आज क्रिसमस ईव्ह आहे तर म्युनिकमध्ये आल्यावरचा पहिला नाताळ आठवला. आपण साधारणपणे दुसऱ्या देशात गेलो की तिथल्या राहणीमानचे, चालीरीतींचे, नियमांचे काही पूर्वग्रह सोबत घेऊनच जात असतो. माझंही तेच झालं.
मी पण काही गोष्टींचे ठोकताळे मनात घेऊनच जर्मनीत पाय ठेवला होता. पुण्यात असताना जर्मन भाषा शिकतांना क्लासमध्ये जर्मनीविषयी जी काय माहिती मिळाली होती त्यावरून जर्मन लोकांच्या स्वभावाचा, राहणीमानाचा अंदाज आला होता. परंतू जर्मनभूमीवर पाय ठेवल्यावर आणि मॅगी काकूंना भेटल्यावर हळूहळू इथल्या प्रत्येक गोष्टीचा माझ्या मनातला आराखडा बदलत होता.
अत्यंत उच्च दर्जाचं राहणीमान आणि स्वच्छता असणारं म्युनिक आणि तिथे आल्यावर ऑक्टोबरफेस्ट हा मी पाहिलेला आणि अनुभवलेला पहिला मोठा सोहळा. तिथला लोकांचा उत्साही वावर, आनंदी वातावरण, फॉरेनची जत्राच जणू. हे सगळं इतकं पक्के डोक्यात बसले होते की मी नाताळची आतुरतेने वाट पाहायला लागले.
नाताळच्या आधी साधारण २-३ आठवडे सगळ्या बाजारपेठा, मॉल्स इत्यादी गोष्टी विद्युत रोषणाईने सजलेल्या असतात. शहरात ठिकठिकाणी क्रिसमस मार्केट्स लागलेले असतात. वेगवेगळे पारंपारिक सोहळे होत असतात. रस्ते माणसांनी फुलून गेलेले असतात. हे सगळं असं छानपैकी चालू असतं.
म्हणून मग पहिल्या वर्षी आम्ही ठरवलं की २४ डिसेंबरला म्हणजेच क्रिसमस ईव्हला संध्याकाळीच म्युनिकच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच मरीनप्लाट्झला लागलेल्या क्रिसमस मार्केटला जायचं. (किती छान ना, क्रिसमसचा आदला दिवस म्हणजे किती उत्साही आणि विद्युत रोषणाईने सजलेलं असेल सगळं!! मला तर बाई फार मजा येणार आहे!)
आम्ही त्या भागात पोहोचत असतानाच मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. कारण सगळीकडे जरा अंधार आहे असं वाटायला लागलं. पण त्या चुकचुकणाऱ्या पलीकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य करून मी माझ्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केलं. विद्युत रोषणाईने सजलेलं क्रिसमस मार्केट!!
पण आम्ही जसजसं पुढे जायला लागलो तसतसं आमच्या लक्षात यायला लागलं की मार्केटची जागा पूर्णपणे रिकामी झालेली आहे. दुकानं लावलेल्या लोकांनी त्यांचं चंबूगबाळे केव्हाच आवरलेलं आहे आणि ते आपापल्या घरी गेलेले आहेत! काही दुकानांची तर लाईटिंगही काढून टाकली होती! आमच्या तिघांचे चेहरेच उतरले खरर्कन! आजूबाजूला आमच्यासारखेच पोपट झालेले उतरलेल्या चेहऱ्याचे लोक आणि त्यांची झालेली निराशा.
अस्कुठे अस्तय होय? नाताळच्या आदल्या दिवशीच सगळी आवराआवर करून पसार होत असतात का? पण इथे असंच होतं म्हणे. त्यांचा सण त्यांना आपल्या माणसांत साजरा करायचा असतो म्हणून सगळं बंद असतं. एकही रेस्टॉरंट उघडं नव्हतं. बरेच रेस्टॉरंट्स धुंडाळले पण सगळीकडे कुलूप. शेवटी घरी येऊन खिचडी टाकली. खिचडी है सदा के लिये!!
बरं असं वाटलं २५ डिसेंबरला तरी लाल टोप्या घातलेले उत्साही लोक दिसतील नाताळच्या दिवशी. पण कसचं काय!! २५ ला तर अक्षरशः टाचणी पडलेली ऐकू येईल इतकी शांतता असते सगळीकडे. रस्त्यांवर चिटपाखरूही नसतं! त्या लाल टोप्यांचं फ्याड आपल्याकडेच आहे. इथे कोणीही असे सवंग प्रकार करताना दिसत नाही! असो.
तर, अश्या प्रकारे माझा भ्रमाचा भोपळा फुटला. जर्मन नाताळ म्हणजे फक्त शांतता आणि कौटुंबिक सोहळा! चलो ये भी अच्छा हैं!
तळटीप: नाताळ म्हणजे मराठीत क्रिसमस 🙊
#माझ_म्युनिक_डायरी
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक