असं म्हणतात की राजहंस जेव्हा जोडीदार निवडतात तेव्हा ते अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहतात! अश्याच एका राजहंसाच्या जोडीविषयी काल एक बातमी वाचली आणि त्याविषयी लिहावं वाटलं. हे वर्ष संपताना विचार केला तर जाणवलं की आपण या वर्षभरात किती संमिश्र भावना अनुभवल्या आणि काल ही बातमी एका जर्मन वर्तमानपत्रात वाचून उगाचच भरून आलं!
आज जास्त थंडी नसल्यामुळे कुठेतरी दूरवर ऊडत जायचं, काहीतरी नवीन पहायचं आणि हो, पिल्लांसाठी काहीतरी खायला न्यायचं म्हणून ते दोघे ऊडत उडत एका रेल्वेलाईन जवळ येतात! दोन राजहंस, जिवाभावाचे, प्रेमाचे जोडीदार!
उडता उडत अचानक एकजण रल्वेसाठीच्या ओव्हरहेड वायरमधे अडकतो आणि विजेचा जोरदार झटका बसून जागीच गतप्राण होतो! दुसरा एव्हाना जरा पुढे गेलेला असतो. परंतु त्याच्या लक्षात येतं की आपला जोडीदार कुठे दिसत नाहीये, म्हणून तो पुन्हा रेल्वेलाइनच्या जवळ येतो आणि आपल्या जोडीदाराला असं मरून पडलेलं पाहुन त्याच्या जवळ येऊन बसतो. त्याच्या जोडीदाराच्या मृत्युमुळे तोही कोलमडून जातो.
हे सगळं रेल्वेचे कर्मचारी बघतात. त्या राजहंसाला तिथून हलवण्यासाठी थोडा प्रयत्न करतात पण तो अजिबात त्याच्या जोडीदाराच्या कलेवरापासून दूर जात नाही. त्याची स्वतःच्या जोडीदाराविषयी असलेली भावना त्या कर्मचाऱ्यांना कळते आणि ते सुद्धा तब्ब्ल ५० मिनिट त्याला त्याच्या मृत जोडीदारासोबत तसंच बसू देतात.
त्या राजहंसाच्या शोकासाठी २३ रेल्वेना उशीर होतो पण तरीही हे कर्मचारी त्याला तिथून हलवायची घाई करत नाहीत! साधारण पन्नास एक मिनिटांनी अग्निशमन दलाचे लोक हळूच त्या राजहंसाना तिथून उचलतात आणि रेल्वेची रहदारी सुरळीत होते!
प्रेमाची ही एक वेगळीच भाषा आपल्याला कळते!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक