शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

पोपट

शनिवारचा जरा गडबडीचा दिवस. रविवारी बाजार बंदमुळे दोन चार दुकानांमध्ये जाऊन सामान आणणे वगैरे कामं दुपारपर्यंत आटपून, तुम्ही जरा वामकुक्षी घेऊया असा विचार करतच असता की तो इमेल येऊन धडकतो. जो वाचुन तुम्हाला कळतं की आज वामकुक्षीच काय रात्रीची झोपही दुरापास्त होणार आहे. काही नाही, एका प्रोजेक्टची डेडलाईन रविवारीच आहे असं लिहिलेलं असतं त्यात त्यामुळे तुम्ही वामकुक्षीला पुढे ढकलून लॅपटॉपला जवळ घेता. 

तुम्ही पटापट एकेक काम लॅपटॉपवेगळं करत असता .. ते नाही का हातावेगळं म्हणतात तसं! तुमचे हे थोड्या वेळाने तुमच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसतात आणि अगदी प्रेमाने विचारतात "टीव्ही लावु का ग?"  तुमच्या मनात येतं "नेकी और पुछ पुछ!"  पण तसं काहीही न दाखवता तुम्ही शांतपणे "हो" म्हणता. तुम्हाला वाटतं आता डेडलाईनच आहे प्रोजेक्टची तर उगी कशाला एखादा डायलॉग मारुन आ बैल मुझे मार करावं, हो किनई? कारण "एक डायलॉग नवरा बायकोको भांडकुदळ बना सकता है." 

टीव्ही चालु होतो. आयपीएल, राजकारण, बातम्या इत्यादी गोष्टींमध्ये फिरुन फिरुन गाडी शेवटी युट्युबवर खानपानाच्या चॅनलवर येते. तुम्ही कामात मग्न असूनही तुमचं अधूनमधून लक्ष टीव्हीकडे असतंच बरं! एव्हाना संध्याकाळ होत आलेली असते आणि तुमच्या डोक्यात संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करावं?असं डोक्यात येतं म्हणुन तुम्ही ह्यांच्याकडे बघता तर हे "मेरे पिया गये रंगून" म्हणजे हे अगदी मन लावून टीव्हीवर "बटाटेवड्याची कृती" बघत असतात. मग तुम्ही पण त्यांची "मेरे रंग में रंगनेवाली" होऊन अगदी मन लावून "वरुण इनामदारला" बघत असता. तो नाही का हँडसम शेफ! असो. 

तर, ती चवदार बटाट्याची भाजी, त्या भाजीचे वडे करण्यासाठी त्यासाठी बनवलेलं बेसनाचं पीठ, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी. अहाहा! त्यात वरुणची बोलायची स्टाईल. क्या बात है! आता तुमच्या डोक्यात काम सोडून, बस्स बटाटेवडे आणि वरुण! तुम्हाला वाटायला लागतं की हा व्हिडीओ संपला की हे उठून कुकरला बटाटे लावणार आणि पुढच्या एक दीड तासात तुमच्या हातात गरमागरम बटाटेवडे, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी असलेली डिश येणार. भलंमोठं काम आणि आयता बटाटेवडा, और क्या चाहिये? 

वामकुशीला पुढे ढकलल्यामुळे असं गरमागरम बटाटेवड्याचं दिवास्वप्न तुम्ही टीव्हीसमोर बसुन बघायला लागता! कृती संपवून, वरुण तुमचा निरोप घेतो, तुम्ही जड अंतकरणाने त्याला बाय करता आणि तुम्हाला वाटतं की आता तुमचं बटाटेवडा स्वप्न प्रत्यक्षात येणार तोच.... 

हे घड्याळाकडे बघतात आणि तुम्हाला म्हणतात, "अगं साडेसहा होत आलेत, तुला खूपच काम आहे तर मी खिचडी टाकू का?"

