सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

मुडदा बशीवला त्या कोरोनाचा

मार्चमधे लॉकडाउन सुरु झाल्यापासुन एकमेकांना बारा महीने अठरा काळ झेलणारे दोन कावलेले जीव, सणावारासाठी वाणसामान आणायला म्हणुन भारतीय दुकानात जायला निघतात. घरातून निघून, मेट्रो स्टेशनपर्यंत, पुन्हा स्टेशनवर ट्रेन येईपर्यंत हे दोन मास्कधारी एकमेकांचे थोबा.. म्हणजे मास्क सुद्धा बघत नाहीत. 

पण ट्रेनमध्ये व्यवस्थित जागा मिळाल्यावर, स्थानापन्न होऊन, तो तिच्याकडे बघत म्हणतो 

“बोल!”

आता हे म्हणजे घरचं झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोडं. घरी काय कमी शालजोडीतले संभाषण होते म्हणुन मेट्रोमध्ये पण तेच. पण ती फक्त त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि मास्कमधल्या मास्कमध्ये (तोंडातल्या तोंडात प्रमाणे) काहीतरी पुटपुटते. तिच्या मनात येतं की तिने इतक्या दिवसांत हजार वेळा बोललेला घिसापीटा डायलॉग पुन्हा त्याच्या मास्कधारी चेहऱ्यावर फेकून मारावा 

“तू जा ना यार ऑफिसला!”

पण तिला माहित असतं की ह्या मेल्या कोरोनामुळे ना ऑफिसवाले बोलावणार, ना आपण ह्याला जाऊ देणार. 

तो पुन्हा तिला म्हणतो 

“अगं बोल ना! आत्ता काहीतरी पुटपुलीस.”

शेवटी न रहावुन ती त्याला सांगूनच टाकते 

“मुडदा बशीवला त्या कोरोनाचा! नुसता जीव खाल्लाय, शांतात म्हणुन नाहीये. सतत आपलं सकाळ, दुपार, संध्याकाळ बोल बोल. घरात नुसती किटकिट तुझ्या मिटिंग्जची. एक झाली दुसरी अन मग तिसरी! अरे काय ताप आहे नुसता. किती जोरात बोलता, टीव्ही बंद करा, फोनवर बोलू नका, आत्ताच कुकर का लावलंय माझी मिटिंग आहे ना, तुम्ही दोघे किती जोरजोरात बोलता? असं म्हणून म्हणून कंटाळा आणलाय. घराचं ऑफिस केलंय नुसतं. काही स्वातंत्र्य आहे की नाही? त्यात पोराची शाळा घरूनच. त्याची भूक भूक वेगळीच. कुठे कुठे डोकं लावायचं मी? बरं घरी आहेत म्हणून चार वेगळे पदार्थ केले तर म्हणे मिरे छान लागत होते आज भाजीत..

मिरे नाआआआही धणे 

धअअअणे होते ते...

तरी मी सांगत असते..”

असं सगळं रामायण महाभारत अवसान गाळून ऐकणारा तो हळूच म्हणतो 

“अगं ए आपण ट्रेनमध्ये आहोत!”

ती मास्क घट्ट करून (पदर खोचून प्रमाणे)

“तूच म्हणालास बोल म्हणून!”


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

मी, भाकरी आणि मॅगी काकू!

हि घटनाही बीसीच आहे.. बोले तो बिफोर कोरोना.. 

तर झालं असं कि नुकतंच भारतीय किराणा सामान घेऊन आले होते आणि यावेळी मला चक्क ज्वारीचं पीठ मिळालं होतं त्यामुळे मी "आनंद पोटात माझ्या माईना" म्हणत म्हणत भाकरी करायचा निर्णय घेतला. खरंतर इथे फार जुनं पीठ मिळतं त्यामुळे शक्यतोवर मी थालीपीठच करते कारण नेहमीच "भाकरी करता येईना, पीठ खराब!" असं म्हणायची वेळ येते. पण यावेळी मी ठरवलंच कि ते काही नाही, काहीही करून भाकरीच करायच्या. 

तुम्ही जर महाराष्ट्राचे त्यातल्या त्यात मराठवाड्याचे असाल आणि लहानपणीपासून आज्जी आणि आईच्या हातच्या आणि लग्नानंतर सासूबाईंच्या हातच्या अप्रतिम भाकरी खाल्लेल्या असतील तर तुम्ही जगाच्या पाठीवर अंटार्टिकावर का असेना, ज्वारीच्या भाकरी करणे आणि खाणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क असतो! पीठ जुने आहे वाटले म्हणून जुन्या पिठाच्या भाकरी कश्या करायच्या ह्यासाठी त्या दिवशी दोन चार युट्युबवरचे व्हिडीओज पाहून आणि मीनाक्षी श्रीखंडे काकूंची गोल गरगरीत भाकरीची पोस्ट वाचून मीही भाकरी करायला घेतल्या. 

पण पीठ जुनंच असल्यामुळे भाकरी करता करता मी कधी त्या थापायला आणि त्यानंतर बडवायला लागले ते कळलेच नाही. भाकरी करणे, थापणे आणि बडवणे ह्या तीन अवस्था म्हणजे पीठ ताजे असेल तर तुम्ही भाकरी करता, पीठ २-३ महिन्यापूर्वीच असेल तर तुम्ही भाकरी थापता आणि पीठ वर्षानुवर्षे जून असेल तर तुम्ही भाकरी बडवता. एक भाकरी २-३ वेळा बडवून कशीबशी होत होती! 

मला भाकरी करता येतात बरं पण पीठ जुने असेल तर करायला अवघड जातात इतकंच. नाहीतर तुम्हाला वाटायचं ह्या बाईला येतंच नाहीत कि काय! 

त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे "हे" ऑफिसला आणि "चिरंजीव" शाळेत गेले होते त्यामुळे भाकरी भाजताना स्मोक डिटेक्टर कोकललं तरी मला रागावणारं कोणीही नव्हतं. तरीही स्मोक डिटेक्टर कोकलू नये म्हणून मी दारं खिडक्या उघड्या ठेवल्या. म्हणलं भाकरी बडवतांना पुन्हा ते कोकललं तर ताप नको! पण डोक्याला शॉट होतातच कारण मी मॅगी काकूंचा विचारच केला नाही! सगळ्या भाकरी करून मी हातच धूत होते तोवर बेल वाजली. हात पुसून दारात आले तर दारात कोणीच नाही आणि एकदम मॅगी काकू त्यांच्या घरातून अवतरल्या! 

आधीच भाकरींनी जीव खाल्ला होता आणि आता मॅगी काकूंना बघून "ये मैने क्या कर दिया भगवान!" वाटलं. त्यांना बघून माझ्या मनात हळूहळू भीती दाटून आली. कधी कधी मला दाट शंका येते कि मॅगी काकू वाट पाहूनच असतात; "कधी हिच्या घरातून मला न समजणारा आवाज येतोय आणि कधी जाऊन मी हिची शाळा घेते!" 

काकू: आत्ता मला पुन्हा तुझ्या घरातून काहीतरी आपटण्याचे आवाज आले. 

(अहो मी भाकरी बडवत होते. ज्यांना आपटते ते दोघे नाहीयेत घरात.)

मी: अहो मी एक प्रकारचा भारतीय फ्लॅटब्रेड बनवत होते. 

काकू: कोणता?

आता पुन्हा आली का पंचाईत! मागे "कुंकू" म्हणजे काय ते कसंबस समजावलं, आता भाकरी म्हणजे काय ते समजावून सांगावं लागेल! मला ज्वारीला इंग्रजीतच काय म्हणतात ते आठवेना तिथे जर्मनमध्ये कधी आठवावं? बरं जर्मनमध्ये ज्वारी हा शब्दच असेल कि नाही इथपासून सुरुवात आहे. तरीही मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला कि हे एक प्रकारचं मिल्लेट आहे ज्याचे आम्ही फ्लॅटब्रेड बनवतो. इत्यादी इत्यादी. 

काकू: पण तूझ्या घरातून इतक्या जोरात आवाज का येत होता? 

पुन्हा "बडवणे"ला इंग्रजी आणि जर्मन दोन्ही शब्द आठवेनात! बरं "थापणे"लाही आठवेनात. आता ह्यांना भाकरी अश्याच बडवाव्या किंवा थापाव्या लागतात हे कसं सांगू? 

मी: असा ब्रेड बनवताना पिठाच्या गोळ्याला एका प्लेटमध्ये घेऊन चांगलं हातानेच फ्लॅट करावं लागतं जोरजोरात म्हणून असा आवाज येतो हो! (जमलं एकदाचं काहीतरी सांगायला!) त्यांना म्हंटलं घरात या, मी तुम्हाला तो फ्लॅट ब्रेड दाखवते तर म्हणे जळका वास येतोय; मी नाही येत तुझ्या घरात! हे म्हणजे "घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं!"

पुन्हा काकू: पण जळका वास का येतोय? तू फ्लॅट ब्रेड सरळ इलेक्ट्रिक स्टोव्हवर भाजले कि काय? (त्यांना मी फारच अडाणी आहे असं सारखं सारखं सुचवायचंच असतं!)

आता पुन्हा पंचाईत! हो म्हंटलं तरी प्रॉब्लेम नाही म्हंटलं तरीही! मी भाकरी सरळ इलेक्ट्रिक स्टोव्हवर भाजतच होते त्यामुळेच जरा धूर झाला आणि जळका वास आला. दारं खिडक्या उघड्या असल्यामुळे तो वासहि मॅगी काकूंना माझ्याघरी घेऊन आला होता. स्वतःला सावरत मी म्हणाले  "नाही हो, चुकून थोडं पीठ इलेक्ट्रिक स्टोव्हवर पडलं ना त्यामुळे वास येतोय!" 

एकदाचं त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह थोडं कमी झालं आणि त्या मला म्हणाल्याच, "फार डिस्टर्ब होतं ग मला अश्या आवाजांनी. बरं कम्प्लेंट तरी किती वेळा करणार ना!"  

बाबो! पुन्हा कम्प्लेंट! "काय उठसूट कम्प्लेंटची धमकी देता हो? काय लावलंय काय? आम्ही म्हणजे तुम्हांला हे वाटलो का? काय रस्त्यावर पडलोय का? आता काय स्वयंपाक करणं सोडू कि काय? तुम्ही देणार का रोज डबा हं? वा! आयडिया चांगली आहे खरं! रोज डबा!"

नाही, ह्यातलं काहीही म्हणाले नाही मी! त्यांना पुन्हा विनंती केली कि "कम्प्लेंट मत किजीये, गरीब कि दुआ मिलेगी!" तेव्हा कुठे त्या मला बाय करून त्यांच्या घरात गेल्या आणि मला गाणं आठवलं "हात जोड इनको सलाम कर प्यारे! नहीं तो ये तो मॅगी काकू खाने नहीं देगी, पिने नहीं देगी, जीने नहीं देगी!"

आणि अश्या रितीने मी, भाकरी आणि मॅगी काकू हा एपिसोड सम्पला! मिलते है ब्रेक के बाद!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही