बऱ्याच दिवसांनी स्वच्छ ऊन पडल्यामुळे आणि पाराही २० अंशाच्यावर गेल्यामुळे तुम्ही चक्कर मारून यावं जरा, असं ठरवता. पण संसारी लोकांना कितीही चकरा माराव्या वाटल्या तरी पर्स/बॅगेत पिशवी ठेवावीच लागते. दुधच संपलंय, फळं आणावी लागतील, आता बाहेर पडतेच आहे तर स्पार्गेल घेऊनच येऊ, इत्यादी गोष्टी काय चुकतात होय. तर ते असो!
अगदी सुखद वातावरणात घराजवळ खरचंच २-४ चकरा मारून तुम्ही बस पकडता. जवळच्या सुपरमार्केट मध्ये अगदी जत्रा असणार हे माहित असल्यामुळे तुम्ही बसने जरा लांबच्या मार्केटचा रस्ता धरता.
बसमध्ये बसल्यावर अचानक ड्रायव्हर काका स्वतःच्या जागेवरून उठुन बसच्या मागील भागात जातात. नक्की काय झालंय हे बघायला तुमच्या सहीत बसमधील पुढील भागातील प्रवासीही मागे वळून बघतात. एक वृद्ध जोडपं बसायला जागा शोधत असतं. त्यातल्या काकूंच्या हाताला प्लास्टर असतं.
ड्रायव्हर काका त्या दोघांना बसच्या पुढील भागात घेऊन येतात. तिथे वृद्धांसाठी राखीव जागेवर दोघांना बसवतात. काकूंची आस्थेने चौकशी करतात. कुठे उतरायचं आहे हेही विचारून घेतात. जोडपं बरंच वयस्कर असल्यामुळे त्यांना धीर देतात.
हे सगळं घडत असताना, बस निघायला उशीर होतोय हे माहित असून, बसमधील एकही प्रवासी कोणत्याही प्रकारची नाराजी दर्शवत नाही. ड्रायव्हर काका शांतपणे बस सुरु करून निघतात. पाचव्या स्टॉपवर वृद्ध जोडप्याला उतरायचं असतं. ड्रायव्हर काका पुन्हा शांतपणे त्यांच्या जागेवरून उठून त्या आजी आजोबांना खाली उतरायला मदत करतात. इथून नीट जाताल ना घरी असंही विचारतात. ते आजी आजोबा त्यांचे आभार मानतात आणि बस पुन्हा सुरु होते. आणि हो, ड्रायव्हर काका स्वतःच साठीचे वगैरे असतात!
खरोखर सुखद अनुभव! इतक्या दिवसांची तुमच्या मनावरील आणि वातावरणातील मरगळ नाहीशी होते. पण दुकानातून सामान आणायचं आहे ह्या विचारसरशी तुम्हाला आठवतं की तुमचं दुकान तर मागेच राहिलं, आजी आजोबांच्या नादात तुम्ही चक्क २ स्टॉप पुढे गेलेल्या असता!
#माझी_म्युनिक_डायरी
(फोटो आपला उगीचंच, इथे वसंत सुरु झालाय ना!)