पांढरा स्पार्गेल अत्यंत प्रिय आहे इथे. त्याला तर इथे "White gold" किंवा "kings vegetable" किंवा "edible ivory" म्हणूनही ओळखतात! पण मला हिरवाच जास्त आवडला. ह्याच्या शेतीसाठी खास पूर्ण युरोपातून कामगार लोक जर्मनीत आणले जातात. प्रचंड प्रमाणात ह्याचे उत्पादन केले जाते कारण इथे दरडोई दिड किलो इतका आणि पूर्ण सीझनमध्ये १ लाख २५ हजार टन इतका स्पार्गेल खातात. जर्मनी हा युरोपातील सगळ्यात मोठा स्पार्गेल उत्पादक देश आहे आणि २४ जून हा दिवस सीझनचा शेवटचा दिवस असतो म्हणजे असतोच. २५ जूनला कोणी खाताना दिसलं तर काय करतात बापडे देवच जाणे! मी तर असंही ऐकलंय की हे स्पार्गेलवेडे यंटम लोक त्याची सौंदर्यस्पर्धा भरवतात म्हणे. जिथं गेलं तिथं स्पार्गेल. ट्रँका भरून नुसते स्पार्गेल! हे बघून मला लक्ष्मण देशपांडेच्या वऱ्हाडचा डायलॉग आठवलाच "कुणाचा जीव कशात तर ह्यांचा जीव च...!" असो.
अरे कुठे नेऊन ठेवलाय आंबा आमचा!
तर, शतावरीच्या छोट्या छोट्या काड्या असतात. साधारण शेवग्याच्या शेंगा असतात तश्या पण तेवढ्या मोठ्या नाही. शेवग्याच्या शेंगांसारखंच ह्याचाही शिरा काढाव्या लागतात. पांढरी शतावरी जरा कडसर लागते पण हिरवी फार आवडली मला.
जर्मन लोकांची स्पारगेलची पारंपरिक आणि अस्सल पाककृती म्हणजे; पांढऱ्या स्पार्गेलच्या शिरा काढुन, त्या कड्या थोड्या तेलावर वाफवून घ्यायच्या. २-३ बटाटे उकडून, त्याच्या चार फोडी करायच्या. एका पॅनमध्ये बटर टाकायचं, ते वितळलं की थोडे ब्रेडक्रम्स, मीठ आणि काळेमिरे पुड त्यात टाकायचे की झाला सॉस तयार. एका डिशमध्ये बटाटे, स्पार्गेल ठेवून त्यावर हा सॉस टाकायचा. ह्याबरोबर एखादी हॅमची स्लाईस असली की झालं ह्यांचं जेवण!
मी शतावरीच्या काड्या स्वच्छ धुवून, त्याच्या व्यवस्थित शिरा काढून, तुकडे करून फक्त साजूक तुपावर थोड मीठ टाकून परतली. मस्त लोण्यासारखी चव लागते. पांढऱ्या काड्यांच्याच जास्त शिरा काढाव्या लागतात, हिरव्याला फार गरज नाही. मी तर ह्यावर चाट मसाला, लसणाचे लाल तिखट, खर्डा इत्यादी गोष्टी टाकून खाल्ले. सगळ्यांच सिझनिंगने छान लागली. एशियन लोक तेरियाकी सॉस टाकुन करतात, ते पण छान लागते. एकंदर काय तर खरंच चवदार आहे शतावरी!
"जैसा देस वैसा भेस" असं जरी म्हणत असले तरी प्रत्येक पदार्थाला खास भारतीय फोडणी नाही दिली तर मज्जा नाही राव! होय ना?
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक