकदम! 

त्या दोघांनी सगळं व्यवस्थित तपासून, वीजपुरवठा का खंडीत झाला? त्याचं कारण शोधून, नीट उपाययोजना केली. आम्हाला समजावून सांगितलं काळजी करू नका आता सगळं व्यवस्थित आहे आणि आमचा निरोप घेतला! 

आणि अशा पद्धतीने “म्युनिकमध्ये कधीच लाईट जात नाहीत”, ह्या माझ्या वक्तव्याला खोटं ठरवण्यात माझ्या घरातले लाईट यशस्वी झाले!!

#माझी_म्युनिक_डायरी





शनिवार, १० जानेवारी, २०२६

पाव पुराण

म्युनिकला रहायला आल्यापासून पहिल्यांदा, जेव्हा तुम्हाला जवळच्या जर्मन सुपरमार्केटमध्ये लादीपाव मिळतात तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो!

आता फक्त घरच्यांनी फर्माईश करायचा अवकाश, की मी त्या रेसिपीरीळवाल्यांसारखं  “दस मिनिटमे”,

पावभाजी म्हणू नका,

वडापाव म्हणू नका,

मिसळ पाव म्हणू नका,

दाबेली म्हणू नका,

इत्यादी पदार्थ त्यांच्या समोर हजर करते की नाही ते बघाच!

इथे घरात ओटीजी असल्यामुळे लादीपाव करणं तसं सोपं आहे, पण फार वेळखाऊ प्रकरण आहे, किमान माझ्यासाठी तरी. आता कसं, इथे योग्य दरात लादीपाव मिळत आहेत म्हणल्यावर हे सगळे पदार्थ, आजच ठरवून आजच करता येतील. नाहीतर ह्याआधी,  पावभाजी करायची म्हणलं की, पाव घरी करायचे की ब्रेडचं आणायचे? हा प्रश्न ठरलेला असायचा. 

तर, आम्हा जर्मनीत राहणाऱ्या आणि “सगळंच घरी करावं लागतं राव" म्हणणाऱ्या लोकांची लादीपाव घरी करण्याच्या त्रासातून  सुटका केल्याबद्दल जवळच्या जर्मन सुपरमार्केटच्या बेकरी विभागाचे आभार मानण्यात येत आहेत ह्याठिकाणी आणि एक दिवस शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचीत सत्कारही करण्याचा मानसही आहे, ह्याची नोंद घ्यावी! 

एवढे चार शब्द लिहून मी माझे पावपुराण आवरते घेते आणि वडापावच्या तयारीला लागते. 


#आनंदी_आनंद_गडे 

#माझ_म्युनिक_डायरी



गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

केमिकल लोचा

तुम्ही, इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत,  सर्दीने हैराण झाल्यावर, सुट्टीवर गेलेले डॉक्टर कधी एकदा क्लीनिक उघडतील आणि कधी त्यांना भेटाल ह्याची वाट पाहता. हो, इथे साधारण क्रिसमसच्या आधीच्या शनवार रैवारपासून ते सहा जानेवारीपर्यंत, मधल्या एखाद दोन सन्माननीय दिवसांचे अपवाद वगळता, अख्खी जर्मनी सुट्टीवर असते. इमर्जन्सी सेवेतले काही कर्मचारी वगळता! 

दोन जानेवारीला आजारी लोकांची दया येऊन डॉक्टर अर्धा दिवस क्लिनिक उघडतात. तुमचे हे तुमची परिस्थिती पाहून आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवतात. क्लिनिकमध्ये शिरताच तिथे उसळलेला आजारी लोकांचा जनसागर पाहून तुम्ही गपगार होता.  

डॉक्टर दादा एशियन असतो, त्याला भेटल्यावर कळतं की आपली जर्मन डॉक्टर फारच प्रेमळ आहे. तपासून झाल्यावर तो स्पष्ट शब्दात सांगतो की “गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन तुमच्या इन्शुरंस कार्डवर आहे”. तरी बाहेर येऊन तुम्ही बावळटसारखं ते कार्ड रिसेप्शन ताईला देता आणि तिच्याकडे बघत बसता. 

दोन्ही नाकपुड्यांमध्ये, ओठांत आणि कानांत मोरण्या घातलेली रिसेप्शन ताई “काय बाई आहे!” असे भाव डोळ्यांत आणून तुमच्याकडे बघते आणि सांगते “ओ ताई, तुमच्या गोळ्या इन्शुरन्स  कार्डवरच आहेत (हे कार्ड मला कशाला दिलंय? निघा आता!“). 

