सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

चालढकल

तुम्हाला वाटत असतं की चला ह्यावर्षी शाळेची सुट्टी दिवाळीत आलीये तर मुलाकडून थोडे कामं करून घेऊ, चांगला तावडीत सापडलाय! पण जेव्हा तुम्ही तुमच्या टीनएजरला कोणतंही काम सांगता तेव्हा तो जास्तीत जास्त चालढकल कशी करता येईल ह्याचा नमुना पेश करतो आणि वर म्हणतो की आई बालमजुरी बेकायदेशीर आहे जर्मनीत! 🙄 

उदाहरणच द्यायचं झालं तर.. तसे बरेच उदाहरणं आहेत पण वानगीदाखल काही... 

(हजार वेळा आवाज देऊनही ऐकून न ऐकलं केल्यावर जेव्हा तुम्ही त्याला ओरडून ”अर्रे" म्हणता तेव्हा)

अर्रे त्या खिडक्यांच्या काचा पुसून घे - काचा चकाचक दिसतायेत एकदम! तरीही पुसायच्या असतील तर मी थोडा वेळ अभ्यास करून मग पुसतो! (वस्तू कितीही खराब झाल्या तरी ह्याला चकाचकच दिसतात.) 

अर्रे तेवढा कचरा टाकून ये - सारखा सारखा काय कचरा टाकावा लागतो? आताच टाकणं गरजेचं आहे का? मी नंतर टाकतो! (लिफ्टने फक्त खाली जावं लागतं कचरा टाकायला तरी...)

अर्रे आज व्हॅक्यूम करून घे बरं घर - आई तू कालच घर झाडलं आहेस ना, मग लगेच आज व्हॅक्यूम कशाला? उद्या करतो! (उद्या कधी उगवत नसतो असं माझे वडील म्हणायचे.)

अर्रे दूध घेऊन ये बरं आज - इतकं दूध कसं काय लागतं आपल्याला? (आता एक गायच विकत घेऊन टाकावी, कसं?)

अर्रे तेवढ्या संपलेल्या तेलाच्या बाटल्या समोरच्या बिनमध्ये टाकून ये - आई इतकं तेल वापरतेस तू? अजून २-४ बाटल्या साचल्या की टाकून येतो, सध्या राहू दे! (जसं काही मीच तेलाच्या बाटल्या रिचवते.)

अर्रे आज चहा टाक बरं - आई रोज चहा पिऊ नये आणि मला जरा प्रोजेक्ट करायचा आहे पुढच्या वेळी करतो हं चहा! (जसं काही मीच  एकटी चहाबाज आहे घरात.) 

अर्रे तेवढा डिशवॉशर लाव रे आज, मला काम आहे - अं, आई! माझा मित्राबरोबर कॉल असतांनाच तुला कामं सांगायची असतात ना! थोड्या वेळानी लावतो! (नशीब असं नाही म्हणाला, किती वेळा स्वैपाक करतेस आई?)

अर्रे वॉशिंगमशीन लाव आणि कपडे वाळत घाल आज - आईईई  प्लिजच आता, मी लायब्ररीत चाललोय अभ्यासाला, उद्या लावतो! 

पण त्याने कितीही नन्नाचा सूर लावला तरी मी सोडते थोडीच, कामं करूनच घेते. अच्छी आदतें मुझेही तो सिखानी है. मग उद्या त्याच्या बायकोने म्हणायला नको की आईने काहीच शिकवलं नाही म्हणून! 🙊 


#माझी_म्युनिक_डायरी 



सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

घासाघीस

आज भारतीय किराणा सामान आणायला म्हणून जरा लवकरच घरातून बाहेर पडले तर बसच अंमळ उशिरा आली! पण बसचालक काकांना बघून आश्चर्याचा धक्काच बसला; काका टरबन घातलेले, दाढी राखलेले शीख होते. त्यांना बघून आपसूकच नमस्ते म्हणाले. त्यांनीही हसून नमस्ते केलं. भारतीय दुकानात गेल्यावर तर आज भारतात गेलोय की काय असं वाटलं! काकांनी सोनू निगमच्या आवाजातला गायत्री मंत्र लावला होता. एकदम दैवी संकेत वगैरे!

मग मी म्हणलं आज भारतीयच बननेका. आज भाज्यांमध्ये घासाघीस करूच, कसं! “ये कोथिंबीर देड यूरोकी एक युरोमें लगाओ भैय्या, मैं हमेशा आपकेही दुकानमें भाज्या लेती हूं ना और हरी मिर्च भी पचास सेंट में दे दो, और जरा कडीपत्ता डालदो ऊसमें, आपका बोहनी का टाईम है!” दुकानवाल्या काकांनाही भारतात असल्यासारखं वाटायला पाहिजे किनई! 

मग त्यांनीही “बोहनीका टाइम बोला आपने इसलिये देता हुं” म्हणून दिलं कमी भावात(इमोशनल हो गये अंकल). पण इथे कोणी कडीपत्ता फुकट देईल तर शपथ! त्याला चांगले साडेचार युरो मोजावे लागतात. 

