शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

रेस्क्यू ऑपरेशन

म्युनिक नावाच्या ह्या सुंदर शहरावर माझं अक्षरशः प्रेम बसलंय कारण मी बाहेर पडलेय आणि मला वेगळा काही अनुभव आला नाहीये असं क्वचितच घडतं आणि हे अनुभवही खूप काही शिकवून जातात! 

आज खूप दिवसांनी मस्त सूर्यप्रकाश होता आणि थंडीही फार नव्हती त्यामुळे म्हणलं जरा घराबाहेर पडूच! तसंही इतके दिवस असलेली अतिथंडी आणि सततच्या लॉकडाऊनचा वैताग आलाच होता म्हणा. 

तापमान दहाच्या वर गेलं आणि लख्ख सुर्यप्रकाश असला की इथल्या लोकांना त्यांची घरं ऊचलू ऊचलू फेकतात आणि मग ते कोरोनाच्या बापालाही जुमानत नाहीत. त्यामुळे अगदीच अपेक्षित असलेलं दृश्य बाहेर पडल्यावर दिसलं; प्रचंड प्रमाणात जनता आपापल्या मित्रमैत्रिणी आणि लेकराबाळांसह नदीकाठी, बागेत इत्यादी ठिकाणी फिरत होती! आम्हीही मास्क लावुन नदीकिनारी चक्कर टाकायला गेलो. 

आज मस्त “जाडोंकी नर्म धूप” होती आणि तीच धूप खात आम्ही गर्दी टाळून पुलावर ऊभे होतो तेव्हढ्यात खालच्या लोकांनी “ओह" असा मोठ्ठा आवाज केला म्हणुन आम्ही सगळे लोक ज्या दिशेला पाहत होते तिकडे पाहिलं तर एक दादा नदीपात्रातल्या छोट्या बेटावर पडला होता बहुतेक! 

तो वरून, कसा पडला हे कळायला काही मार्ग नव्हता पण त्याच्या पायाला जोरदार लागलं होतं हे नक्की कारण बिचारा एकाच पायावर उभा होता. आता लागलं आहे तर खाली बसावं ना त्याने पण नाही; महाशयांनी चैतन्यकांडी शिलगावली, आम्ही थक्क! 

तोवर त्याच्या मित्राने इमर्जंसीला फोन केला आणि पुढच्या पाच मिनिटात सायरनच्या आवाजात पाच सहा अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे दाखल झाल्या. आता त्या दादाला पाय दुखावल्यामुळे काही सुचत नसावं बहुतेक कारण तो तिथेच आडवा झाला होता. 

आता अग्निशामक दलाचे लोक त्या जागेचा अंदाज घेत होते आणि डॉक्टरला त्या दादापर्यंत कसं पोहोचवता येईल ते बघत होते कारण ती जागा नदीपात्रात असल्यामुळे त्यांना थोडं अवघड जात होतं. शिडी आणुन पटापट ५-६ लोक दादाजवळ पोहोचले आणि आमच्यासहित सगळ्या लोकांचा टांगणीला लागलेला जीव थोडा खाली आला. 

तोवर पोलीस आणि ऍम्ब्युलन्स पण पुलावर पोहोचले होते. आता उत्सुकता होती की हे लोक त्या अवघड जागेवरून त्या दादाला वर कसं घेणार त्याची. पण पोलिसमामानी, पुलावर उभ्या असलेल्या आमच्यासारख्या लोकांना तिथुन पिटाळायला सुरुवात केली कारण एक मोठी क्रेन असलेली गाडी त्यांना तिथे लावायची होती. 

मग काय, मी पळत पळत खाली नदीकिनारी पोहोचले सुद्धा; दादाचं रेस्क्यु ऑपरेशन पुर्ण बघायचं होतं ना! मी पाहिलं तेव्हा डॉक्टर दादावर प्रथमोपचार करत होते. एकजण सलाईन धरून होता, दुसरी त्याच्या पायावर उपचार करत होती, अजून बाकीचे दोघे तिला मदत करत होते आणि अजून दोघे तिघे दादासाठी स्ट्रेचर तयार करत होते. 

तेवढ्यात आकाशात घरघर ऐकु आली; मला वाटलं ह्यांनी काय एअर ऍम्ब्युलन्स बोलावली की काय! पण नाही, ते छोटं विमान होतं!

दादाला स्टेबल केल्यावर सगळ्यांनी अत्यंत हुशारीने त्याला स्ट्रेचरवर ठेवलं तोपर्यंत क्रेनवाले काका क्रेन घेऊन वर उभेच होते. मग त्या लोकांनी क्रेनला लावलेली दोरी दादाच्या स्ट्रेचरला जोडली. त्यानंतर अगदी शांतपणे आणि सूत्रबद्ध पद्धतीने क्रेनची दोरी हळुहळू वर जायला लागली! 

हे सगळं चालु असताना एकजण तिथे उपचारादरम्यान झालेला कचरा गोळा करत होता; मी तर हातच जोडले त्यावेळी! हे सगळं  शिस्तबद्धपणे चाललेलं काम, आम्ही आणि नदीकिनाऱ्यावर असलेले लोक डोळ्याची पापणीही न लवता पाहत होतो. शेवटी एकदम शांतपणे दादाची स्ट्रेचर पुलाच्या कठड्याजवळ पोहोचली आणि वर असलेल्या अग्निशामक दलाच्या लोकांच्या हातात तो पोहोचताच, आम्ही आणि बाकीचे सगळे जे प्राण कंठाशी आणुन हे सगळं बघत होतो, त्या सगळ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह शिट्टया वाजवायला सुरुवात केली!

तर, ह्या सगळ्या गदारोळात पुलावर नक्की दहा गाड्या आलेल्या होत्या, २ पोलिसगाड्या, ६ अग्निशामक दलाच्या आणि २ अजुन कुठल्या तरी. ह्या रेस्क्यु ऑपरेशनसाठी त्यांनी वाहतुक अडवुन ठेवलेली होती तरीही लोक कोणत्याही प्रकारचा आततायीपणा म्हणजेच सतत हॉर्न वाजवणे वगैरे न करता गाड्या घेऊन ऊभे होते! 

दादाला घेऊन ऍम्ब्युलन्स निघुन गेल्यावर, पुढच्या पाचच मिनिटात पुलावरची वाहतुक सुरळीत झाली आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो! 

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक   


शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०२१

चैतन्यकांडी

आज ट्रेनमध्ये दोन सौंदर्यवत्या दिसल्या! मास्क लावलेले असुनही त्या दोघींच्या डोळ्यांवर थापलेला मेकअप पाहुन आपल्याकडच्या जुन्या सिनेमातील नायिकांचा मेकअप आठवला! बटबटीत, डोळ्यांच्या वर काळं कुळकुळीत दिसणारं,डोळ्यांपासून निघुन पार डोक्यात गेलेलं लायनरचं टोक! मला त्या दोघींची लिपिस्टिक कशी असेल ह्याची उत्सुकता लागुन राहिली. लेडीजबायकाचं असंच असतं, घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं! 

तर त्या दोघी साधारण विशीतल्या असतील! माझं अचानक त्या दोघींच्या हाताकडे लक्ष गेलं आणि मी मी डोळे विस्फारले! एकीने हळुचकन पर्समधून एक चौकोनी कागद काढला, मग दुसरीने तिचं अनुकरण केलं. मग पहिलीने तंबाखूची पुडी काढली आणि त्या पुडीतुन स्वतःच्या हातातल्या कागदावर आणि मैत्रिणीच्या हातावरच्या कागदावर थोडी तंबाखु टाकली. पहिली ताई मैत्रिणीला छानपैकी कृती समजावून सांगत सांगत चैतन्यकांडी वळायला लागली; चैतन्यकांडी म्हणजे बिडी हो. मैत्रीणही अगदी मन लावुन त्या ताईचं ऐकत ऐकत बिडी कशी झकास वळता येईल ते बघत होती! 

मग पहिल्या ताईने इकडेतिकडे बघुन, कोणी बघत नाहीये ना वगैरे बघुन, तोंडावरचा मास्क हळुच खाली करून, कागदाच्या एका बाजूला जीभ फिरवून, वळलेली बिडी व्यवस्थित चिकटवली. मैत्रिणीची बिडी नीट जमत नसल्यामुळे ताईने तिला बिडी वळायला मदत केली. अश्या रितीने मला जर्मन बिडी वळण्याचा धडा विनामुल्य मिळाला! ताई जितक्या पोटतिडकीने मैत्रिणीला बिडी कशी वळतात हे कृतीसहीत शिकवत होती ते पाहुन मला माझ्या मैत्रिणींची फार आठवण आली! नाही नाही, आम्ही बीड्या वळत नव्हतो, ते मैत्रीणप्रेम वगैरे!

मला लगेच कळलं की अरेच्या ह्या सौंदर्यवत्या तर पुढच्याच स्टेशनला उतरतील! मला कसं कळलं म्हणताय, सोपं आहे! इथल्या ट्रेन्समधे कोणी बिडी वळायला घेतली तर ते २ स्टेशन्सनंतर उतरणार हे मला गेल्या पाच वर्षात पक्क कळुन चुकलंय!

मी ज्या स्टेशनला उतरले तिथेच त्या दोघी पण उतरल्या! आता मला वाटलं की ह्या नक्की विरुद्ध बाजुला जातील, पण नाही; मी ज्या सरकत्या जिन्याने.. एस्कलेटर हो, वर निघाले, त्या सुद्धा तिकडेच आल्या! 

बस्स... अब सिर्फ और एक सरकता जिना... तेच ते एस्केलेटर आणि लगेच धुरांडं सुरु, मला हे बिड्या वळणाऱ्यांचं माहित झालंय! दुसऱ्या सरकत्या जिन्याने आम्ही जमिनीवर पोहोचतो न पोहोचतो तोच दोघींनी बिड्या शिलगावल्या आणि जोरदार कश मारले आणि मला त्यांची लिपिस्टिक दिसली म्हणुन हायसं वाटलं! काळी होती! 

अहाहा, ती मैत्री पाहुन माझं मन भूतकाळात अगदी ३०-३५ वर्षे मागे गेलं! लहानपणी गावाकडे गेल्यावर माझ्या आज्जीच्या मैत्रिणी आल्या की अश्याच तंबाखु मळत मळत त्यांच्या गप्पा रंगायच्या! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

युरोपिअन पदार्थ आणि मी

सध्या कोरोनाकृपेकरून चिरंजिवांची शाळा ऑनलाईन असल्यामुळे, शाळेतून चक्क वेगवेगळे पदार्थ करायला सामान पाठवत आहेत! जेवणाचे पैसे परत न करता त्यांनी हा पर्याय शोधलाय. भाज्या, फळे, तांदुळ, पास्ता, दही, बटर इत्यादी गोष्टी असतात. 

दर आठवड्यात करायच्या युरोपिअन आणि जर्मन पदार्थांची कृती शाळेच्या पोर्टलवर असते आणि त्यासाठी लागणारी एक ना एक जिन्नस शाळेच्याच ट्रान्सपोर्टने प्रत्यके विद्यार्थ्याच्या घरी पोहोचती केली जाते! सगळे बसचालक जेष्ठ नागरीक आहेत. काल जे काका हे सामान घेऊन आले होते त्यांना पाहुन तर वाटलं की नक्की पंचाहत्तरीचे असतील. 

खरंतर ही संकल्पना फार आवडलीये आम्हाला कारण शाळेच्या ट्रान्सपोर्ट स्टाफला पण काम मिळतंय आणि कुकींग स्टाफला पण! आपल्यामुळे ह्या भयंकर #कोरोना परिस्थितीत कोणाला तरी थोडीशी का होईना मदत होतेय याचा आनंद वाटतोय! 

असे काही एक एक युरोपिअन पदार्थ आणि कृती असते की ज्यांची नावं सुद्धा आपण जन्मात ऐकलेली नसतात, तर ते पदार्थ करण्याचा आणि खाण्याचा प्रश्नच येत नाही! त्यामुळे जे काही सामान येतं त्यात मी भारतीयच पदार्थ करते बऱ्याचदा. पण कृती वाचुन जर वाटलं की हा पदार्थ आपण आणि घरातले खाऊ शकतो तरच तो युरोपिअन पदार्थ करते. पास्ता आता छानच जमायला लागलाय! 

तशी कृती फार अवघड नसते पण आपल्याला एखाद्या पदार्थाची चव आधी माहितीच नसेल तर आपण उगीच संभ्रमात असतो. त्यात ईथल्या बऱ्याच पदार्थांमध्ये दूध आणि मीठ एकत्र वापरायला सांगतात जे मला अजिबातच पटत नाही. असो. 

एकदा तर कोको पावडर मिश्रित रवा आला होता आणि म्हणे पॉरिज करा ह्याची. त्या रव्याची चॉकलेट खीर भन्नाट झाली होती. एकदा इतक्या मोठ्या मोठ्या सिमला मिरच्या आल्या होत्या की आठवडाभर रोज त्याचं काही ना काही करत होते. 

भाज्या तर इतक्या मोठ्या असतात की संपता संपत नाहीत. अक्षरशः एका मोठ्या बटाट्याची भाजी आम्ही तिघे सकाळ संध्याकाळच्या जेवणात खाऊनही संपत नाही. मग काय उचलली भाजी आणि घातली थालीपिठात! हाय काय अन नाय काय! भाज्या संपवण्याचा एकमेव मार्ग! 

कालच्या सामानात भलं मोठ्ठ बीट आलं होतं! एवढ्या मोठ्या बीटाची कोशिंबीर मला एकटीलाच आठवडाभर खावी लागली असती म्हणुन केला त्याचा हलवा. काही पदार्थ दिसायलाच इतके आकर्षक असतात की पटकन एक घास तोंडात टाकावा वाटतो, हा हलवा अगदी तसाच झालाय. 

दुसरं म्हणजे दोन मोठ्ठे लीक, २ भलेमोठे बटाटे सुद्धा आले आहेत! त्यातल्या फक्त अर्धा बटाटा आणि चतकोर लिकचं सुप आम्हाला पुरलं! लीक नामक भाजी ईथे आल्यावरच पाहिली! कांद्याच्या पातीचा फार मोठ्ठा भाऊ म्हणजे लीक, पण चव पातीएवढी उग्र नसते. सूप चांगलं झालं होतं. 

असे एक एक पदार्थ केले की एकमन वाटतं की जरा चव म्हणुन मॅगी काकुंना देऊनच यावा एखादा पदार्थ, पण मग लगेच विचार येतो की उगीच हात दाखवुन अवलक्षण कशाला! नाही का! म्युनिकमध्ये आधीच घर मिळायची मारामार आहे, मी दिलेला पदार्थ खाऊन काकुंनी घरच सोडायला लावलं तर कुठे जाणार!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक




शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

ना मैने सिग्नल देखा ना तुने सिग्नल देखा

 तो: हॅलो काय चाललंय?

ती: बाहेर आहे, काय झालं?

तो: अगं तू सिग्नलवर आहेस का?

ती: नाही. का रे?

तो: का म्हणजे काय? सिग्नलवर ये ना! मी पण आहे आता!

ती: मी कशाला येऊ आत्ता सिग्नलवर? 

तो: कशाला म्हणजे काय? सगळेच येत आहेत! 

ती: सगळे आले म्हणुन मी कशाला येऊ? 

तो: अगं बाई तुला तुझ्या प्रायव्हसीची काही काळजी आहे की नाही!

ती: ए, बाई कोणाला म्हणतो रे,हं! मुलगी आहे मी मु ल गी! समजलं ना! 

तो: बरं बाई, मुलगी तर मुलगी!

ती: बाई नाही मुलगी म्हणाले ना मी!

तो: (ईथे परिस्थिती काय आहे आणि ही बाई डोकं खातेय!) अगं माझी मुलगी.. म्हणजे अगं माझी राणी, मी काय बोलतोय आणि तुझं काय तिसरंच चाललंय! 

ती: बाई कशाला म्हणतोस मग!

तो: बरं नाही म्हणत. तु एकदाची सिग्नलवर ये म्हणजे झालं! 

ती: मी तुला आधीच सांगितलं की मला नाही यायचं सिग्नलवर! आधीच गर्दीने वैतागले आहे मी!

तो: पण मी आहे ना! आणि आता सगळेच येत आहेत म्हणल्यावर गर्दी होणारच ना! गर्दीचं सोड, प्रायव्हसीचं बघ जरा!

ती: तू काय डोक्यावर पडला आहेस का? सिग्नलवर प्रायव्हसी म्हणे! 

तो: काय फालतुपणा लावला आहेस ग! मी नीट सांगतोय की सिग्नलवर ये तर डोक्यावर पडलाय म्हणे! 

ती: मी फालतू! बरं! मला बोलायचंच नाहीये ना तुझ्याशी! 

तो: मी तुला नीट समजावून सांगतोय तर तु ऐकशील तर ना! मी आहे सिग्नलवर, तुला यायचं तर ये नाहीतर राहुदे. तुला तुझ्या डेटाची काळजीच नाहीये तर मी तरी काय करणार! 

ती: डेटा कशाचा डोंबल्याचा! आधीच ट्रॅफिकमध्ये वाट लागलीये आणि म्हणे सिग्नलवर ये! म्हणजे तिथे येऊन अजून अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अडका! इतक्या तुफान गर्दीत प्रायव्हसी मिळेल म्हणे! धन्य आहेस तू! आता तू म्हणतोच आहेस तर येते मी सिग्नलवर, तू आहेस का तिथे? भेटु मग! 

तो: अगं ए यंटम, ट्रॅफिक सिग्नल नाही ग बाई..... सिग्नल ऍप!

ती: पुन्हा बाई म्हणालास ना!

फोन कट!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

तो राजहंस एक

असं म्हणतात की राजहंस जेव्हा जोडीदार निवडतात तेव्हा ते अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहतात! अश्याच एका राजहंसाच्या जोडीविषयी काल एक बातमी वाचली आणि त्याविषयी लिहावं वाटलं. हे वर्ष संपताना विचार केला तर जाणवलं की आपण या वर्षभरात किती संमिश्र भावना अनुभवल्या आणि काल ही बातमी एका जर्मन वर्तमानपत्रात वाचून उगाचच भरून आलं! 

आज जास्त थंडी नसल्यामुळे कुठेतरी दूरवर ऊडत जायचं, काहीतरी नवीन पहायचं आणि हो, पिल्लांसाठी काहीतरी खायला न्यायचं म्हणून ते दोघे ऊडत उडत एका रेल्वेलाईन जवळ येतात! दोन राजहंस, जिवाभावाचे, प्रेमाचे जोडीदार! 

उडता उडत अचानक एकजण रल्वेसाठीच्या ओव्हरहेड वायरमधे अडकतो आणि विजेचा जोरदार झटका बसून जागीच गतप्राण होतो! दुसरा एव्हाना जरा पुढे गेलेला असतो. परंतु त्याच्या लक्षात येतं की आपला जोडीदार कुठे दिसत नाहीये, म्हणून तो पुन्हा रेल्वेलाइनच्या जवळ येतो आणि आपल्या जोडीदाराला असं मरून  पडलेलं पाहुन त्याच्या जवळ येऊन बसतो. त्याच्या जोडीदाराच्या मृत्युमुळे तोही कोलमडून जातो. 

हे सगळं रेल्वेचे कर्मचारी बघतात. त्या राजहंसाला तिथून हलवण्यासाठी थोडा प्रयत्न करतात पण तो अजिबात त्याच्या जोडीदाराच्या कलेवरापासून दूर जात नाही. त्याची स्वतःच्या जोडीदाराविषयी असलेली भावना त्या कर्मचाऱ्यांना कळते आणि ते सुद्धा तब्ब्ल ५० मिनिट त्याला त्याच्या मृत जोडीदारासोबत तसंच बसू देतात. 

त्या राजहंसाच्या शोकासाठी २३ रेल्वेना उशीर होतो पण तरीही हे कर्मचारी त्याला तिथून हलवायची घाई करत नाहीत!  साधारण पन्नास एक मिनिटांनी अग्निशमन दलाचे लोक हळूच त्या राजहंसाना तिथून उचलतात आणि रेल्वेची रहदारी सुरळीत होते!

प्रेमाची ही एक वेगळीच भाषा आपल्याला कळते! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता

एक साधारण पंचाहत्तर ऐंशी वर्षे वयाचे आजोबा पहाटेचा गजर ऐकून उठतात. एकटेच राहत असतात. घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवलेलं जडच्या जड डंबेल दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करतात, पण छे! अवघड असतं त्यांच्यासाठी ते. 

दुसऱ्या दिवशी पण अगदी हाच कार्यक्रम! रोज त्यांचे प्रयत्न सुरूच असतात. एके सकाळी कसंतरी ते डंबेल आजोबा दोन्ही हातांनी ओढत घराबाहेरील बागेत घेऊन येतात. एवढं केल्यानेही ते थकून तिथेच बसतात. 

मग दुसऱ्या दिवशीपासून रोजच पहाटे बागेतच ते उचलायचा प्रयत्न! आजुबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होतो हा! बाजूलाच राहणारी म्हातारी खोचकपणे बघत असते. 

रोज लोक त्यांना बघत असतात. कोणी हसतं, कोणाला त्यांची काळजी वाटते तर कोणाला अजुन काही. पण आजोबा सगळ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करून स्वतःचे लक्ष्य हळुहळू साध्य करत असतात!

आजोबांचा अविरत डंबेल उचलायचा प्रकार पाहून एक दिवस शेजारची म्हातारी काळजीपोटी त्यांच्या मुलीला कळवते. मुलगी लगेचच येऊन बघते. तिला कळतच नाही की या वयात आपले वडील असं का वागत आहेत. ती वडीलांना समजवायचा प्रयत्न करते. पण ते काही मागे हटायला तयार नसतात! त्यांचे प्रयत्न ते सोडत नाहीत कारण इतके दिवस जे डंबेल त्यांना उचलता पण येत नव्हतं ते आता त्यांना त्यांच्या छातीपर्यंत बऱ्यापैकी उचलता यायला लागतं. 

असं करता करता एक दिवस आजोबा ते डंबेल दोन्ही हातांनी व्यवस्थित त्यांच्या डोक्याच्या वर उचलून धरतात! काय खुश होतात म्हणून सांगू! अगदी लहान मुलांसारखी ऊडी मारून आनंद व्यक्त करतात! हे पाहुन आजुबाजूच्या शेजारांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतो! तेच शेजारी जे इतके दिवस आजोबांकडे विचित्र नजरेने पाहत असतात. खोचक म्हातारी पण आनंदी दिसते. 

मग तो दिवस उजाडतो! आजोबा मुलीच्या घरी नाताळसाठी जातात. सात आठ वर्षांच्या नातीसाठी छानशी भेटवस्तु नेतात. आजोबांना बघुन नात खुश होऊन त्यांच्याजवळ जाते. म्हातारे आजोबा नातीला पटकन उचलुन घेऊन, नाताळसाठी सजवलेल्या उंच झाडाजवळ नेतात आणि नातीला सफाईदारपणे स्वतःच्या डोक्याच्या उंच उचलतात आणि त्यांची नात त्या झाडाच्या टोकावर सुंदरशी चांदणी लावते! आजोबांच्या डोळ्यांत अश्रूंच्या चांदण्या चमकतात!

ते पाहुन आजोबांच्या लेकीला इतके दिवस पडलेल्या कोड्याची उकल होते की आपले म्हातारे वडील इतके दिवस इतकं जड डंबेल कशासाठी उचलत होते ते आणि तिच्याही डोळ्यांत अश्रु येतात!

प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते काही खोटं नाहीये, हो ना!

(वरील वर्णन एका जर्मन भाषेतल्या सुंदर जाहिरातीचं आहे!)


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

कौन है ये लोग?

 म्युनिकमधल्या कुटुंबांचा आणि खरेदी विक्रीचा अश्या दोन वेगळ्या समूहात (गृप्स) तुम्ही टेलेग्राम नामक ऍपवर सामिल होता. सामिल झाल्या झाल्या नोटिफिकेशन्सचा जीव घ्यायला तुम्ही अजिबात विसरत नाही. फुकटची टिणटिण! 

मग टाळेबंदी (लॉकडाऊन) सुरु होते आणि काय आश्चर्य! एवढा नोटिफिकेशन्सचा जीव घेऊनही तुम्हाला दिवसाला २-४ टिणटिण दिसायला आणि ऐकायला येतात! 

अमुक तमुक जॉईन्ड टेलेग्राम! टिणटिण

अमुक ढमुक जॉईन्ड टेलेग्राम! टिणटिण

तमुक तमुक जॉईन्ड टेलेग्राम! टिणटिण

अरे ये हो क्या रहा है? कुठं नेऊन ठेवलंय व्हॅट्सऍप माझं!

तुमच्या संपर्कयादीतील (कॉन्टॅक्ट्स) कोणती व्यक्ती कधी टेलेग्रामवर आली ह्याची इथंभूत माहिती एकेका टीणटीणने तुम्हाला मिळत असते! काही नोटिफिकेशन बघुन कळतं की अरेच्या ही/हा/हे चक्क आपल्या सम्पर्कयादीत आहेत? बरं ह्या नोटिफिकेशनचा जीवही घेता येत नसतो!

त्यात एक दिवस एक नवटेलेग्रामवासी मैत्रीण चुकून “सीक्रेट कॉन्व्हर्सेशन” सुरु करते आणि नेमकं चिरंजीव तेव्हा गेम खेळत असतात आणि ते नोटिफिकेशन बघून तुमचं डोकं खातात! 

ह्या सगळ्या प्रकाराला वैतागुन तुम्ही टेलेग्रामचाच जीव घ्यायचा असं ठरवता! तोच तुमच्या फोनमध्ये एक अगम्य नोटीफिकेशन येऊन धडकतं जे पाहुन तुम्हांला एकदम “याचसाठी केला होता अट्टहास!” “क्या मैं सपना देख रही हूँ?” सारखं काहीबाही सुचतं! कारण ते नोटीफिकेशन म्हणजे 

“सासूबाई जॉईन्ड टेलेग्राम” असं असतं! 

ते वाचून पूर्वी लोकांना तार आल्यावर वाटायचं तसंच काहीसं तुम्हाला वाटतं! तुम्ही लगेचच ऑफिसबंदमुळे घराचं ऑफिस केलेल्या आणि मिटिंग मध्ये व्यग्र असलेल्या ह्यांना अगदी मिटिंग मध्ये म्यूट करायला लावून तुम्ही सांगता “अरे सासूबाई जॉईन्ड टेलेग्राम” असं नोटीफिकेश आलंय मला! 

त्यांची प्रतिक्रीया ऐकून तुम्हांला “कौन है ये लोग? काहांसे आते है ये लोग?“ हा डायलॉग लिहिणाऱ्याचं फार कौतुक वाटतं कारण हे म्हणतात “टेलेग्राम म्हणजे? आणि हे सांगायला तू मला म्यूट करायला लावलंस!” 

२०२० मध्ये, लॉकडाऊनमधे,“टेलेग्राम म्हणजे काय?“ असं विचारणाऱ्या माणसावर तुम्ही फक्त एक कटाक्ष टाकता आणि मनात म्हणता “मुझे पता है ये लोग, मेरे घरमें ही है ये लोग!” 

पुढे जास्त विचार न करता सासूबाईंना टेलेग्रामवर मेसेज करायला घेता! मेसेज करायला म्हणुन विवक्षित ठिकाणी गेल्यावर तुमची अवस्था DCH मधल्या आकाश सारखी होते, तो बोलत असतो शालिनीशी आणि त्याचं थोडं लक्ष विचलित झाल्यावर शालिनीच्या जागी रोहीत अवतरतो! कारण जिथे सासूबाईंचा फोटो दिसायला पाहीजे तिथे उत्तरभारतीय नवविवाहित तरुणीचा फोटो दिसतो!

तुम्ही अगदी आकाश सारखंच ”अरे! तुम कौन हो?” असं त्या तरुणीला मेसेज करणार ईतक्यात टेलेग्राम म्हणजे काय हे माहीत नसलेला माणुस मिटिंग संपवून म्हणतो “एकदा नंबर चेक करून घे, आईचा जुना नंबर असायचा आणि तु वेंधळ्यासारखी दुसऱ्याच कोणाला तरी मेसेज करायचीस!”

ह्या पॉईंटच्या मुद्द्यामुळे तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपण आईंचा जुना नंबर डिलीटच केला नाहीये! टेलेग्रामवर दिसणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये तोच नंबर दिसतो आणि तुम्ही सासूबाईंचा जुना नंबर डिलीट करता!

आणि वाद घालायला नवीन विषय मिळाल्यामुळे तुम्ही लगेच तुमचा मोर्चा ह्यांच्याकडे वळवता आणि म्हणता “तुला टेलेग्राम म्हणजे काय हे खरंच माहीत नाहीये?“


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

मी, दिवाळी आणि मॅगी काकू

तर झालं असं की, दिवाळीच्या दिवशी दुपारी मी दारात रांगोळी काढत होते आणि तेव्हढ्यात मॅगी काकू बाहेरून आल्या! नेहमीप्रमाणे काय कशी आहेस वगैरे बोलणं झाल्यावर त्यांनी मोर्चा रांगोळीकडे वळवला! 

मला म्हणाल्या, “मी मागचे २-३ दिवस तुझ्या दारात हे सिम्बॉल्स बघतेय, काय आहे नक्की? आणि तू का काढलेस?“ मला वाटलं आता रांगोळीची पण त्यांना काही अडचण आहे की काय! जरा जपूनच मी म्हणाले “सध्या आमच्याकडे दिवाळी आहे ना म्हणून आम्ही हि एक प्रकारच्या सॅण्डने दारात वेगवेगळे डिझाइन्स  काढतो, हिला रांगोळी म्हणतात!” काकूंनी रांगोळी म्हणायचा फार प्रयत्न केला, पण छे बुआ, जमेल तर शपथ! म्हणाल्या “जाऊदे मला म्हणता येत नाही! पण ही तू हाताने काढलीस का? फार सुंदर!” हे ऐकून मी स्वप्न वगैरे तर पहात नाहीये ना ह्याची मनोमन खात्री करून घेतली!

मग त्यांनी विचारलं “दिवाळी म्हणजे काय?” गेले कित्येक वर्षांची  कुठल्या तरी परदेशी माणसाला दिवाळी काय असते हे सांगायची माझी ईच्छा आज पूर्ण होणार ह्या विचारानेच मला फराळाने चढलं नसेल त्यापेक्षा जरा मोठ्या मूठभर मांस चढलं! मी अगदी साग्रसंगीत त्यांना समजावून सांगितलं दिवाळीविषयी आणि मुख्य म्हणजे काकू सुद्धा मन लावून ऐकत होत्या! 

त्यांचा आनंदी चेहरा पाहुन ठरवलंच की यावर्षी त्यांना घरात नेऊन एक बेसनाचा लाडू खाऊच घालू! हाय काय अन नाय काय! दरवर्षी काय नाही म्हणतात! 

 खरंतर इतके वर्षात दरवर्षी दिवाळीत मॅगी काकूंची भेट होतेच. दरवेळी भेटल्या की मी अगत्याने त्यांना घरात या म्हणते पण फारच मानभावी आहेत त्या, मूड नाही म्हणतात! 

मी पुन्हा त्यांना घरात या म्हंटले पण इतकं दिवाळीचं आणि फराळाचं महत्व सांगूनही काकूंनी नवीन बहाणा सांगितला, “अगं मला लगेच बाहेर जायचं आहे ग! पुढच्यावेळी येते हं नक्की!” त्यांच्या उत्तराने माझा चेहरा खर्रकन उतरला! त्यांच्या लक्षात आलं बहुतेक म्हणून अगदी हसून म्हणाल्या “आम्ही जसं मेरी क्रिसमस म्हणतो तसं मी तुला तुझ्या फेस्टिव्हल साठी कसं विश करू?”

मनात म्हंटल “दिवाळी आणि रांगोळी मधलं ळ म्हणूनच दाखवा आता, एवढं दरवर्षी दिवाळीत घरात बोलवते तर येत नाही ना तुम्ही!” पण मग विचार केला खाली पिली दिवाळीमें कायको पंगा लेनेका! नाहीका?

मी म्हणाले “ शुभ दीपावली म्हणा!“ काकूंनी कसबसं शुभ दिपावली म्हणलं आणि पटकन घरात निघून गेल्या! कदाचित त्यांनाही “ळ” ची भीती वाटली असेल! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

लोणी

आज जरा कुठे थोडे लोण्याचे पॅकेट्स आणायला गेले दुकानात तर बिलिंग काकु अश्या काही टकामका बघायला लागल्या की विचारूच नका! असं कुठं असतंय होय? काकूंचे डोळेच बोलत होते-

“कौन है ये लोग इतने बटर लेने वाले?”

“काय बाई आहे! इतके बटर.. हं म्हणूनच गोलगोल दिसतेय!“

“कमाल आहे, कशी खात असेल ही बाई इतके बटर!“ 

“इतके बटर नेतेय तर हिला ब्रेड किती लागतील!“ 

“माझ्या अख्ख्या बिलिंग करिअरमध्ये इतके बटर नेणारी पहिल्यांदाच पहिली!” इत्यादी इत्यादी... 

मीही माझ्या डोळ्यांतून सांगायचा प्रयत्न केला 

“अहो काय सांगु काकु तुम्हांला! आता दिवाळी तोंडावर आलीये, फराळाचं करायचं आहे. पुन्हा तुमच्या इथली थंडी मी म्हणतेय त्यामुळे थंडीचा खाऊ करायचा आहे. त्यात घरातलं तूपही संपत आलंय तेही करावंच लागेल किनई! इतकं तूप करायला लोणी लागणार ना!“

त्यांना माझ्या डोळ्यातलं $&@$ काही कळलं नाही आणि त्या तश्याच अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे आणि मी घेतलेल्या १०-१५ लोण्याच्या पॅकेट्सकडे बघत बसल्या! म्हणुन मी आपलं गपगुमान त्या पॅकेट्सचे पैसे देऊन तिथुन काढता पाय घेतला. न जाणो भुसकून मॅगी काकू ह्याच दुकानात आल्या तर बिलिंग काकू आणि मॅगी काकू मिळुन माझी आरतीच करतील! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

पोपट

शनिवारचा जरा गडबडीचा दिवस. रविवारी बाजार बंदमुळे दोन चार दुकानांमध्ये जाऊन सामान आणणे वगैरे कामं दुपारपर्यंत आटपून, तुम्ही जरा वामकुक्षी घेऊया असा विचार करतच असता की तो इमेल येऊन धडकतो. जो वाचुन तुम्हाला कळतं की आज वामकुक्षीच काय रात्रीची झोपही दुरापास्त होणार आहे. काही नाही, एका प्रोजेक्टची डेडलाईन रविवारीच आहे असं लिहिलेलं असतं त्यात त्यामुळे तुम्ही वामकुक्षीला पुढे ढकलून लॅपटॉपला जवळ घेता. 

तुम्ही पटापट एकेक काम लॅपटॉपवेगळं करत असता .. ते नाही का हातावेगळं म्हणतात तसं! तुमचे हे थोड्या वेळाने तुमच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसतात आणि अगदी प्रेमाने विचारतात "टीव्ही लावु का ग?"  तुमच्या मनात येतं "नेकी और पुछ पुछ!"  पण तसं काहीही न दाखवता तुम्ही शांतपणे "हो" म्हणता. तुम्हाला वाटतं आता डेडलाईनच आहे प्रोजेक्टची तर उगी कशाला एखादा डायलॉग मारुन आ बैल मुझे मार करावं, हो किनई? कारण "एक डायलॉग नवरा बायकोको भांडकुदळ बना सकता है." 

टीव्ही चालु होतो. आयपीएल, राजकारण, बातम्या इत्यादी गोष्टींमध्ये फिरुन फिरुन गाडी शेवटी युट्युबवर खानपानाच्या चॅनलवर येते. तुम्ही कामात मग्न असूनही तुमचं अधूनमधून लक्ष टीव्हीकडे असतंच बरं! एव्हाना संध्याकाळ होत आलेली असते आणि तुमच्या डोक्यात संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करावं?असं डोक्यात येतं म्हणुन तुम्ही ह्यांच्याकडे बघता तर हे "मेरे पिया गये रंगून" म्हणजे हे अगदी मन लावून टीव्हीवर "बटाटेवड्याची कृती" बघत असतात. मग तुम्ही पण त्यांची "मेरे रंग में रंगनेवाली" होऊन अगदी मन लावून "वरुण इनामदारला" बघत असता. तो नाही का हँडसम शेफ! असो. 

तर, ती चवदार बटाट्याची भाजी, त्या भाजीचे वडे करण्यासाठी त्यासाठी बनवलेलं बेसनाचं पीठ, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी. अहाहा! त्यात वरुणची बोलायची स्टाईल. क्या बात है! आता तुमच्या डोक्यात काम सोडून, बस्स बटाटेवडे आणि वरुण! तुम्हाला वाटायला लागतं की हा व्हिडीओ संपला की हे उठून कुकरला बटाटे लावणार आणि पुढच्या एक दीड तासात तुमच्या हातात गरमागरम बटाटेवडे, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी असलेली डिश येणार. भलंमोठं काम आणि आयता बटाटेवडा, और क्या चाहिये? 

वामकुशीला पुढे ढकलल्यामुळे असं गरमागरम बटाटेवड्याचं दिवास्वप्न तुम्ही टीव्हीसमोर बसुन बघायला लागता! कृती संपवून, वरुण तुमचा निरोप घेतो, तुम्ही जड अंतकरणाने त्याला बाय करता आणि तुम्हाला वाटतं की आता तुमचं बटाटेवडा स्वप्न प्रत्यक्षात येणार तोच.... 

हे घड्याळाकडे बघतात आणि तुम्हाला म्हणतात, "अगं साडेसहा होत आलेत, तुला खूपच काम आहे तर मी खिचडी टाकू का?"

हे ऐकुन तुमच्या स्वप्नातल्या हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेच्या चटणीचा पोपट होऊन त्या गरमागरम बटाटेवड्याला घेऊन उडून जातो!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही