गेले आठ दिवस मला फक्त कोल्हेकुई, दारांचं करकरणे,कोणाच्या तरी चालण्याचा आवाज, कोणाच्या तरी भयव्याकुळ किंकाळ्या, कुठेतरी कोणीतरी खुसफूस करतंय, हे आणि असेच भयानक आवाज येत आहेत. घरात सतत कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे असं वाटतंय.
रात्री डोळ्याला डोळा नाही. चित्रविचित्र स्वप्न पडत आहेत. अचानक घाबरून उठतेय मी. लहानपणापासून पाहिलेल्या प्रत्येक भयपटाची आठवण येते आहे. सतत भयंकर पार्श्वसंगीत ऐकू येतंय.
बरेच वर्ष झाले हे असे आवाज आले नव्हते खरं. पण गेल्या आठ दिवसांपासून अक्षरशः रोज संध्याकाळपासून सुरु होणारे हे भयपटाचं पार्श्वसंगीत रात्री झोपेपर्यंत माझ्या मागावर असल्यासारखं सतत चालू आहे.
रामसे बंधू पासून राम गोपाल वर्मा पर्यंतच्या आणि “रात” सिनेमातल्या रेवती पासून ते तात्या विंचू पर्यंत प्रत्येकाची आठवण काढून झाली. बाबो, पण “रात” बघून खरंच यन्टमसारखी फाटली होती तेव्हा, काहीही म्हणा! नारायण धारप व रत्नाकर मतकरींची आतापर्यंत वाचलेली प्रत्येक कादंबरी डोळ्यासमोर आली आणि डोळ्यांसमोर काजवे चमकले!!
मग म्हणलं फार झालं च्यामारी.. झोपेचं खोबरं झालंय.. डोक्याला शांतता म्हणुन नाहीये.. काय लावलीये सतत कोल्हेकुई, दारं करकरणे, पायांचा आवाज!!
शेवटी नवटीनेजरला विचारलंच मी.. अरे मेरे लाल, कधी सबमीट करायचा आहे तुझा हॉरर म्युझिक पीसचा प्रोजेक्ट तुला?? इथं माझी भीतीने गाळण उडतीये रोजची. तर म्हणाला “ आई चिल, करतोय मी उद्या प्रेझेंट!” चिल म्हणे, ईथे थंडीने जीव घेतलाय आणि अजुन कुठे चिल करू? नाही नाही.. #सापळा नाही आलाय परत खिडकीत.
तर पॉईंटचा मुद्दा असा आहे की चिरंजीवांना त्यांच्या संगीत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिलाय की भयपटातील एखादा प्रसंग लिहुन त्यासाठी स्वतः म्युझिक पीस तयार करून ते वर्गात प्रेझेंट करा!
बरं, सारखं आपलं “आई, हे कसं वाटतंय? ऐक, ते कसं वाटतंय? ऐक!” त्याला म्हणलं “अरे बाबाला घाबरव की थोडं!“ पण त्याला चांगलंच माहीत आहे की हे होम ऑफिसवाले त्यांच्या कामामुळेच ईतके वैतागलेले असतात की भुतंखेतं आले तरी ते त्यांना मीटिंगला बसवतील त्यामुळे तेही टरकून असतील!
पोरगं शाळेतून आलं की जे जोरजोरात हॉरर म्युझिक वाजवत बसतंय की बस्स! तरी बरं हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे दारं खिडक्या गच्च बंद असतात नाहीतर आठ दिवसांपासून चाललेलं हे भयसंगीत मॅगी काकूंनी ऐकलं असतं तर आम्हाला आजच घर सोडावं लागलं असतं!
कारण माझ्यासाठी मॅगी काकू म्हणजे नेहमीच “भय इथले संपत नाही!“
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_म्युनिक_डायरी
२ टिप्पण्या:
राजश्री खूप छान लेख, दैवी देणगी आहे तुला लिखाणाची, अभिनंदन आणि शुभेच्छा, आणि हो लिहीत रहा
होम ऑफिसवाले त्यांच्या कामामुळेच ईतके वैतागलेले असतात की भुतंखेतं आले तरी ते त्यांना मीटिंगला बसवतील त्यामुळे तेही टरकून असतील! -☺️��
टिप्पणी पोस्ट करा