बिल देऊन निघावं म्हणलं तर काका म्हणाले “चाय लेके ही जाईये अब, मैं बना रहा हूँ”. मी लगेच “हाँ हाँ क्यूँ नहीं क्यूँ नहीं” पण मनात म्हणलं “अब क्या बच्ची की जान लोगे क्या अंकल?” भाज्यांचा भाव कमी केला, आता चहा देताय. खरोखर भारतात आल्यासारखं वाटलं! 


#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

डिस्को दांडिया

माणसाला (पक्षी: मला) कोणत्या गोष्टीवरून काय आठवेल हे काही सांगता येत नाही. 

तर त्याचं झालं असं की परवा ऑक्टोबर फेस्टला गेलो होतो. तिथली विद्युत रोषणाई पाहुन मला आमच्या छ. संभाजीनगरची नवरात्रातली कर्णपुऱ्याची यात्रा आठवली. लहानपणी तिथे गेल्यावर फार छान वाटायचं! सध्याचं यात्रेचं स्वरूप माहित नाही खरं, कित्येक वर्ष झाली यात्रेला जाऊन. 

कर्णपुऱ्याची जत्रा आठवली त्यावरून संभाजीनगरातले नवरात्र आणि दांडिया आठवले. दांडिया किंवा मराठीत ज्याला टिपऱ्या खेळणे म्हणतात; त्याविषयीची एक मनात खोल दडलेली भीती आठवली!

आम्ही संभाजीनगरात ज्या भागात राहायचो तिथून जवळच एक मंदिर होतं. परंतु ते मंदिर नाल्यापलीकडे असल्यामुळे आम्ही कधी तिथे गेलो नव्हतो. तसे तिथे भजनादी कार्यक्रम चालायचे, त्याचे आवाज अधूनमधून आम्हाला यायचे. पण अचानक एका नवरात्रात तिथल्या लोकांना लाऊडस्पिकर आणि माईकचा शोध लागला आणि तिथूनच आमचं आयुष्य बदललं!

त्या नवरात्रीत तिथे संध्याकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत, फक्त आणि फक्त  “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया" नामक गाणं चालू असायचं. कधीकधी तर वामकुक्षीची वेळ झाली रे झाली की गाणं रिपीट मोडवर सुरु व्हायचं ते संध्याकाळी आरतीपुरतं बंद व्हायचं. त्यांनतर पुन्हा सुरु!

आम्ही १-२ दिवस वाट पाहिली की कधीतरी गाण्यात बदल होईल. “परी हूँ मैं ” किंवा “याद पियाकी आने लगी” वगैरे लागतील. पण छे! पूर्ण नऊ दिवस अहोरात्र फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया". आमच्या इमारतीतला आबालवृद्धांना कदाचित हे गाणं तोंडपाठ झालं असावं तेव्हा! मला आजही आहे🙄. 

ते वर्ष संपलं. पण हाय रे कर्मा! त्याच्या पूढच्या वर्षीही आमच्यावर त्याच गाण्याचा अत्याचार नवरात्रात चालू होता! अरे ये हो क्या रहा है? असा प्रश्न आम्हा मुलींनाच पडत होता. बाकी इमारतीतील ईतर जनता हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करत होते ह्याचं उत्तर मला लग्न झाल्यावर मिळालं. काही नाही, उत्तर असं आहे की तिथे आमच्या इमारतीत काम करणाऱ्या मावशी तिकडे राहायच्या आणि त्यांच्या मुली तिथे दांडिया खेळायच्या! कामवाल्या मावशींना कोण दुखावणार! नाही का?

पण आम्हा मुलींना काही चैन पडेना. शेवटी न राहवून आम्ही आमच्या कामवाल्या मावशींच्या मुलीला विचारलंच की बाई तुम्ही सदानकदा हे एकच गाणं का लावता? गाणं बदला ना! तिने जे उत्तर दिलं ते ऐकून आम्ही गडाबडा लोळून हसलो होतो. अर्थात, तिच्यासमोर नाही! ती म्हणाली की “त्यांना सगळ्यांना फक्त ह्या एकाच गाण्यावर दांडिया खेळता येतो! म्हणून ते सगळे दुपारी प्रॅक्टिस दांडियाही ह्याच गाण्यावर खेळतात आणि रात्री मुख्य दांडियाच्या कार्यक्रमालाही ह्याच गाण्यावर दांडिया खेळतात!”

बरं एवढं बोलून ती थांबली नाही तर तिने त्या रात्री दांडीया खेळायचं आमंत्रणही दिलं आम्हाला आणि एवढंच नाही तर रात्री आम्हाला खेचत घेऊनही गेली आणि आम्ही तिथे “ झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” वर दांडिया खेळतोय 🙄

त्यानंतर नक्कीच अजून १-२ वर्ष फक्त आणि फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” एवढं एकच गाणं त्यांच्याकडे नवरात्रात वाजत असायचं! मी तर इतका धसका घेतलाय ह्या गाण्याचा की बास! कोणी नुसतं डिस्को दांडिया म्हणायचं अवकाश की मला एक सणसणीत... असो. 

अरे कुठे नेऊन ठेवलीये फाल्गुनी पाठक आमची!

वाचकांना आवडलेले काही