इथे दरवेळी डॉक्टरकडे गेल्यावर काहीतरी अजब घडतंच. आता परवाचीच गोष्ट बघा ना. डॉक्टर ताईकडे गेलं की ती इतकं हसून स्वागत करते की विचारायची सोय नाही! अगदी आनंदाने तिच्या केबिनमधे न्यायला येते. जसं काही एखाद्या कार्यालाच बोलवलं आहे. त्याहून कहर म्हणजे “हाऊ आर यू? नाईस टू सी यू!” म्हणते. साडीच नेसून जायला पाहिजे होतं खरं, नाहीतरी उन्हाळा सुरु झालाय इथे!
“अगं ताई मला काहीतरी त्रास होत असेल म्हणूनच आले ना! आणि नाईस टू सी यू काय? आपण काय पार्कात भेटलोय का ग? कमाल आहे बुआ!”
त्यात पुन्हा एका भुकेल्या जीवाचे, रेग्युलर चेकअपच्या नावाखाली इतकं भसाभसा रक्त काढते की जसं काही आपल्याला रक्तदानालाच बोलवलं आहे! अमुक, ढमुक, तमुक टेस्टसाठी वेगवगेळ्या परीक्षानळ्या भरतात. त्यापेक्षा एक बाटली काढूनच घ्यावं ना रक्त, हाय काय अन नाय काय! बरं, एवढं रक्त काढल्यावर उपाशीपोटी माणसाला चक्कर येणारच ना! तर म्हणे तू काही आणलं नाहीस का खायला?
“अरेवा! हे बरंय! म्हणजे रक्तही आम्हीच द्या आणि खायलाही आम्हीच आणा! एवढं अगत्याने स्वागत केलं तर जरा खानपानाचं पण बघावं ना. आमच्या भारतात पारलेजी देतात बरं खायला, आहात कुठं?”
रक्त काढताना पून्हा शिळोप्याच्या गप्पा! जर्मनीत करमतं का तुला? लेकरं बाळं किती? तू काय करतेस? आता सुट्टीत भारतात जाणार का? तिकडे मोकाट कुत्रे फार असतात असं ऐकलंय, खरं आहे का? तुला फ्लूचं वॅक्सीन देऊ का?
“अगं जरा दम खा की ताई! किती प्रश्न विचारते आहेस. इथं पोटात कावळे कोकलतायेत आणि तुझा प्रश्नांचा भडीमार.” इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्याला आठवतच नाही की आपल्याला नक्की काय झालंय!
एवढा पाहुणचार घेऊन आपण प्रिस्क्रिप्शन घेऊन औषधाच्या दुकानात जावं तर आपल्याला जो त्रास आहे त्याचं औषध लिहून द्यायला ताई चक्क विसरलेल्या असतात! इतक्या अघळपघळ गप्पा मारल्यावर दुसरं काय होणार म्हणा!
पोटातल्या कोकलत असलेल्या कावळ्यांना हाकलत, पुन्हा वर क्लीनिकमध्ये जाऊन, तिथल्या ढिम्म रिसेप्शनिस्टला विनवून, ताईंकडून आपण प्रिस्क्रिप्शन आणावं आणि औषधांच्या दुकानातल्या ताईने म्हणावं की ह्या गोळ्या आत्ता उपलब्ध नाहीयेत!
हे ऐकून आपलं दुखणं आपोआपच बरं व्हावं!!
#माझी_म्युनिक_डायरी