मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

आपुलकी

  खुप दिवस झाले मॅगी काकूंची (माझी जर्मन शेजारीण) भेट नाही झाली म्हणून तुम्ही त्यांची आठवण काढत असता आणि "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" उक्तीप्रमाणे बाहेर जायला म्हणून दार उघडताच मॅगी काकु समोर हजर. काकु अगदी प्रेमाने तुमच्याशी बोलायला लागल्यामुळे तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. तुम्ही मनातच म्हणता "बऱ्या आहात ना काकु?" तर मनकवड्या असल्यासारख्या काकु म्हणतात "अगं बरेच दिवस झाले माझा एक पाय दुखतोय."  ह्यावर तुम्ही औपचारकपणे "हो का? काळजी घ्या हं."  एवढं म्हणून काढता पाय घ्यायचा असफल प्रयत्न करता पण काकुंचा आज गप्पा मारायचा मुड असतो. मग काकू त्यांच्या पायाची कहाणी सांगतात आणि तुम्ही ती शहाण्या मुलीसारखी ऐकून घेता. शेवटी काकू म्हणतात कि त्यांच्या पायाची एक छोटी सर्जरी आहे पुढच्या आठवड्यात. ते ऐकून तुम्हाला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते म्हणून तुम्ही अगदी प्रेमाने त्यांना म्हणता "काकु तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला नक्की सांगा हं. मी आहे इथेच." काकू सुद्धा आपुलकीने हो म्हणतात. आणि मग आपुलकीच्या पुढच्या पायरीवर जाऊन तुम्ही त्यांना म्हणता "मी माझा फोन नम्बर देते हं तुम्हाला म्हणजे हॉस्पिटलमधुन तुम्ही मला कधीही कॉल करू शकाल."  तर आपुलकीची ऐशीतैशी करत काकु म्हणतात "अगं नको देऊस फोन नंबर." आणि चक्क तिथून निघून जातात. हा मनावरचा आघात सहन न होऊन तुम्हाला नक्की कुठे जायचं होतं हेच तुम्ही विसरता! माझा पचका करायची एकही संधी मॅगी काकू अजिबात सोडत नाहीत. 

   ह्या छोट्या सर्जरीवरून दोन किस्से आठवले म्यूनिचमधल्या डॉक्टरांचे. 

  माझ्या एका मैत्रिणीला हर्नियाचा खूप त्रास होत होता. इथे आधी प्रायोगिक तत्वावर बरेचसे औषधं देऊन बघतात डॉक्टर लोक. कशानेच कमी नाही झालं तर मग शेवटचा उपाय सर्जरी. डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली. छोटी सर्जरी करावी लागेल म्हणाले. तेव्हा तिची मुलगी वर्ष दीड वर्षाची होती त्यामुळे सर्जरी म्हटलं की अंगावर काटा आला बिचारीच्या. ते हॉस्पिटल मध्ये राहणं, इथे मदतीला घरात कोणी नसणे, नवरा आणि मुलीची खाण्यापिण्याची काळजी इत्यादी गोष्टींमुळे आधीच ती वैतागलेली होती. सर्जरीच्या दिवशी डॉक्टरांनी तिच्याकडून बरेचसे फॉर्म्स भरून घेतले, सगळे नियम समजावून सांगितले आणि सगळ्यात शेवटी कोणत्याही प्रकारची आपुलकी न दाखवता म्हणाले "तुमचा ह्या सर्जरीदरम्यान मृत्युही होऊ शकतो त्यामुळे मन खंबीर करा." भीतीने गाळणच उडाली तिची. अरे ही काय पद्धत झाली का? मृत्यू होऊ शकतो काय? डोक्यावर पडल्यागत का वागतात देव जाणे? नवीनच म्यूनिचमध्ये आलेले तेव्हा ते. तिला वाटलं भारतात जाऊन उपचार घेतले असते तर बरं झालं असतं. पण ते म्हणतात ना एकदा उखळात डोकं घातलं कि एक बसो की दहा. सरतेशेवटी सगळं व्यवस्थित झालं आणि सर्जरीनंतर ती सुखरूप घरी परतली. पण सगळं नीट होईपर्यंत तिच्या डोक्यावर उगीचच टांगती तलवार!

  आमच्या ह्यांच्या एका मित्राची अशीच एक छोटी सर्जरी झाली. तेव्हा त्यांचं कुटुंबही भारतात होतं. एकटेच होते म्यूनिचमध्ये. साधारणपणे कितीही छोटी सर्जरी असेल तरी हॉस्पिटलमध्ये एखादा दिवस तरी रहावं लागतं ही आपली धारणा असते. कारण अनास्थेशियाचा प्रभाव बराच वेळ राहतो ना. असा विचार त्यांनी पण केला आणि मित्रांना दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलला बोलावलं. सर्जरी झाली, अनास्थेशियाचा थोडा प्रभाव कमी होऊन त्यांना जाग आली. तर समोर डॉक्टर उभे आणि म्हणाले "आता तुम्ही घरी जा हॉस्पिटल बंद करायची वेळ झाली." नक्की डॉक्टर काय म्हणाले हे कळायलाच त्यांना १०-१५ सेकंद लागले. अजूनही अनास्थेशियाच्या प्रभावाखाली असल्यामुले त्यांनी "काय?" असं पुन्हा विचारलं. तर डॉक्टर "अहो आमची हॉस्पिटल बंद करायची वेळ झालीये तुम्ही निघा आता."  त्यांना वाटलं "नाही जात घरी जा." असं ओरडून सांगावं, पण ओरडायची शक्तीच नव्हती त्यांच्यात. सर्जरी झाल्यावर आपुलकीने विचारपूस करावी जरा पण काय तर म्हणे घरी जा! पूर्ण शुद्ध पण आली नव्हती त्यांना तरी मनाचा हिय्या करून कसेतरी स्वतःला सावरून निघाले ते तिथून आणि मित्राला फोन केला. पण व्हायचं ते झालंच म्हणजे ट्राममधल्या लोकांना त्यांच्याकडे बघून वेगळाच संशय आला!  

 तर सर्जरी नको पण डॉक्टरांना आवरा म्हणायची वेळ आहे इथे. मॅगी काकुंची सर्जरी व्यवस्थित पार पडो म्हणजे मिळवलं. 

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक  
Featured post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

३ टिप्पण्या:

राहुल देशमुख म्हणाले...

आर तिच्या... हे जर्मन प्रकरण लै बांगडे हाये. काळजी घ्या रे... मॅगी काकूंची ��

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक म्हणाले...

लैच बांगडे हैत.. घेतो हो काळजी मॅगी काकुंची! ;)

Unknown म्हणाले...

Maggy kaku
😜😜

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही