मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

फिलिंग भारतात असल्यावानी...

महत्वाच्या कामासाठी घरातून निघायलाच उशीर होणे. 
म्यूनिचमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच चक्क ट्रॅफिक जॅम मध्ये बस अडकणे आणि कर्मधर्मसंयोगाने तुम्ही त्याच बसमध्ये असणे. पंधरा मिनिटांच्या प्रवासाला एक-सव्वा तास लागणे. 
बसमधील प्रामधारी लेकराने ट्रॅफिक जॅमला कंटाळुन पुर्ण प्रवासभर रडका सूर आळवूण समस्त बसवासियांचे मनोरंजन करणे. बसवासियांनी आणि  बसचालकाने वेगवेगळे लूक देऊनही प्रामधारी लेकराची आई स्थितप्रज्ञ असणे.
त्या प्रामधारी लेकराच्या माऊलीची सहनशक्ती पाहुन तुमच्या सहनशक्तीविषयी (लेकासाठी असलेली) तुम्हाला प्रचंड कॉम्प्लेक्स येणे.
कसंतरी ट्रॅफिक जॅममधुन बाहेर पडून, स्टॉपवर उतरून, बावळटसारखं सायकल ट्रॅकवरच उभं राहुन भारतीय दूतावासाचा पत्ता शोधणे आणि मागुन आलेल्या सायकलवाल्याने "काय अडाणी बाई आहे" असा लुक देणे. 
बरोबर वेळेवर इंटरनेट आणि गुगल मॅप्स लोड व्हायला उशीर झाल्याने पत्ता शोधत चारीही दिशांना भटकणे आणि गुगल मॅप्स लोड झाल्यावर तुमच्या लक्षात येणे की तुम्ही बरोबर उलट्या दिशेला अर्धा किलोमीटर पुढे गेलेले आहात. म्हणून पुन्हा आल्या पावली परत जाणे. 
भारतीय दूतावासासमोरील तिरंगा पाहून मन भरून येणे. 
कामाची वेळ संपायच्या फक्त वीस मिनिटे आधी ऑफिसला पोहचणे आणि तिथला अधिकारी फॉर्म घेण्याच्या खिडकीत नसणे. तुमच्या आधी आलेल्या बऱ्याच लोकांनी टोकन मशीन मधुन वचावचा(एकाच वेळी फर्रर्रर्रर्र करून ३-४ टोकन) टोकन घेणे आणि त्यातले एक टोकन जवळ ठेऊन बाकीचे कचऱ्यात टाकणे. कचऱ्याचा डबा वेगवेगळ्या कागदपत्रांनी आणि टोकन्सनी भरून वाहणे, इतस्ततः कागदी कचरा सांडलेला असणे. 
एक महाभाग तुमच्या बाजुलाच येऊन बसणे ज्यांना फॉर्म कसा भरायचा हे माहित नसणे. त्यांनी प्रत्येक वाक्याचा तुम्हाला अर्थ विचारणे आणि सांगितल्यावर,  वाक्यागणिक म्हणणे "ये सही तो है ना? नही तो मुझे फिरसे नया फॉर्म भरना पडेगा." 
.  
पाच मिनिटांनी अधिकाऱ्याचे आगमन होणे आणि तुमच्या आधी अख्ख एक कुटुंब (हम दो हमारे दो) पासपोर्ट रिन्यू करायला असणे. त्या अधिकाऱ्याची आणि कुटुंबप्रमुखाची आधी इंग्लिशमध्ये सुरुवात होऊन नंतर राष्ट्रभाषेमध्ये शाब्दिक बाचाबाची होणे. 

