तुम्हाला वाटत असतं की चला ह्यावर्षी शाळेची सुट्टी दिवाळीत आलीये तर मुलाकडून थोडे कामं करून घेऊ, चांगला तावडीत सापडलाय! पण जेव्हा तुम्ही तुमच्या टीनएजरला कोणतंही काम सांगता तेव्हा तो जास्तीत जास्त चालढकल कशी करता येईल ह्याचा नमुना पेश करतो आणि वर म्हणतो की आई बालमजुरी बेकायदेशीर आहे जर्मनीत! 🙄
उदाहरणच द्यायचं झालं तर.. तसे बरेच उदाहरणं आहेत पण वानगीदाखल काही...
(हजार वेळा आवाज देऊनही ऐकून न ऐकलं केल्यावर जेव्हा तुम्ही त्याला ओरडून ”अर्रे" म्हणता तेव्हा)
अर्रे त्या खिडक्यांच्या काचा पुसून घे - काचा चकाचक दिसतायेत एकदम! तरीही पुसायच्या असतील तर मी थोडा वेळ अभ्यास करून मग पुसतो! (वस्तू कितीही खराब झाल्या तरी ह्याला चकाचकच दिसतात.)
अर्रे तेवढा कचरा टाकून ये - सारखा सारखा काय कचरा टाकावा लागतो? आताच टाकणं गरजेचं आहे का? मी नंतर टाकतो! (लिफ्टने फक्त खाली जावं लागतं कचरा टाकायला तरी...)
अर्रे आज व्हॅक्यूम करून घे बरं घर - आई तू कालच घर झाडलं आहेस ना, मग लगेच आज व्हॅक्यूम कशाला? उद्या करतो! (उद्या कधी उगवत नसतो असं माझे वडील म्हणायचे.)
अर्रे दूध घेऊन ये बरं आज - इतकं दूध कसं काय लागतं आपल्याला? (आता एक गायच विकत घेऊन टाकावी, कसं?)
अर्रे तेवढ्या संपलेल्या तेलाच्या बाटल्या समोरच्या बिनमध्ये टाकून ये - आई इतकं तेल वापरतेस तू? अजून २-४ बाटल्या साचल्या की टाकून येतो, सध्या राहू दे! (जसं काही मीच तेलाच्या बाटल्या रिचवते.)
अर्रे आज चहा टाक बरं - आई रोज चहा पिऊ नये आणि मला जरा प्रोजेक्ट करायचा आहे पुढच्या वेळी करतो हं चहा! (जसं काही मीच एकटी चहाबाज आहे घरात.)
अर्रे तेवढा डिशवॉशर लाव रे आज, मला काम आहे - अं, आई! माझा मित्राबरोबर कॉल असतांनाच तुला कामं सांगायची असतात ना! थोड्या वेळानी लावतो! (नशीब असं नाही म्हणाला, किती वेळा स्वैपाक करतेस आई?)
अर्रे वॉशिंगमशीन लाव आणि कपडे वाळत घाल आज - आईईई प्लिजच आता, मी लायब्ररीत चाललोय अभ्यासाला, उद्या लावतो!
पण त्याने कितीही नन्नाचा सूर लावला तरी मी सोडते थोडीच, कामं करूनच घेते. अच्छी आदतें मुझेही तो सिखानी है. मग उद्या त्याच्या बायकोने म्हणायला नको की आईने काहीच शिकवलं नाही म्हणून! 🙊
#माझी_म्युनिक_डायरी
1 टिप्पणी:
वाह वाह... घरोघरी इंटरनेटचा सुळसुळाट
टिप्पणी पोस्ट करा