मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

चष्मेबद्दुर

इथे आल्यापासून सोप्या गोष्टी अवघड आणि अवघड गोष्टी सोप्या वाटायला लागल्या आहेत. म्हणजे भारतात जी कामं पटकन होतात त्या कामांना इथे काही दिवस ते महिने लागतात. उदाहरणच द्यायचे झाले तर डॉक्टरची अपॉइंटमेंट, चष्मा खरेदी इत्यादी आणि ज्या गोष्टी अवघड वाटायच्या जसं कि सिटी बसने गर्दीत प्रवास, टु व्हीलर शिवाय पान न हलणे वैगरे इथे एकदम सोपं आहे; बस, ट्राम, मेट्रोचा प्रवास सोपा आणि सुखकर आहे.

बाकी सगळ्या गोष्टींमध्ये घरात माझा कितीही वरचष्मा असला तरीही चष्मा खरेदी किंवा चष्मा ह्या विषयावर मी घरात चष्मेवाल्यांबरोबर बोलणे किंवा मत प्रदर्शित करणे म्हणजे आ बैल मुझे मार आहे. मला नसलेला चष्मा ह्याला कारणीभूत आहे!  तर चष्मा खरेदी आणि चष्मा दुरुस्ती म्हणजे डोळे दाखवून अवलक्षण आहे इथ! पुण्यातल्या सारखं इथेही बरचसे दुकानदार आणि तिथे काम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असतं "इथे अपमान करून मिळेल"!!

चष्मा खरेदी

आपण आपलं दुकानात जातो चष्म्याची आवडलेली फ्रेम घेतो आणि नंबर वाला कागद दुकानदाराला देऊन ३-४ दिवसात किंवा जास्तीत जास्त आठ दिवसात चष्मा आणतो. पण इथे तसं अजिबात नाहीये बरं; कमीत कमी आम्ही ज्या दुकानात गेलो तिथे तरी. आम्ही त्या दुकानात साधारण संध्याकाळी साडेपाच सहाला गेलो. मोठं होतं बऱ्यापैकी. आजूबाजूच्या भिंतीवर लाकडी रॅक्स मध्ये फ्रेम्स ठेवलेल्या होत्या. दुकानात अलीकडे छोटस काउंटर आणि पुढे ७-८ टेबल्स आणि त्याच्याभवती खुर्च्या. एखाद्या कम्पनित मुलाखतीला आलोय कि काय वाटायला लागलं. कारण आम्ही आत गेल्यावर त्यांनी आम्हला एका टेबलाजवळच्या खुर्च्यांवर बसायला सांगितलं आणि आमचा माणुस येईलच म्हणे बोलायला. अरे भाऊ त्यात काय बोलायचं असतं नक्की?


म्हटलं अरे दादा आम्हाला फ्रेम बघायची आहे चष्मा करायला तर म्हणे बसा हो. १० मिनिट वाट बघावी लागली तर ज्युनिअर चष्मेवाल्याने त्याला कसा चष्मा नकोय आणि आपण घरी जाऊ ह्यावर आमची शाळा घेतली. शेवटी एक पोरगेलासा इसम आमच्याशी बोलायला आला आणि म्हणाला तुम्ही फ्रेम पसन्त केली का एखादी? म्हटलं आम्हाला सांगितलंच नव्हतं तर तो आमच्याकडे "कौन है ये लोग? कहासे आते है ये लोग?" वाला लूक देऊन पाहायला लागला. पटकन उठून ज्युनिअर चष्मेवाल्यासाठी आवडेल अशी फ्रेम सिनियर चष्मेवाल्यानी ठरवली. माझा काहीच वरचष्मा नाहीये म्हटलं ना!!