ते ऐकून तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तुम्ही तिथून निघता.  अवतार नीट करायला वॉशरूममध्ये जाता. तुमच्या डोक्यात ट्रेन मिळेल का? मैत्रिणींना भेटायला उशीर तर नाही होणार ना? वगैरे विचार चालू असतात. त्याच नादात तुम्ही खालीच असलेल्या औषधांच्या दुकानात जाता आणि तुम्हाला तुमचं इन्शुरन्स कार्डच सापडत नाही. सैरभैर होऊन तुम्ही जॅकेटचे खिसे, पर्स, लिफ्ट सगळं शोधलेलं असते. 

गडबडीत वर जाऊन तुम्ही क्लीनिकमध्ये मोरणी रिसेप्शनिस्टला विचारता की माझं कार्ड इथे राहिलंय का? ती थोबा.. तोंडही वर न करता नाही म्हणते. आता तुम्ही वॉशरूममधे जाऊन शोधता. तिथले टॉयलेट पेपर्सचे रोल पाहून तुमची नुसती चिडचिड होते. “अरे काय लोक आहेत राव, एका कागदाच्या तुकड्यावर प्रिस्क्रिप्शन छापून द्यायला काय होतं ह्यांना आधीसारखं? काय तर म्हणे कागद वाचवा मोहीम! इथं एवढे भसाभसा टॉयलेट पेपर वापरता, ते गेलं का गाढवाच्या गां**? हे मेलं, घाला ते पेपर चुलीत आणि इकडं कागदं वापरा!”

वॉशरूममधून बाहेर येऊन तुम्ही दोन वेळा अख्ख क्लिनिक आणि लिफ्ट शोधता पण कार्ड सापडेल तर शपथ! आता तुमची सहानशक्ती संपायला लागते आणि तुम्ही क्लिनिकच्या खाली असलेल्या स्टेशनवर येता. आधीच थंडीने जीव नकोसा केलेला असतो, त्यात तुम्हाला मैत्रिणींना भेटायला जायला उशीर होत असतो आणि सगळ्यांत महत्वाचं “उस कार्ड का कही नामोनिशान” मिळत नसतो. तुम्हाला वाटतं मरो तेज्या** ते औषध, कार्डच नाहीये  तर “मी चालले मैत्रिणींना भेटायला". 

पण कार्ड हरवलेलं सांगायला तुम्ही पॅनिक मोडमधे तुमच्या “आयुष्यभराच्या स्वीय सहायकाला” फोन करता! तुमचा फोनवरचा सगळा रागराग ऐकून, सुट्टीमुळे घरात असलेला लेक, कार्ड हरवल्याचं ऐकून, पुस्तकातून डोकं वर काढून “व्वा" असं जोरात ओरडतो आणि पुन्हा त्याच्या कामाला लागतो. तेव्हा हे शांतपणे म्हणतात “तू तुझं जॅकेट आणि पुलोवरचे खिसे तपासलेस का?” 

पुन्हा तुमची ट्यूब पेटते आणि तुम्ही जॅकेट काढून पुलोवरचा खिसा तपासता आणि तुम्हाला तुमचं कार्ड हाताला लागतं. खिश्यात कार्ड आणि क्लिनिकला वळसे! यथावकाश पुन्हा दुकानात जाऊन तुम्ही औषध खरेदी करता आणि आनंदाने मैत्रिणींना भेटायला रवाना  होता. 

ह्या प्रसंगानंतर तुम्हाला कळतं की आजकाल असे किस्से तुमच्या रोजच्या आयुष्याचा भागच झालेत. ब्रेन फॉग की कायसं! एकदा सकाळची डब्याची गडबडीचा वेळ असते. भाजीत मीठ टाकायला म्हणून सरावाच्या ठिकाणी ठेवलेलं मिठाचं पाळंच जागेवर नसतं. स्वयंपाकघरातले झाडून सगळे कपाटं शोधूनही ते काही सापडत नाही. थकूनभागून तुम्ही शोध थांबवता आणि कोथिंबीर काढायला फ्रिज उघडता. तर समोर मिठाचं पाळं! आदल्या रात्री सगळं आवरताना तुम्ही मीठ फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं! मीठ आणि फ्रिजमध्ये? ये कौनसा केमिकल लोचा है भाई? 

लोकांची नावं न आठवणं, त्याऐवजी “त्या ह्यांची ही नाही का, ती जर्मनीतल्या त्या ह्या गावात आलीये” असं सांगणं! “ती ही खाली आलीये का?” आता समोरच्या माणसानेच ठरवायचं की मी कचऱ्याच्या बिनविषयी बोलतेय, मुलीविषयी नाही. एखादी वस्तू कुठे आहे विचारल्यावर “ते हे आहे ना तिथे". काहीतरी आठवून एखाद्या खोलीत जाणं आणि आपण इथे नक्की कशासाठी आलोय हेच विसरून जाणं. एक काम डोक्यात योजून भलतंच काम करणं! इत्यादी इत्यादी. 

तुम्ही ठरवता की आता बास्स! ह्या आणि अशा गोष्टींची यादी करूच म्हणून फोन हातात घेता आणि स्वयंपाक घरातून काहीतरी जळाल्याचा वास येतो!! 

#हाय_रे_कर्मा  #न_जाने_मेरे_दिमाग_को_क्या_हो_गया 

#माझ_म्युनिक_डायरी 


तटी: फोटोचा आणि लिखाणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाहीये हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल ह्याठिकाणी!





मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

मन धावतया

यंदा इथे थंडीचा कहर झालाय. बरेच दिवस झाले पारा शून्याच्या वर गेला नाहीये. सतत उणे तापमान. मागच्या दोन चार दिवसांत तर जर्मनीतल्या काही भागात उणे २१ पर्यंत पारा गेला होता, त्यामानाने म्युनिकमधे उणे १४ वगैरे आहे, म्हणजे बरंच म्हणायचं. 

अशी थंडी पडली आणि जानेवारी आला की माझं मन राधिका भिडेच्या गाण्यातल्यासारखं भारतात धावतं. ”मन धावतया माहेरच्या शेतात, डोलतया जोंधळ्याच्या मागं। जावं जिथं कुठं तिथं, नाव येई “हुरड्याचं” व्हटी!” असं काहीतरी वाटायला लागतं. माहेरच्या शेतातला #हुरडा ही माझ्यासाठी फार भारी आठवण आहे. 

छ. संभाजीनगरला आईकडे गेलं की, वडील गावाकडे आमच्या दाजींना कळवतात की आम्ही उद्या हुरडा खायला येतोय. मग आईची हुरड्याबरोबर खायच्या चटण्यांची तयारी सुरु होते. मी आपली  लहान मुलीसारखी तिला जी लागेल ती तयारी करून देते. पण ती लसूण, लाल तिखट घातलेली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची खरपूस चटणी तिनेच करायची. ती चव माझ्या हाताला कुठे! 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून आधी कडेठाणच्या देवीला जायचं आणि मग शेतात, हा आमचा शिरस्ताच आहे. कडेठाण आमच्या गावापासून जवळच आहे. देवीची ओटी भरून, छान दर्शन घेऊन, तिथल्या लोकांशी बोलून तिथून गावच्या रस्त्याला लागायचं. 

आता ते दोन चार मैलांचं अंतरही जास्त वाटायला लागतं. तिकडे दाजींनी शेतात आगटी पेटवून ठेवलेली असते. आम्ही शेतात पोहोचायचा अवकाश की लगेच ज्वारीची टपोरी कणसं आगटीत भाजायला गेलेले असतात. त्या आगटीच्या आजूबाजूला जाजमं अंथरून, कागदावर मीठ, चटण्या घेऊन कणीस भाजायची वाट पाहणे म्हणजे “ब्रह्मानंदी टाळी" वगैरे! दाजी जेव्हा ते भाजलेलं गरम गरम कणीस हातावर चोळून तो हुरडा आपल्या हातात देतात तेव्हा कुठे जीव भांड्यात पडतो. 

सुख म्हणजे नक्की काय असतं? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, “शेतात विहिरीजवळ बसून गरमगरम हुरडा खाणे. हे झाल्यावर शेतात चक्कर मारत असताना, यंदाच्या लागवडीवरची दाजींची कमेंट्री ऐकणे. नंतर दाजींची बायको बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी आणि ठेचा घेऊन येताच त्यावर ताव मारणे. नंतर द्रोणात  दहीसाखर घेऊन ते कणसाच्या ओंबीने खाणे!” अहाहा!! 

पण.... हे सगळं दरवर्षी अनुभवता येतंच नाही. मग मी घरात जपून ठेवलेल्या, वाळलेल्या हुरड्याची उसळ करते. सकाळी उठल्यावर थोडे हरबरे गरम पाण्यात भिजत घालायचे. ते चांगले भिजले की कुकरच्या भांड्यात वाळलेला हुरडा, भिजलेले हरबरे आणि थोडे शेंगदाणे टाकायचे. अंदाजाने पाणी आणि मीठ टाकून, हे भांडं कुकरला लावायचं. भरपूर शिट्या होऊ द्यायच्या. हुरड्याचा खरपूस वास दरवळला की गॅस बंद. कुकर शांत होईपर्यंत तेलात थोडी मोहरी आणि छानपैकी हिंग घालून फोडणी तयार ठेवायची. फोडणीत जिरे नकोच. हुरड्याची चव घालवायची नाही. 

आता एका वाटीत गरम हुरड्याची उसळ, त्यात यथेच्छ फोडणीचं तेल घ्यायचं (आवडत असेल तर थोडं लाल तिखट) आणि बर्फाच्छादीत आल्प्सकडे बघत, मराठवाड्यातल्या गावाची आठवण काढत, भुरका मारत त्यावर ताव मारायचा! 

#माझी_म्युनिक_डायरी 

#सुख_म्हणजे_नक्की_काय_असतं




वाचकांना आवडलेले काही