हे ऐकुन तुमच्या स्वप्नातल्या हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेच्या चटणीचा पोपट होऊन त्या गरमागरम बटाटेवड्याला घेऊन उडून जातो!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

झबले_टोपडे

जेव्हा अख्ख्या होल मेट्रोच्या डब्यात काळे, पांढरे आणि ग्रे शेड्सच्या झबले, टोपडे आणि मास्कमध्ये ... म्हणजे जॅकेट्स, टोप्यांमध्ये तुमचे जॅकेट, टोपी रंगीबेरंगी आणि मास्क चक्क कोयरीच्या डिझाईनचा आणि रंगीत असेल तो समझ लेना भारतीय हो तुम!

कधीकधी वाटतं की इथले लोक फक्त दोनच रंगात जगतात, काळा आणि पांढरा! उन्हाळ्यात तरी जरा रंग दिसतात लोकांच्या कपड्यांमध्ये पण शरद ऋतू सुरु झाला की आधीच उदास असलेल्या वातावरणात ही लोकं त्यापेक्षा उदास कपडे घालतात! मग ट्रेनमध्ये आपल्यासारखे भारतीय लोक म्हणजे “बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना” दिसतात. आजूबाजूचे लोकही “कौन है ये लोग” वाला लूक देतात आपल्याला.  

यावर्षी शरद ऋतूमधेच इथे इतकी थंडी पडलीये ना! नाकातोंडातून वाफा बाहेर पडतायेत आणि लगेच झबले, टोपडे आणि मोजे घालावे लागत आहेत. जॅकेट आणि टोपीचं नाव झबलं आणि टोपडं ठेवलय मी. 

घराबाहेर पडणं म्हणजे वैताग असतो नुसता! इतका जामानिमा करून जाणं म्हणजे एक मोठं काम वाटतं. त्यात आता मास्कची भर पडलीये. मला लेकाचं कौतुकच वाटतं; जेव्हा तो शाळेत जातांना टोपी, मास्क आणि चष्म्याची व्यवस्थीत सांगड घालतो, तेही सकाळी ट्रेन पकडायच्या गडबडीत!

मी आज टोपी आणि मास्कची सांगड घालायचा अयशस्वी प्रयोग करत होते ट्रेनमध्ये तर मला पाहुन एक आज्जी इतक्या वैतागल्या की चिडुन जर्मनीमध्ये म्हणाल्या “अगं ए मुली, ती टोपी काढुनच टाक ना एकदाची!” मला मॅगी काकूंची इतकी आठवण आली म्हणुन सांगु, त्या असत्या तर अश्याच रागावल्या असत्या नई! मी सांगितलं आज्जीना की मला थंडी वाजते हो तर पुन्हा त्यांनी ”कहांसे आते है ये लोग” वाला लूक दिला कारण ३ डिग्री सेल्सिअसमध्ये इथले आजी आजोबा सुद्धा टोपडे घालत नाहीत! पुढे आज्जी मला निरुत्तर करत म्हणाल्याच “तरीच तू बर्फात घालायचं झबलं घातलं आहेस!” 

ईथे प्रत्येक थंडीत घालायचे झबले, टोपडे वेगवेगळे असतात. आपलं म्हणजे थंडी पडली की एक दणकट झबलं अंगावर चढवायचं की झालं काम! आपल्याला पावसाची थंडी, उन्हातली थंडी आणि बर्फातली थंडी असं काही म्हणजे काही कळत नसतं त्यामुळे सगळ्या थंड्या सारख्याच! 

एक मात्र आहे बरं, अशात मला रोजचा हवामानाचा अंदाज आणि त्यानुसार खेटरं कोणते घालावेत ह्याचं तंत्र अवगत झालंय! कसं काय विचारताय, मॅगी काकूंमुळे हो! घराबाहेर पडायच्या आधी त्यांच्या दरवाज्याच्या बाहेर त्यांनी ठेवलेले त्यांचे पादत्राणं बघून घ्यायचे आणि निर्धास्त व्हायचं! त्यांनी पावसात घालायचे बुट्स बाहेर ठेवलेत त्या दिवशी काय बिशाद त्या पावसाची न पडण्याची!

रोजचे त्यांचे पादत्राणे बघूनच जीव इतका हैराण झालाय की त्यांचे झबले, टोपडे बघायच्या फंदातच पडत नाही मी, उगी हार्टवर प्रेशर वगैरे यायचं! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

वाचकांना आवडलेले काही