रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

मी, दिवाळी आणि मॅगी काकू

तर झालं असं की, दिवाळीच्या दिवशी दुपारी मी दारात रांगोळी काढत होते आणि तेव्हढ्यात मॅगी काकू बाहेरून आल्या! नेहमीप्रमाणे काय कशी आहेस वगैरे बोलणं झाल्यावर त्यांनी मोर्चा रांगोळीकडे वळवला! 

मला म्हणाल्या, “मी मागचे २-३ दिवस तुझ्या दारात हे सिम्बॉल्स बघतेय, काय आहे नक्की? आणि तू का काढलेस?“ मला वाटलं आता रांगोळीची पण त्यांना काही अडचण आहे की काय! जरा जपूनच मी म्हणाले “सध्या आमच्याकडे दिवाळी आहे ना म्हणून आम्ही हि एक प्रकारच्या सॅण्डने दारात वेगवेगळे डिझाइन्स  काढतो, हिला रांगोळी म्हणतात!” काकूंनी रांगोळी म्हणायचा फार प्रयत्न केला, पण छे बुआ, जमेल तर शपथ! म्हणाल्या “जाऊदे मला म्हणता येत नाही! पण ही तू हाताने काढलीस का? फार सुंदर!” हे ऐकून मी स्वप्न वगैरे तर पहात नाहीये ना ह्याची मनोमन खात्री करून घेतली!

मग त्यांनी विचारलं “दिवाळी म्हणजे काय?” गेले कित्येक वर्षांची  कुठल्या तरी परदेशी माणसाला दिवाळी काय असते हे सांगायची माझी ईच्छा आज पूर्ण होणार ह्या विचारानेच मला फराळाने चढलं नसेल त्यापेक्षा जरा मोठ्या मूठभर मांस चढलं! मी अगदी साग्रसंगीत त्यांना समजावून सांगितलं दिवाळीविषयी आणि मुख्य म्हणजे काकू सुद्धा मन लावून ऐकत होत्या! 

त्यांचा आनंदी चेहरा पाहुन ठरवलंच की यावर्षी त्यांना घरात नेऊन एक बेसनाचा लाडू खाऊच घालू! हाय काय अन नाय काय! दरवर्षी काय नाही म्हणतात! 

 खरंतर इतके वर्षात दरवर्षी दिवाळीत मॅगी काकूंची भेट होतेच. दरवेळी भेटल्या की मी अगत्याने त्यांना घरात या म्हणते पण फारच मानभावी आहेत त्या, मूड नाही म्हणतात! 

मी पुन्हा त्यांना घरात या म्हंटले पण इतकं दिवाळीचं आणि फराळाचं महत्व सांगूनही काकूंनी नवीन बहाणा सांगितला, “अगं मला लगेच बाहेर जायचं आहे ग! पुढच्यावेळी येते हं नक्की!” त्यांच्या उत्तराने माझा चेहरा खर्रकन उतरला! त्यांच्या लक्षात आलं बहुतेक म्हणून अगदी हसून म्हणाल्या “आम्ही जसं मेरी क्रिसमस म्हणतो तसं मी तुला तुझ्या फेस्टिव्हल साठी कसं विश करू?”

मनात म्हंटल “दिवाळी आणि रांगोळी मधलं ळ म्हणूनच दाखवा आता, एवढं दरवर्षी दिवाळीत घरात बोलवते तर येत नाही ना तुम्ही!” पण मग विचार केला खाली पिली दिवाळीमें कायको पंगा लेनेका! नाहीका?

मी म्हणाले “ शुभ दीपावली म्हणा!“ काकूंनी कसबसं शुभ दिपावली म्हणलं आणि पटकन घरात निघून गेल्या! कदाचित त्यांनाही “ळ” ची भीती वाटली असेल! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

लोणी

आज जरा कुठे थोडे लोण्याचे पॅकेट्स आणायला गेले दुकानात तर बिलिंग काकु अश्या काही टकामका बघायला लागल्या की विचारूच नका! असं कुठं असतंय होय? काकूंचे डोळेच बोलत होते-

“कौन है ये लोग इतने बटर लेने वाले?”

“काय बाई आहे! इतके बटर.. हं म्हणूनच गोलगोल दिसतेय!“

“कमाल आहे, कशी खात असेल ही बाई इतके बटर!“ 

“इतके बटर नेतेय तर हिला ब्रेड किती लागतील!“ 

“माझ्या अख्ख्या बिलिंग करिअरमध्ये इतके बटर नेणारी पहिल्यांदाच पहिली!” इत्यादी इत्यादी... 

मीही माझ्या डोळ्यांतून सांगायचा प्रयत्न केला 

“अहो काय सांगु काकु तुम्हांला! आता दिवाळी तोंडावर आलीये, फराळाचं करायचं आहे. पुन्हा तुमच्या इथली थंडी मी म्हणतेय त्यामुळे थंडीचा खाऊ करायचा आहे. त्यात घरातलं तूपही संपत आलंय तेही करावंच लागेल किनई! इतकं तूप करायला लोणी लागणार ना!“

त्यांना माझ्या डोळ्यातलं $&@$ काही कळलं नाही आणि त्या तश्याच अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे आणि मी घेतलेल्या १०-१५ लोण्याच्या पॅकेट्सकडे बघत बसल्या! म्हणुन मी आपलं गपगुमान त्या पॅकेट्सचे पैसे देऊन तिथुन काढता पाय घेतला. न जाणो भुसकून मॅगी काकू ह्याच दुकानात आल्या तर बिलिंग काकू आणि मॅगी काकू मिळुन माझी आरतीच करतील! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

वाचकांना आवडलेले काही