त्या फालतू कोरोनाने आपलं आयुष्य बदलून टाकलंय खरं! तसं आता म्युनिकमधल्या मेट्रोमध्ये मास्क अत्यावश्यक नाहीये. त्यामुळे मेट्रोच्या डब्यात एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर बाकी लोक मास्कविना प्रवास करत आहेत. पण मास्क घातलेला नसला तरी ते सावट आहेच थोड्याफार प्रमाणात.
मघाशी गर्दीने खचाखच भरलेल्या मेट्रोच्या डब्यात आम्ही बसलो होतो तिथून ४-५ रांगा सोडून, लांब बसलेलं कोणीतरी शिंकलं! डब्यात इतकी शांतता असते कि विचारायची सोय नाही. तशी त्या बाप्याची पहिली शिंका कोण्याच्याही खिजगणतीतही नव्हती.
पण जसजसा तो सटासट शिंका द्यायला लागला तश्या लोकांच्या प्रतिक्रया बदलत गेल्या. त्याच्या दुसऱ्या शिंकेनंतर २-३ डोक्यांनी फोनमधून वर पाहिलं आणि कोण शिंकतय हे बघायचा प्रयत्न केला.
तिसऱ्या शिंकेनंतर अजून ५-७ लोकांनी नक्की कोण शिंकतय ते बघायचा प्रयत्न केला. चौथ्या शिंकेनंतर बऱ्याच लोकांनी एकमेकांकडे बघून सहेतुक कटाक्ष टाकले की काय बाप्या आहे! पाचव्या शिंकेनंतर माझ्यासारख्या शांतपणे जागेवर बसलेय लोकांनी उठून बघायचा प्रयत्न केला की कोण आहे? पण गर्दीमुळे कोणी दिसलंच नाही!
सहाव्या शिंकेनंतर मात्र अख्ख्या डब्याचं लक्ष “कौन है बे तू?” म्हणून त्या बाप्याकडे गेलं. एव्हाना तो नक्कीच ओशाळला असेल. सातव्या आणि शेवटच्या शिंकेनंतर मात्र सगळ्या लोकांचा बांध फुटला आणि डब्यात एकच हश्या पिकला! तो बाप्या नक्कीच पुढच्या स्टेशनला उतरून गेला असेल.. लोकलाजेस्तव! हां मात्र तो जर्मन असेल तर नसेल उतरला बरं!
तरी बरं त्याला सातच शिंका आल्या, त्याबरोबर खोकला वगैरे आला नाही, नाहीतर डब्यातल्या काही अतिशहाण्या लोकांनी इमर्जन्सीला फोन करायला कमी केलं नसतं!
मी त्या बाप्याच्या शिंका मोजल्या म्हणताय. मोजल्या म्हणजे काय? मोजल्याच! मॅगी काकूंची शेजारीण आहे मी पूर्वाश्रमीची त्यामुळे शिंकेची शंका मलाही आलीच ना!
#माझी_म्युनिक_डायरी