आता फ्रेम घेतल्यावर झालं आता घरी जायचं असं वाटून ज्युनिअर चष्मेवाले खुश झाले. लेकिन पिक्चर अभी बाकी था. मग त्या पोरगेलेश्या इसमाने आम्हाला  पुन्हा त्याच टेबल खुर्च्यांवर नेले. त्याच्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या उपकरणांनी त्याने आधीची फ्रेम आणि नवीन फ्रेम तपासली. नवीन फ्रेम तीन चार वेळा चिरंजीवांना घालायला लावून कानाच्या मागे नीट बसली आहे का? नाकावर व्यवस्थित आहे का? अँगल नीट आहे का वगैरे चेक केलं. काचा कश्या हव्यात., अश्या घ्या तश्या नका घेऊ वगैरे वगैरे. हे सगळे सोपस्कार करून तो म्हणाला बसा थोडा वेळ मी आलोच. एव्हाना तासभर होऊन गेला होता.

पुन्हा चिरंजीवांनी औरंगाबादलाच चष्मा घेणं कसं योग्य आहे ह्यावर आमची शाळा घेतली. तेवढयात एक आजोबा तिथे आले ज्यांना इंग्लिश बोललं तर चालेल का विचारल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला "नाही" म्हणाले त्याला तोड नव्हती. पुन्हा त्यांनी वेगवेगळे कागदपत्र आमच्याकडून भरून घेतले आणि स्वतः पण भरले. घर खरेदीला गेल्याचा फील आला हो.

दोन तासांनी आम्हाला चष्मा कसा तयार होईल ह्याचा साक्षात्कार झाला. चष्मा कधी मिळेल विचारल्यावर "एक महिन्याने" असं जेव्हा आजोबा म्हणाले तेव्हा चक्क सिनियर चष्मेवाल्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. एकंदर डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला एक महिना आणि चष्मा मिळायला एक महिना असं मिळून चिरंजीवाचा डोळ्यांचा नम्बर नक्की काय होईल ह्याविषयावर चक्क आम्हा दोघांचं एकमत झालं.

माझ्या सहनशक्तीचा अंत पहिल्या दहा मिनिटातच झाला होता हे वेगळं सांगायला नकोच!

चष्मा दुरुस्ती

तर कसाबसा चष्मा महिन्याभराने मिळाला आणि त्यानंतर चिरंजीवांना तो पंधरा दिवसातच ढिला व्हायला लागला. त्याला म्हटलं चल जाऊ आपण नीट करून आणायला तर मागच्या अनुभवावरून शहाणा होत नाही म्हणाला आणि पुन्हा त्याचं आजकालचे पालुपद त्याच्याजवळ होतेच "मॉल मध्ये गेलं कि तू खूप दुकानांमध्ये जातेस".

मग मनाची तयारी करून आम्ही पुन्हा त्याच दुकानात गेलो. मी गेल्या गेल्या काउंटर मागच्या माणसाला नेहमीप्रमाणे इंग्लिश बोललं तर चालेल का असं विचारल्यावर त्याच "नाही" म्हणजे " आ गये मुह उठाके" वाटलं. मग मी मोडक्यातोडक्या जर्मन मध्ये "चष्मा नीट करून देताल का प्लिज" विचारलं. प्लिज ह्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे इथे.
तर तो "तुमचा आहे का चष्मा?"
मी "नाही माझ्या मुलाचा आहे."
तो "चष्म्यातला मुलगा कुठंय?"
मी "मुलगा कशाला पाहिजे? चष्मा नीट करून द्या ना प्लिज!"

ह्यावर त्याने चष्मा नीट करायला ज्याचा चष्मा आहे तो माणूस कसा गरजेचा असतो ह्यावर माझी जर्मन भाषेत यथोचित शाळा घेतली आणि चडफडत चष्म्याचे स्क्रू टाईट केले. मग जवळच असलेल्या छोट्या बेसिन मधील दोन प्रकारच्या लिक्विड्स मध्ये दोन वेळा चष्मा बुडवून स्वच्छ करूनच माझ्या जवळ दिला. निघतांना पुढच्या वेळी चष्म्यामधील मुलाला नक्की घेऊन या हि तंबी दिली!

आणि सिनिअर चष्मेवाल्यानी हे सगळं पाहून "औरंगाबादलाच गेल्यावर माझा चष्मा करूयात" असं म्हटल्यामुळे माझ्या डोक्यावरचा मणामणाचा भीतीचा चष्मा उतरला!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 



Featured post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

1 टिप्पणी:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही