गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

धक्का

तसं पाहायला गेलं तर आयुष्यात अनपेक्षित घटनांमुळे जे धक्के बसले आहेत ते #मॅगी_काकूंमुळेच बसले आहेत. त्यांचा शेजार सोडल्यापासून फार निरस आयुष्य चाललंय. तर ते असो. पण आज जो धक्का बसलाय ना तो फारच जिव्हारी लागलाय. आता काय सांगू! जवळच्या भारतीय किराणा दुकानात सकाळच्या पारी जाऊन भक्तिगीते ऐकायच्या सवयीमुळे बसलाय हा धक्का!

आज जरा भाज्या आणि वाणसामान आणावं म्हणलं. बसमध्ये बसल्यावरच तिथे आज कोणती भक्तिगीतं ऐकायला मिळतील हा विचार मनात घोळत होता. त्याच आनंदात ३-४ स्टॉप कधी गेले ते कळलंच नाही. सरकत्या जिन्याने वर जातांनाच गाणी ऐकू येतात. पण आज काही आवाजच आला नाही. मला वाटलं दुकान बंदच आहे. पण दुकान उघडं होत आणि आत जाऊन पाहते तर काय, दुकानात मोठ्ठा टीव्ही लावलेला आणि त्यावर “कजरारे कजरारे तेरे काले काले नैना” गाणं चालू होतं!

अपेक्षाभंग, घोर अपेक्षाभंग! ये किस लाइनमें आ गये आप? असं वाटायला लागलं! भक्तिगीतांच्या जागी कजरारे बघायचं दुःख पचवून मी दुकानवाल्या दादाकडे बघितलं आणि माझ्या लक्षात आलं ”मालक बदललाय जणू!” बदललेला मालक बघूनही मी त्याला विचारलं “तुम्ही तर सकाळी भक्तिगीतं लावता, आज काय आहे हे?” बिचारा ओशाळून म्हणाला “दीदी आज दुकान जल्दी खोली तो सुबहही लगाये थे!” मी अच्छा म्हणून पटापट सामान घेऊन तिथून पळ काढला. पण तो दादा मला “आगाऊ" म्हणाला असेल हे नक्की. तरी बरं त्यांना हे माहित नाहीये की मी त्यांच्या जर्मन ग्राहकांना तुपाविषयी ज्ञान देते आणि त्यांच्या दुकानातून तूप खरेदी करू नका सांगते. हे कळलं तर धुलाई पक्की! 

मला काय करायच्या आहेत बरं नसत्या चौकश्या! पण अपेक्षाभंगाचं दुःख हो, दुसरं काय! लेक आणि नवरा म्हणतात तसं, माझ्या अशा प्रश्नांनी मी नाही तर ते दोघच कधीतरी मार खातील लोकांचा!! 

धक्क्यावरून आठवलं. सुखद म्हणतात तसा धक्का तीन आठवड्यांपूर्वी म्युनिकहून मुंबईला जातांना लुफ्तान्झाच्या विमानात बसला. विमान निघायच्या आधी मराठी लोकांसाठी शुद्ध मराठीमध्ये एक घोषणा झाली. त्या दादाने इतक्या सुस्पष्ट आणि शुद्ध मराठीत सूचना दिल्या की लगेच त्या आवाजाचा शोध घ्यायला लागले. मला वाटलं वैमानिक किंवा एखादा हवाईसुंदरच (हवाईसुंदरी म्हणतात तसं 😛) बोलतोय! पण त्यांच्यापैकी कोणीही मराठी नव्हतं; सगळे जर्मन. तरीही त्यांनी विमानातल्या नव्वद टक्के प्रवाश्यांसाठी मराठीत सूचनावजा घोषणा लावली हे काय कमी आहे! नाहीतर ते इंडिगोवाले. महाराष्ट्रात मुंबई ते छ. संभाजीनगरच्या विमानात इंग्रजी आणि हिंदीमधे सूचना देतात. त्यांना मराठीचं इतकं वावडं का आहे ते काही कळत नाही.  

बाकी काहीही असो, त्या मराठी घोषणेच्या अनपेक्षित सुखद धक्क्यामुळे तो प्रवास कायम लक्षात राहील. एकंदर काय तर धक्के सुखद असो वा दुःखद लक्षात राहतातच!  


#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

तुपाख्यान

आज पुन्हा सकाळच्या वेळी जवळच्या भारतीय किराणा दुकानात गेले होते. तिथे ह्यावेळीही भक्तीगीत चालू होतं. जर्मन मॉलमध्ये सकाळी सकाळी ”राम सिया राम सिया राम जय जय राम” ऐकून अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. 

सध्या लेकाला सुट्या असल्यामुळे मी त्याला नेलं नाही असं कसं होईल! तर ते लेकरू त्याच्या मनाविरुद्ध, कसंतरी जीवावर आल्यासारखं पाय ओढत माझ्यासोबत आलं. म्हणलं जरा आटे दालका भाव पता चलेगा बच्चेको, क्यूँ!

भारतीय किराणा दुकानात खरेदी आटपून मी पैसेच देत होते तेव्हाच एक जर्मन ताई दुकानात आल्या आणि त्यांनी दुकानदाराला घी कुठे आहे?” असं विचारलं. त्यांनी “घी" म्हणलं की माझे कान टवकारले. दुकानदाराने त्यांना सांगितलं कुठे ठेवलंय ते. तोवर माझे पैसे देऊन झाले होते. दुकानवाल्या दादाने नेहमीप्रमाणे चहा घेणार का? विचारलं! आता एवढ्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत मसाला चहाला “नाही" तरी कसं म्हणणार! मी चालेल म्हणणार तितक्यात “आईईई! आता कुठे चहा घेते. काहीही तुझं. ते चहा घ्या म्हणाले की लगेच हो म्हणतेस! मला वेळ नाहीये चल लवकर." असे तडफदार शब्द माझ्या कानावर पडले. मग काय, आलो दुकानाबाहेर. 

पण.. “घी" वाल्या ताईंशी बोलायचंच असं मी ठरवलं होतं. म्हणून लेकाला म्हणाले जरा थांब मला त्या ताईंशी तुपाविषयी बोलायचं आहे. हे ऐकून लेकाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. टिनेजर्सला वैताग आणणाऱ्या गोष्टी आईने केल्याच पाहिजेत; हो किनई! “मी तुझ्यासोबत नाहीये, मी चाललो. काहींच्या काही असतं तुझं. कशाला बोलायचंय अनोळखी बाईशी तुला? आणि तुपाचं काय?“ एवढं बोलून मुलगा पसार! लांबच्या लांब जाऊन थांबला. जिथे कोणालाही कळणार नाही की मी त्याची आई आहे, जी लोकांना तुपाविषयी फुकटचे सल्ले देते!

तेवढ्यात जर्मन ताई दुकानाबाहेर आल्या. मी नमस्कार वगैरे म्हणलं आणि लगेच विषयाला हात घातला. 

मी: तुम्ही नेहमी भारतीय दुकानातूनच तूप घेता का? आणि तुपाविषयी तुम्हाला कसं माहित?

ताई: आम्ही मागे केरळमध्ये योगसाधना करायला गेलो होतो तेव्हा तुपाची महती कळली तेव्हापासून रोजच्या आहारात वापरतो. 

मी: खूपच छान. पण एक सुचवू का? हे जे तूप तुम्ही घेता ना ते भारतातल्या माहितीतल्या ब्रँडचं नाहीये. 

ताई: हो का? मग कोणतं घेत जाऊ?

मी: तुम्ही घरी कराल का? अमुक ब्रॅन्डचं बटर फार छान आहे. ते आणा आणि त्याचं तूप कढवा. फार रवाळ आणि छान वासाचं तूप होतं. मी जर्मनीत आल्यापासून तसंच करते. 

ताई: हो घरी केलं आहे मी. पण तुम्ही नक्की कृती सांगाल का म्हणजे मला समजेल. 

मी: (जर्मनमध्ये शब्द आठवून आठवून तूप कढवण्याची कृती सांगणे म्हणजे लै अवघड काम बघा!) 

ताई: (आनंदून) तसं अवघड नाहीये. पण कंटाळा हो कंटाळा. घरी एवढे सगळे सोपस्कार करायचा कंटाळा! पुढच्या वेळी मी नक्की करून बघेन. 

मी: पण अमुक ब्रँडचंच बटर वापर बरं. दुसऱ्या ब्रॅण्डच्या बटरच्या तुपाला वास येतो. 

ताई: नक्की. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मीही शुभेच्छा दिल्या आणि लेकाला शोधायला निघाले. मॉलच्या बाहेर थेट बसस्टॉपवरच सापडला! जसं काही आजूबाजूचे लोक ह्यालाच म्हणाले असते की ”वो देखो इसकी तूपवाली माँ लोगोको ग्यान दे रही है!” 

तरी बरं मी त्या ताईला आपण भारतात तूप कसं तयार करतो ते नाही सांगितलं! नाहीतर लेक घरी पोहोचला असता आणि त्या ताईने बोलणं अर्धवट सोडून तिथून पळ काढला असता कदाचित!

पण रामदास स्वामींच्या ह्या उक्तीनुसार वागावं आपण “जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।” 🙏🏼🙏🏼


#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही