शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

अनपेक्षित

   परवा बाहेरून घरी येत होते, स्टेशनमधुन वर आले आणि घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अगदी वाहता रस्ता आहे. पण २-३ वर्षात एकदाही पोलीस कार आणि ऍम्ब्युलन्स शिवाय एकाही गाडीच्या हॉर्नचा आवाज नाही ऐकला कधी! वेगवेगळ्या आवाजांसाठी वेळा ठरलेल्या आहेत कदाचित इथल्या रुलबुकमध्ये कारण एकदा सकाळी पावणे सात वाजता आम्ही बस पकडायला स्टॉपकडे पळत चाललो होतो. आमच्या पायांच्या आवाजामुळे जवळच असलेल्या बेकरीमधले आजोबा बाहेर आले वसक्कन वसकलेच आमच्यावर, "इथे सकाळी सातच्या आत पायांचा आवाज नाही करायचा, एवढं माहिती नाही तुम्हाला! पळू नका चालत जा." हे ऐकुन लेक तर टरकलाच बिचारा. तेव्हापासून भर दिवसाही पळायची भीती बसलीये.
  
   पण "अगा जे घडलेची नाही" असं काहीसं झालं. अचानक ४-५ गाड्यांचे हॉर्न ऐकु यायला लागले; तेही अगदी जोरात आणि तालासुरात.जवळच्या सगळ्या दुकानांमधून लोक बाहेर आले नक्की काय चाललंय ते पाहायला. माझ्या सहित आजूबाजूचे सगळे लोक गाड्या येत होत्या त्या दिशेने बघायला लागले. मी पण जागीच थबकले आणि "आँ" असे भाव चेहऱ्यावर आले. बाकीच्या लोकांच्या चेहऱ्यावर "काय कटकट आहे" तत्सम भाव. त्याला कारणही तसेच होते. ती लग्नाची वरात होती!! मला गंमतच वाटली. वरात जर्मन लोकांची नव्हती पण, तुर्कीश होती. "परवानगी बरी मिळाली त्यांना" असा बालिश विचार मनात आला. जसं काही लेकाच्या मुंजीची वरात काढायची परवानगीच नाकारलीये मला. 

  असाच अजून एक विलक्षण अनुभव आला. मागच्या आठवड्यात आम्हाला फोन आला की घरात नवीन "स्मोक डिटेक्टर्स" बसवायचे आहे. तुमचा वेळ सांगा त्यावेळी आमचे लोक बसवून जातील. आम्ही वेळ सांगितली. शुक्रवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता बेल वाजली. मला वाटलं एखादा मनुष्य असेल पण दार उघडल्यावर अक्षरशः धक्काच बसला. वयवर्षे ७० ते ७५ च्या आसपासचे आजी-आजोबा दारात उभे होते. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य त्यांना कळलं बहुतेक कारण आजोबा जर्मन मध्ये म्हणाले " हो आम्हीच बसवणार आहोत स्मोक डिटेक्टर्स." 

  दोघेही घरात आले, मला आणि लेकाला प्रेमाने ग्रीट केलं आणि कामाला लागले. आजी सगळं पेपरवर्क तपासत होत्या आणि आजोबांनी डिवाइस लावायची तयारी सुरु केली. आजोबानी खुर्ची घेतली आणि चढायला लागले, तर लेक पटकन म्हणाला " मी मदत करतो तुम्हाला." आजोबा म्हणतात कसे " अरेवा हुशार आहेस तु. पण धन्यवाद. मी एकदम फिट अँड फाईन आहे." आजोबानी पटापट तिन्ही स्मोक डिटेक्टर्स लावून टाकले आणि आज्जीनी माझी सही घेतली. मी विचारलं कॉफी घेता का दोघे? तर मला नम्रपणे नकार दिला त्यांनी आणि म्हणाले "आम्हाला अजुन तीन ठिकाणी जायचं आहे. तुमचा मुलगा खूपच काईन्ड आहे. गॉड ब्लेस हिम!" आणि निरोप घेऊन निघून गेले. अशा अनपेक्षित गोष्टी घडल्या की फार मस्त वाटतं!!

सकाळी आपल्या आधी उठुन, नवऱ्याने विचारलेला "चहा टाकु का?" हा प्रश्न मात्र अनपेक्षितच्या लिस्टमध्ये नेहमीच पहिला असेल. 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                             

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

हाय मिरची

आज भाजीपाला, फळे वगैरे आणायला जवळच्या दुकानात गेले होते. दुकान म्हणताच नाही येत खरंतर कारण बऱ्यापैकी मोठं दुकान आहे, मॉलच म्हणुया. सगळ्या गरजेच्या वस्तु एकाच छताखाली. एकतर इथे सुट्टी असली की एकुणएक दुकानं बंद असतात. रविवारला जोडुन एखादी सुट्टी असेल तर त्याआधीच दुध इत्यादी गोष्टी आठवणीने आणून ठेवाव्या लागतात. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानं बंद असण्याची आपल्याला सवयच नाहीये. पण इथे आल्यापासून असल्या भयंकर गोष्टींची सवय होतीये हळुहळु!

शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे आज बरीच गर्दी होती. मी आपलं माझं बास्केट घेऊन पेमेन्टच्या रांगेत उभी होते. हम जिस लाईनमें खडे होते है वो लाईन हमेशा... मुंगीच्या पावलाने पुढे सरकते! बिलिंग काउंटरला एक टॅटूड काकु होत्या. चेहरा सोडुन, काकुंच्या गळ्यावर, मानेवर, हातावर टॅटूवाल्याकडचे सगळे टॅटु होते बहुतेक. फक्त नाक आणि कान टोचलेले असतात अशा गैरसमजात लहानाची मोठी झालेल्या मला काकुंना बघुन कळले की नाक आणि कान न टोचता गाल, ओठ आणि भुवई टोचतात म्हणजे पिअर्सिंग की काय ते! काकुंच्या दोन्ही गालावर आणि ओठात मोरण्या होत्या आणि भुवयांना छोट्या रिंग्ज.

रांगेतील सगळ्यात पुढे असलेल्या नव्वद वर्षीय आज्जींचे काकूंसोबत काहीतरी वाद चालले होते. त्यांना कुठलीतरी वस्तू परत करायची होती आणि काकु नाही म्हणत होती. असे नव्वदीचे आजी-आजोबा एकएकटे किंवा जोडीने हमखास दिसतात खरेदी करताना. वॉकर घेऊन चालतात. त्यांच्याकडे बघून नेहमी दोन टोकाचे विचार माझ्या मनात येतात. एक, बापरे या वयातही स्वतःचं सगळं किती व्यवस्थित करतात आणि दोन, आईगं या वयात यांना एकटंच सगळं करावं लागतं! 

तर आजी-काकूंचा वाद सुटला एकदाचा आणि रांग थोडी पुढे सरकली. माझं  हे सगळं निरीक्षण चालू होतं त्यामुळे माझ्या समोर उभ्या असलेल्या ताईच्या सामानाकडे अजिबात लक्ष गेलं नाही. ती माझ्या समोरच असल्यामुळे तिच्या सामानाचं जेव्हा बिलिंग सुरु झालं तेव्हाच मी पाहिलं. ताई पिशवी घेऊन उभी होती आणि बिल झालेली एकेक गोष्ट पिशवीत टाकत होती. तिच्या सगळ्या वस्तूंचं बिलिंग काकू इतक्या शांतपणे करत होत्या की जसंकाही त्या बरेच वर्ष हिमालयात तपश्चर्या करून आल्या आहेत किंवा सहनशक्तीच बाळकडु त्यांच्या आईने घुटीमध्येच त्यांना दिलंय कारण ताईचं सामान बघुन मला बिलिंगवल्या काकूंचे चरणस्पर्श करावे वाटले!

ताईच्या सामानात प्रत्येकी फक्त एक नग खालील गोष्टी होत्या - सफरचंद,बटाटा, टमाटा, कांदा, लसूण, काकडी, संत्री, लिंबू, गाजर, बेबीकॉर्न, प्लम, केळी, ब्रेड, छोटसं चॉकलेट, कांद्याची पात आणि सरतेशेवटी एकच छोटीशी हिरवी मिरची. त्या छोट्या मिरचीचेही
व्यवस्थित वजन वगैरे करून काकुंनी बिल लावलं. किती सेण्टला एक मिरची पडली हो? असा प्रश्न ओठांपर्यंत आलेला मागे घेतला मी आणि उगाचच आपलं ताईचं बास्केट आणि बिलिंग काउंटर पुन्हा चेक केलं म्हटलं एखादं पालकचं पान किंवा कोथिंबिरीची दांडी विसरलेली असायची. तर खरंच  बेसिलची एक दांडी राहिली होती. ती दांडीही यथोचित सोपस्कार होऊन ताईच्या पिशवीत दिमाखात विराजमान झाली आणि बिल काकूंच्या कम्प्युटरवर पोहोचले. एवढं सगळं झाल्यावर बिलाचे पैसेही ताईने एक एक सेंट मोजुन दिले अक्षरशः आणि काकूंनीही हसतमुखाने बिलाचे पैसे घेऊन ताईला "बाय हॅव अ नाईस डे" विश केलं. हे सगळं बघुन एक विचार माझ्या मनात चमकुन गेला की असं काही पाहिल्यावर डोळे मिटायला मोकळी वगैरे बोलुन तर बसले नाहीये ना मी? उगी जीव वगैरे द्यावा लागायचा!!

या धक्क्यातून कसबसं सावरून बिलिंगला सुरुवात झाल्यावर मात्र वाटलं की माझ्याजवळ असलेल्या चार लिटर दूध, २ किलो बटाटे, २ किलो कांदे, एक किलो टमाटे, अर्धा डझन केळी, २ मोठ्या कॅडबऱ्या आणि असं बरच काही सहित धरणीमातेने मला पोटात घ्यावे!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                     
              

वाचकांना आवडलेले काही