अ: This form is not properly filled. 
कुप्र : Its okay, I will fill that now. You please check other forms. 
अ: What is this? Birth place की जगह birth date लिखा है आपने. बच्चे के नाम के जगह अपना नाम लिखा है. ये फोटो किस साईज के है? ५ बाय ५ के चाहिये. आपके वाईफकी सिग्नेचरकी जगह आपने अपने सिग्नेचर किये है. 
कुप्र: सर एकही फॉर्म मी गलती हुई है आप अड्जस्ट कर लिजिए ना. 
अ: एक फॉर्म में नही सभी फॉर्म में गलत है. आप लोग ऐसे कुछ भी फॉर्म भरके लेके आते हो और हमें गलिया देते हो कि पासपोर्ट गलत छपवाया. आप कल आईये. 
कुप्र: सर प्लिज देखिये ना कुछ अड्जस्ट होता है तो. बच्चे लेकर इतनी ठंडमें फिरसे आना पडेगा. 
अ: नही भाई, टाईम खतम हो गया, आप कल आईये. 
अशा प्रेमळ संवादानंतर, तुमचा टोकन नंबर स्क्रीनवर झळकणे आणि वैतागलेल्या अधिकाऱ्याने तुमचा फॉर्म नीट न पाहताच, हे नाहीये ते नाहीये उद्या या असे राष्ट्रभाषेतच सांगणे. तरीही दिल चाहता है मधील सैफ सारखे तुम्ही मध्ये मध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणे आणि तो फसणे. जसं की -

अ: ये क्या है? यहाँ सिग्नेचर क्यु नहीं है?
मी: लेकीन ये तो... 
लगेच अ: ये विजा पुराना है 
मी: आप ठिकसे.. 
लगेच अ: कार्ड की कॉपी नही है
मी: मगर हमें तो... 
लगेच अ: मॅडम टाईम खतम हो गया, आप कल आईये. 

आणि खिडकी बंद होणे. 
"आ बैल मुझे मार" या उक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नवऱ्याला स्वतःच फोन लावुन वरील अनुभवाचे कथन करणे आणि त्याच्या शिव्या खाणे. 
मी तेच म्हटलं, खुप दिवसांपासून फार चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं मला. आज कळालं मी काय मिस करत होते ते!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                          #rajashrismunichdiaries

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

धडा

आजच WA वर "vitamin N" असा काहीतरी व्हिडीओ पाहिला. मुलांना "नाही" ऐकायची सवय लावा वगैरे वगैरे; कुठलेतरी फॉरेनचे काका सांगत होते म्हटल्यावर आपल्याकडचे लोक आवर्जुन शेअर करणार. आमच्यासारखे पालक मुलांनी काही मागायच्या आतच नाही म्हणून मोकळे होतात आणि बरेचसे भारतीय पालक मुलांना फक्त नाहीच ऐकवतात हे त्या काकांना माहित नसावं बहुधा.

तर हे "नाही" म्हणण्यावरून इथे आल्यानंतरची पहिली मॉल व्हिजिट आठवली. लेक तसा लहान होता तेव्हा आणि भारतीय विचारसारणीचाही होता (आता जर्मन रुलबुक घेऊन फिरतो आणि आम्हा दोघांना शिकवत राहतो ती गोष्ट वेगळी). इथे शनिवारीच काय असेल नसेल ती खरेदी करावी लागते; रविवारी एकही मॉल अथवा दुकान उघडं नसतं. सुट्टी म्हणजे सुट्टी. शनिवारी आम्ही आपले मॉल फिरायच्या उद्देशाने बाहेर पडलो. तर लेकाने ट्रेनमध्येच भुणभुण सुरु केली. " मग तिथे तु मला काय घेऊन देणार ते सांग तरच मी येतो." मी म्हटलं " तु चल तर मग बघु ". पण त्याने तिथे जाईपर्यंत भुणभुण चालुच ठेवली. शेवटी मी रागावलेच त्याला. मग जरा शांत बसला. पण आम्हा मायलेकाचा हा प्रेमळ संवाद ऐकून ट्रेनमधील जनता भारावून गेली.

त्या मॉलमध्ये स्टेशनवरून आत जायचा रस्ता एका मोठ्या दुकानातून जातो. आणि बरोबर तिथेच त्यांचं खेळण्यांचे सेक्शन आहे. झालं, आम्ही आत शिरलो कि लेकाला खेळण्यांचे सेक्शन दिसलं आणि तो तिकडेच धावला. हेच घ्यायचं, तेच घ्यायचं, नाहीतर मी पुढे येतच नाही, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीला "नाही" एवढंच म्हणत होतो. त्याला जरा समजावलं की सध्या तु इथून चल आपण जाताना बघु. कसंतरी निघाला तो तिथुन. पण पुढे मी ज्या ज्या दुकानात जात होते त्या प्रत्येक दुकानात त्याने अक्षरशः जीव नकोस केला.

शेवटी माझ्या सहनशक्तीच अंत झालाच आणि मी जरा जोरात त्याला रागावले आणि थोडा हात उगारल्यासारखं केलं (माझं नशीब जरा बरं असावं त्या दिवशी म्हणून मी त्याला धपाटा नाही घातला पाठीत, नाहीतर..). त्याने लगेच रडायला सुरुवात केली म्हणुन आम्ही एका ठिकाणी बसलो आणि त्याला शांत करायला लागलो तर आम्हाला दिसलं की एक पोलीस मामा आमच्याकडेच पाहत आहेत. आम्हा दोघांची जाम टरकली. म्हंटल कोणी कंप्लेंट केली की काय आमची. इकडच्या लोकांचं काही सांगता येत नाही. इथले कायदे पण भारी आहेत. "मुलांना मारायचं नाही" हा कायदा आहे. त्यासाठीही तुम्हाला शिक्षा होते. रस्त्यावर जर एखादे आजोबा/आजी चुकून चालताना पडले किंवा कोणाचा तरी ऍक्सीडेन्ट झालाय आणि तुम्ही तिथे असाल आणि तुम्ही त्यांना मदत केली नाही तर तुम्हाला कायद्याने शिक्षा होते.

आम्ही आपलं घाबरलेल्या अवस्थेत कसंतरी लेकाला समजावलं आणि तिथून पोबारा केला. स्टेशनवर पोहोचलो तर नेमकी ट्रेन आताच गेलेली आणि पुढची ट्रेन यायला १० मिनिट. तिथे बसलो तर पोलीस मामा तिथे आले. त्यांची संशयित नजर आमच्यावर रोखलेली आणि त्यात लेकाची भुणभुण सुरूच. त्यात पुन्हा नवऱ्याचं अजून तिसरच, "तरी मी तुला सांगत असतो, त्याच्यावर चिडत जाऊ नकोस, तू ऐकशील तर शपथ." आता जर का लेक सतत तुमच्या कानाशीच "आई, आई" करत असेल तर आणि पूर्ण मॉलभर तुमच्या जॅकेटला (ओढणी नसल्यामुळे) पकडून मागमागे भुणभुणत हिंडत असेल तर कितीवेळ पेशन्स टिकणार, नाही का?

मी आपला मनात देवाचा धावा करत होते "देवा पोलीस मामाला इथून घेऊन जा रे बाबा". पण कर्माची फळं इथेच भोगावी लागतात म्हणे त्यामुळे देवही धावला नाही. आणि पोलीस मामाच आले धावून.. म्हणजे ते न राहवून आले जरा आमची विचारपुस करायला. त्यांनी सरळ लेकालाच जर्मन मधून प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण पुन्हा माझं नशीब आडवं आलं, लेकाला तेव्हा जर्मनचा ज पण येत नव्हता.. हुश्श.. नाहीतर आईच्या पापांचा पाढा वाचला असता त्याने जर्मनमध्ये. असो.

पोलीस मामाना इंग्लिश फार चांगली येत नसल्यामुळे कसबसं तोडकंमोडकं "Is everything okay?" असं लेकाला त्यांनी विचारलं. आणि आमच्या सुपूत्रांनी त्या वेळी अक्षरशः आमच्यावर उपकार केले आणि म्हणाले " yeah fine." आम्ही कानात प्राण आणुन ह्याच उत्तराची वाट पाहत होतो दोघे, कारण जर लेक नाही म्हणाला असता तर पुढे काय झाले असते ते पोलिस मामाच जाणे. इथे मुलांना आधी विचारतात, आईबापाला नाही. मुलांनी आईबाप चांगले आहेत हे एकदा अप्रूव्ह केलं की "कोई माईका लाल आईबापको बुरा नाही बोल सकता!!" लेकाच्या उत्तराने समाधान होऊन पोलिसमामा शेवटी त्यांच्या वाटेने निघुन गेले आणि आम्ही "वसुदेव व देवकी" होता होता वाचलो.

तर इथे मी फार मोठा धडा शिकले कि मुलांचा कितीही राग आला तरी पब्लिक प्लेसमध्ये हसत हसत मराठीत रागवायचं किंवा मुलगा आणि त्याचे बाबा हे आपल्याबरोबर नाहीतच असं समजायचं, जमतं ते!! आई मुलांना रागावणार नाही, असं कधी होत असत का??


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #rajashrismunichdiaries

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

निर्णय

  एखाद्या माणसाच्या आयुष्यात कधीकधी खुप निर्णायक क्षण येतात जिथे त्याच्या समोर दोन पर्याय असतात आणि त्यातला एक निवडणं त्या क्षणी अत्यंत महत्वाचं असतं. अगदी जीवन मरणाचा प्रश्नच म्हणू या ना, त्या माणसासाठी तरी अशीच परिस्थिती असते त्या वेळी. तो, ज्याने त्या निर्णायक क्षणापर्यंत खुप कष्ट घेतलेले असतात, त्या एका गोष्टीसाठी वाट पाहिलेली असते. आणि एका हताश वेळी, ती गोष्ट त्याच्यासमोर येते पण अजून एक पर्याय घेऊन, जिथुन पुढे त्याला दोन रस्ते दिसत असतात. रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. पण तरीही एक पर्याय निवडणं ही त्या क्षणाची फार मोठी परीक्षा असते. तशा या परीक्षा थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात आणि स्वतःच्या परीने माणुस ती परीक्षा पास अथवा नापास होत असतो.

 तर, त्याच्याही आयुष्यात ही परीक्षेची वेळ आली. तो, एक उच्चशिक्षित मध्यमवर्गीय तरुण, ज्याला आईवडिलांनी खूप कष्टाने शिकवलं पण नोकरी मिळवण्यासाठी त्याला फार कष्ट पडले आणि त्याच दरम्यान तो निर्णायक क्षण त्याच्या आयुष्यात आला. नोकरी मिळत नसल्याने खूपच हताश झाला होता तो, तेव्हाच वडिलांच्या एका स्नेह्यांनी त्याच्या गावी एका कंपनीमध्ये त्याच्यासाठी शब्द टाकला. २ दिवसांनी त्या कंपनीमध्ये त्याची मुलाखत ठरली. त्या वेळी तो पुण्यात एका कोर्ससाठी रहात होता. कोर्स पूर्ण करुन नोकरीसाठी अर्ज करणे चालुच होतं त्याचं पण कुठूनही प्रतिसाद येत नव्हता. तेवढ्यात त्याला वडिलांनी गावी ये म्हणून सांगितलं.

  त्याला वाटलं आलेली संधी सोडू नये म्हणून तो लगेच गावी जायला निघाला तरी त्याच्या मनात रुखरुख होतीच की ज्या क्षेत्रात पाहिजे तिथला जॉब नाहीये हा पण वडिलांच्या शब्दाखातर त्याने गावाला जाण्याची बस पकडली. बस मध्ये त्याच्या डोक्यात निरनिराळे विचार पिंगा घालत होते तेवढ्यात त्याला पुण्यातील कोर्स केलेल्या इन्स्टिट्युट मधुन फोन आला कि २ दिवसांनी सकाळी १० वाजता अशाअशा कंपनीत तुमची मुलाखत आहे वेळेवर हजर रहा. दोन्ही मुलाखती एकाच वेळेला पण दोन वेगवेगळ्या गावांना आणि दोन वेगवेगळ्या क्षेत्रात.

 हाच तो खूप मोठी परीक्षा पहाणारा क्षण! मनाची खुप घालमेल, एकीकडे वडिलांनी दिलेला शब्द तर दुसरीकडे मनाजोगतं क्षेत्र. पण तरीही दोन्हीही ठिकाणी यश त्यालाच खेचून आणावं लागणार होतं. पण त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्यावर दुरगामी परिणाम करणार होता. गावी जाऊन आई वडिलांशी शांतपणे चर्चा करून त्याने शेवटी पुण्याच्या कम्पनीची मुलाखत द्यायचा निर्णय घेतला आणि लगेच २ तासांनी तो पुण्याला रवानाही झाला.

 मुलाखत यशस्वी ठरली आणि ती नोकरी त्याला मिळाली. खरंतर ती एक छोटी कम्पनी होती आणि पगारही मनाजोगता नव्हता. पण त्या कामाच्या अनुभवावर पुढे थोड्याच दिवसात एका मल्टिनॅशनल कंपनीत त्याला मस्त जॉब मिळाला आणि त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे!

 आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर असे निर्णय घ्यायची वेळ येते आणि समोर दोन पर्याय असतात. पण असे निर्णय सगळ्यांचेच बरोबर ठरतात का हो? त्यावेळी निवडलेला रस्ता चुकला तर? ज्यांची ह्या प्रश्नांची उत्तरं "नाही" अशी आहेत त्या लोकांना होणाऱ्या यातना फार भयंकर असतात. पुन्हा कधी ते त्या चुकलेल्या निर्णयातुन सावरू शकत नाहीत असं मला वाटतं! त्याच चुकलेल्या निर्णयाने आयुष्याची वाताहत केली तर त्याने निवडलेल्या पर्यायलाच "नशीब" असं म्हणत असतील का?


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                     #nirnay     
    

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

जादु संगीताची

   तुम्ही प्रचंड उद्विग्न अवस्थेत असता, वेगवेगळे विचार डोक्यात अक्षरशः थैमान घालत असतात आणि लेक पटकन जवळ येऊन म्हणतो " आई मी तुला एक खूप भारी गाणं सांगतो, तु ऐक, बघ तुला एकदम Happy वाटेल". खरंतर कोणतेही गाणं वगैरे ऐकण्याच्या मनःस्थितीत तुम्ही अजिबात नसता, पण लेकाचे आर्जवं पण डावलायची इच्छा होत नाही. म्हणून मग विमनस्क अवस्थेत तुम्ही youtube ला Pharrell Williams चे  - Happy song लावता. आणि काय आश्चर्य गाणं ऐकता ऐकता तुम्हाला खरंच आनंदी वाटायला लागतं. मस्त नाचावं वगैरे वाटायला लागतं. त्यानंतर लेकानी सुचवलेले वेगवेगळे गाणे ऐकुन खूप छान वाटतं. सगळं उद्विग्नतेचं मळभ दूर निघून जातं!! संगीतात जादू असते म्हणतात ते काही खोटे नाही. भाषा जरी समजत नसली तरी भावना संगीतातूनच पोहोचतात. कारण इंग्लिश किंवा जर्मन गाण्यातले सगळेच शब्द पटकन समजत नाहीत तरीही हि गाणी ऐकावीशी वाटतात. आपल्याकडे तर प्रचंड खजिना आहे गाण्यांचा. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींशी रिलेट होणारे असंख्य गाणे आहेत.

  गाण्याविषयी लिहितेय म्हणुन एक मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आठवली. मी लहान म्हणजे साधारण ४-५ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी रेडिओ कम टेपरेकॉर्डर घेतला होता. माझ्या वडिलांना मोहम्मद रफी प्रचंड आवडतात. त्यावेळी ते जास्त रफीचेच गाणे ऐकायचे. रफीचे सगळे फेमस गाणे त्यावेळी माझ्या  कानावरून वारंवार जात होते. तेव्हा किशोर कुमार अजून फेमस व्हायचे होते. मोठं झाल्यावर जेव्हा जेव्हा रफी
ची गाणी ऐकली तेव्हा जाणवलं कि मला प्रत्येक गाण्याचा शब्द न शब्द पाठ आहे. तसा अजूनही बऱ्यापैकी पाठ आहे. "एहसान तेरा होगा मुझपर", "तारीफ करू क्या उसकी", दिवाना हुआ बादल", "लाखों है निगाह में" हे आणि असे बरेच गाणे. इतकं भारी वाटलं ना! त्यानंतर किशोरला ऐकायची गोडी लागली आणि अभ्यास सोडून वारंवार ऐकलेली गाणीच डोक्यात बसायला लागली.

  तीच गत "अंदाज अपना अपना" सिनेमाची. कॉलेजमध्ये असताना आम्ही मैत्रिणींनी अक्षरशः पारायणं केली होती ह्या सिनेमाची. तेव्हा एका मैत्रिणीकडे VCR होता. तिच्याकडे अभ्यासाला जाऊन आम्ही सिनेमा बघत बसायचो. आम्हा सगळ्यांना प्रत्येक डायलॉग पाठ आहे सिनेमाचा. आमिर आणि सलमान तेव्हा बरे दिसायचे एकंदर. पण सिनेमा भारी जमलाय हा. आता पुन्हा एकदा त्याच सगळ्या मैत्रिणींसोबत बघायचा आहे एकदा. आणि तीच मजा अनुभवायची आहे, बघु कधी योग येतो ते!

  लिहीत होते इंग्लिश गाण्याविषयी आणि पोहोचले हिंदी सिनेमावर ह्यालाच म्हणतात " फिर भी दिल है हिंदुस्थानी"!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                  

वाचकांना आवडलेले काही