गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

सौंदर्य


इथे मेट्रोने प्रवास करताना दरवेळी एक से एक अनुभव येतात. त्यातले काही अगदी न विसरता येण्यासारखे असतात. 


आता परवाच किराणा सामान आणायला इंडियन स्टोअरला निघाले होते. माझ्यासमोरच्या सीटवर एक मूर्तिमंत कि काय म्हणतात ते सौंदर्य बसलेलं होतं. नजर हटतच नव्हती चेहऱ्यावरून. अत्यंत अप्रतिम अशा केशरचनेत बांधलेले केस, रेखीव भुवया आणि बोलके डोळे, चाफेकळी नाक, जबरदस्त फीचर्स होते. चेहऱ्याला हलकासा मेकअप. अगदी मेंटेन्ड बांधा आणि तिला शोभेल असा पोशाख. गळ्यात मोत्याची नाजुकशी माळ, कानात मोती, हातात त्याच मोत्यांचे ब्रेसलेट. मंद अशा अप्रतिम परम्युमचा दरवळत असलेला सुगंध. माझं हे सगळं निरीक्षण चालू असताना तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, ओशाळले ना मी. पण सावरून बसत तिला स्माईल दिली. तिने दिलेली दिलखेचक स्माईल मी विसरूच शकत नाही. तितक्यात त्या सौंदर्यवतीचे स्टेशन आले आणि मला चक्क बाय करून ती निघूनही गेली. 


मनात आलं हिच्या वयाची होईपर्यंत मी जगले तरी खूप झालं.... ८० वर्षांच्या आज्जी होत्या त्या!


ह्या आज्जीना पाहून माझ्या आजी (आईची आई) आणि आजीसासूबाई आठवल्या. दोघीही इतक्या सुंदर आणि सोज्ज्वळ दिसायच्या ना कि बघतच राहावं. 


आजीसासूबाई एकदम उंचापुऱ्या, सडसडीत, गोऱ्यापान. कोणत्याही रंगाचे नऊवार इतकी मस्त दिसायची ना त्यांना. मी लहान असतांना रोज त्या मंदिरात जायच्या तेव्हा त्यांना बघायचे. चापुनचोपुन नेसलेली नऊवार, हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, छानसा अंबाडा, कधीकधी त्यावर लावलेलं एखादं फुल. 


माझी आजी म्हणजे पुलंच्या भाषेतली सुबक ठेंगणी. ती जेव्हा सकाळी तिची वेणीफणी करायची तेव्हा मला तिला बघायला फार आवडायचं. तिचा तो स्पेशल डबा ज्यात तिची फणी, आरसा, कुंकू, मेण वगैरे असायचं. छान अंबाडा घालून त्यात आकडे वगैरे लावून झालं की कपाळावर मेण लावून अप्रतिम गोल गरगरीत कुंकू रेखायची. तिच्या चेहऱ्यात फार गोडवा होता. 


दोघींच्याही चेहऱ्यावरचे शांत आणि सात्विक भाव जसं कि देव्हाऱ्यातली समईच जणु! 


तशी सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतच असते त्यामुळेच सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यातच असतं म्हणतात हो ना?? पण हे आज्जी लोकांचं सात्विक सौंदर्य बघायला नजर मात्र नातीचीच हवी हं!!



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

आशिर्वाद

                                                          
        त्या दिवशी मोदक करायला घ्यायच्या आधी हात आपसूक फोनकडे गेला. आईला फोन लावला तर वडील म्हणाले ती गणपती मंदिरात गेलीय. मला सांग तुझं काय काम आहे तिच्याकडे. मी म्हट्लं " काही नाही मोदकासाठी किती रवा घ्यायचा ते विचारायचं होतं तिला." तर हसायला लागले आणि म्हणाले कि ती आल्यावर सांगतो तिला फोन करायला.

       दरवर्षी मोदक केलेले असतात तरीही आईला विचारून केल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास येतो कि अजिबात बिघडणार नाहीत. यथावकाश रवा भिजवला, सारण बनवलं, मोदक केले आणि आईचा फोन आला.

"झाले का ग मोदक? बरोबर घेतलास कि रवा, मोहन घातलस ना?" वगैरे वगैरे.

       तिकडे म्हणजे पुण्यात होते तेव्हा प्रत्येक सणाला सासूबाई सोबत असायच्याच. एखाद्या विद्यार्थिनीप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच केलेली असायची त्यामुळे बिघडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. पण इथे आल्यापासून सणावाराला आईला नाहीतर सासूबाईंना हमखास फोन होतोच. ४-५ लोकांसाठी पुरण किती घालायचं, पंचामृतामध्ये चिंच गुळाचं प्रमाण किती, एक नाही दहा. एकदा तर मी माझा मावशीला पुरणाला चटका देताना फोन करून हैराण केलं होतं आणि तिनेही तिच्याकडे गौरीजेवणाची गडबड असताना मला सगळ नीट समजावून सांगितलं. खरंतर सगळं प्रमाण माहित असतं, सगळे पदार्थ दरवर्षी बनवलेले असतात पण त्यांना विचारून केल्यावर खरंच आत्मविश्वास येतो.


      लहानपणीपासून वाटायचं कि आशिर्वाद म्हणजे नेमकं काय? आता विचार केला कि वाटतं कि मोदकासाठी आईला फोन केल्यावर तिने दिलेला आत्मविश्वास आणि बिघडणार नाही ह्याची दिलेली शाश्वती, पुरण करताना सासुबाईंनी नीट समजावून सांगितलेलं प्रमाण आणि कृती, शेअर मार्केट मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट वर वडलांनी दिलेले सल्ले आणि शेअर मार्केट संबंधी नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिलेली प्रेरणा, कार शिकत असताना सासऱ्यांनी दिलेले धडे आणि दिलेलं प्रोत्साहन, नवीनच लिहायला सुरुवात केल्यावर दादाने दिलेली शाबासकी आणि त्याचे "लिहीत रहा" म्हणणे, ह्यालाच मोठ्यांचे आशिर्वाद म्हणत असतील! हो ना?   


PC Google


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक







गाणं

एखादया दिवशी नाही का सारखं सारखं एकच एक गाणं डोक्यात राहतं पण त्याचे बोल आठवत नाहीत किंवा कोणत्या सिनेमा मधलं आहे ते आठवत नाही. अगदी तसंच आज सकाळपासून एक गाणं सारखं मनात येत होतं. कुठे ऐकलं तेही आठवत नव्हतं. पण राहुन राहुन मनात तेच तीन शब्द पिंगा घालत होते. बरं पुढचे बोलही आठवत नव्हते कि त्या गाण्याचा सिनेमा.

सकाळी स्वयंपाक करायला लागल्यापासून ते आत्ता थोड्यावेळापुर्वी चारचा चहा करण्यापर्यंत फक्त तीन शब्द, तेही तालासुरात. विचार करून डोकं बधिर झालं आणि मी त्या गाण्याचा शोध लावायला अधीर झाले पण ते गाणं काही दाद देत नव्हतं. त्या तीन शब्दांनंतरची एखादी ओळ तर आठवावी; पण शपथ. जीव खाल्ला त्या गाण्याने.

मी चार वाजायच्या थोडं आधी चहा टाकला आणि सासूबाईंसोबत टीव्ही पाहत बसले तर अचानक "युरेका" झाला ना! बरोब्बर ४ वाजता टीव्हीवर ते तीन शब्द असलेलं गाणं सुरु झालं एकदाचं! और फिर मुझे समज में आया की अर्रर्रर्र हि तर मराठी मालिका आणि त्याच मालिकेच्या शीर्षक गीतातले तीन शब्द माझ्या डोक्यात (गेलेले) होते सकाळपासून. भारतीय वेळेनुसार इथे सगळ्या मराठी मालिका दिसतात.

ओळखलं का तुम्ही?
.
.
नाही?
.
.
सांगूनच टाकते आता
.
.
"तुझ्यात जीव रंगला!"

आता पुढचं गाणं मला पुर्ण पाठच होईल बहुतेक थोड्या दिवसात!


#मराठी_मालिका


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

गर्दी

मागच्या शनिवारी दुपारी बाहेर निघालो असताना गेटच्या बाहेर पडलो अन समोर हे एवढी मोठी गर्दी. आपल्याकडे गणपतीत असते तशी किंवा दिवाळीच्या खरेदीला असते तशी नाही काही. पण इथल्या हिशोबाने गर्दीच. ती गर्दी बघून इथे नवीनच आल्यावरचा किस्सा आठवला.

इथे नवीनच राहायला आल्यावर असच एके शनिवारी फिरायला बाहेर पडलो होतो आणि तर बाहेरच्या प्रचंड मोठ्या गर्दीने भांबावून गेलो. तसे आमच्या गेटच्या उजव्या बाजूलाच एक छोटा बार आणि रस्ता क्रॉस करून समोरच जरा मोठा बार आहे. ह्या दोन्ही बारच्या समोर मोठमोठे घोळके करून लोक प्रचंड थंडीत भयंकर थंड अशा बिअरचा आस्वाद घेत होते. सगळ्या वयोगटातले लोक दिसत होते. लहान मुले सोबत असेलेले लोक बारमध्ये जाता आमच्या गेटसमोरून पुढे जात होते. बाकी आजोबा, पणजोबा, आज्जी, पणजी, काका, काकु वगैरे प्रकारचे लोक बारसमोर निवांत टाईमपास करत होते. आमच्या घराच्या जवळपास असलेले छोटे छोटे रेस्टारंट्स,बेकऱ्या गर्दीने अगदी फुलून गेले होते.

इथे आल्यावर आमच्या समोरच्या रस्त्यावर इतके लोक मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे माझी वाचाच बसली. सवय नाही हो गर्दी वगैरे बघायची. सगळ्या ट्राम्स, बसेस आणि अंडरग्राउंड ट्रेन्स मधून लोक एका विशिष्ट दिशेला निघाले होते. सगळ्यांच्या पोशाखात एक खास निळ्या रंगातील गोष्ट होती. टीशर्ट, स्कार्फ, किंवा टोपी ह्यातलं काहीतरी त्या खास रंगाचं होत. तशाच प्रकारचे झेंडे सुद्धा होते लोकांच्या हातात. मला काहीच समजेना नक्की काय चाललंय ते. वाटलं नक्कीच कुठल्या तरी नेत्याची सभा आहे.

गर्दी ज्या दिशेला चालली होती आम्ही पण तिकडेच निघालो. हळुहळू प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसायला लागला. नक्की पन्नासेक गाड्या होत्या पोलिसांच्या. शेकडो पोलीस रस्त्यावर फिरत होते. दोन चार ऍम्ब्युलन्स, एक दोन फायरब्रिगेडच्या गाड्या. आता मात्र माझी खात्रीच झाली कि सभाच आहे म्हणून. तसं मी ह्यांना बोलून पण दाखवलं. पण म्हटलं सभा असेल तर सगळीकडे प्रचंड प्रमाणात फ्लेक्स लावलेले हवे होते. सभेच्या जागी नेत्यांचे कटाऊट्स वगैरे. म्हटलं छे! काय हे लोक. एवढी गर्दी खेचण्याचे सामर्थ्य असलेल्या नेत्याचा साधा एक फ्लेक्स नाही. भारतीय मनाला पटतच नव्हतं ना!

आम्ही आपलं गर्दी जाईल तिकडे चाललो होतो. बरं एवढी गर्दी होती पण ना गोंधळ, ना गोंगाट, ना धक्काबुक्की, ना किळसवाणे स्पर्श, ना अरेरावी. असं कुठं असतंय होय? मला वाटलं मी नक्कीच स्वप्न पाहतेय. पुढे गेल्यावर एक मोठ्ठा साक्षात्कार झाला. स्टेडियम आहे हो इथे. फुटबॉलची मॅच होती त्या दिवशी! त्यामुळेच एवढी प्रचंड गर्दी, एवढा पोलीस बंदोबस्त!

फुटबॉल धर्म आहे इथला आणि त्यात १८६० म्युनिच नावाच्या टीमची मॅच म्हणजे काही विचारायलाच नको. कोणत्या टीमसोबत मॅच होती तेही कळलं नाही कारण त्यांचे फॅन्स नसल्यातच जमा. मॅच संपल्यावर १८६० टीम जिंकली किंवा हरली तरीही पोलिसांची गरज पडते इथे. आम्ही अनुभवलं आहे. मॅच सम्पली कि पुन्हा सगळी गर्दी आमच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर बिअरच्या बाटल्या घेऊन फिरत असते. १८६० जिंकली असेल तर उत्साह बघण्यासारखा असतो गर्दीचा. एखादा घोळका मस्त गाणी म्हणतो. कोणीतरी फ्लॅशमॉब सुरु करतात. रात्री उशिरापर्यंत त्यांचं सेलिब्रेशन चालू असतं. एरवी अगदी शिस्तीत वावरणारे लोक त्या गर्दीचा हिस्सा झाले कि ट्राम्सच्या, बसेसच्या समोरच फतकल मारून बसतात नाहीतर रस्त्यावर बाटल्या फोडतात. पोलीस मग समज देऊन लोकांना रस्त्यावरून बाजूला करतात. तोपर्यंत ट्राम किंवा बस जागची हालत नाही त्यामुळे ट्रॅफिक जॅम. स्टेडियम आमच्या घरापासून साधारण एखादा किलोमीटर असेल पण गोल झाला कि तिथल्या जल्लोषाचा आवाज थेट घरात येतो. रात्रीच्या वेळी मॅच असेल तर तिथले फ्लड लाईट्स दिसतात घरातून.

असं काही इथे होत असेल ह्यावर विश्वासच बसत नव्हता. आम्हाला हे सगळं बघून धक्क्यावर धक्के बसत होते. ह्या धक्क्यामुळे आमची अवस्था जाना था जपान पोहोच गये चीन झाली. जायचं होतं एका दुकानात गेलो तिसऱ्याच दुकानात. घरी आलो तर तोच गोंधळ. रात्री उशिरापर्यंत गाणे, गोंगाट चालू होता. जिथे रात्री सात नंतर टाचणी पडली तरी आवाज होऊन शेजारच्या लोकांना त्याही आवाजाचा त्रास होईल असं वाटत होतं तिथे असा गोंधळ बघून जाम मजा वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी ठिकठिकाणी बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. प्रचंड प्रमाणात सिगरेट्सची थोटकं सगळीकडे विखुरलेले होती.  

पण ही मॅच अधूनमधून असावीच असं वाटत राहतं कारण उत्साहाने गर्दी करणारे लोक आजूबाजूला तेव्हाच दिसतात आणि कसं का होईना आपण माणसातच राहतो ह्याची म्यूनिचमधे खात्री पटते!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

PC Google




वाचकांना आवडलेले काही