मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

माणुसकी

(माझ्या वडिलांचा अनुभव माझ्या शब्दात!)

आज गजर व्हायच्या आधीच जाग आली. तशी रात्रभर शांत झोप लागलीच नाही म्हणा. लांबचा प्रवास करायचा म्हणजे असं होतंच. त्यात नातवाला सोडून निघताना मनाची घालमेल होतेच. लेक-जावयाच्या घरून निघायची वेळ झाली!

आता पुन्हा सगळ्या विमानतळांवरचे सगळे सोपस्कार करा. सगळं व्यवस्थित पार पडलं म्हणजे मिळवलं. त्यात आज काय म्हणे तर हरितालिका. "हिला" मधुमेह आहे तरीही उपवास करायचाच म्हणतेय. पोरगी, सुन सांगत आहेत हिला नको करू आज उपवास. काही बिघडत नाही, नाही केला तर. पण हिचं काहीच सांगता येत नाही, ह्यांना हो हो म्हणतेय पण उपवास रेटूनच नेईल ती. ऐकेल ती बायको कुठची. विमानात ठीक आहे फळं, ज्यूस मिळतात पण अबूधाबीच्या विमानतळावर काही मिळेल का नाही काय माहित. त्यात तिथे किती वेळ मिळेल तेही माहित नाही. पुन्हा लोकांचे विमानाचे आणि विमानतळांवरचे ऐकलेले चित्रविचित्र अनुभव डोक्यातून जात नाहीत.

असे एक ना अनेक विचार मनात घोळतच होते तेवढयात आमची मेट्रो म्युनिच विमानतळावर पोहोचली. तिथले सगळे सोपस्कार पार पाडून आणि लेकीने सोबत आणलेला नाश्ता; अर्थातच उपासाचे थालीपीठ खाऊन आम्ही सिक्युरिटी चेक साठी लेक जावयाचा निरोप घेऊन निघालो.

विमानप्रवास सुखद होता अबुधाबी पर्यंत. पण "सौनी" हरितालिकेला अजिबात न दुखावल्यामुळे त्यांच्या खाण्याची काळजी होतीच! विमानातून उतरून पुन्हा सगळे सोपस्कार करून पुण्याला जाणाऱ्या विमानाचा गेट नंबर शोधून एकदाचे त्या गेटजवळ विसावलो. पण माझ्या डोक्यात हिच्यासाठी काहीतरी खायला आणायचे विचार घोळतच होते. आजूबाजूला पहिले ;चहाकॉफीच्या दुकानांव्यतिरिक्त काही दिसले नाही. म्हणून हिला तिथे बसवून मी एखादे फळांचे दुकान तरी दिसते का ते शोधत निघालो. एक दुकान कसंबसं सापडलं. जिवात जीव आला. वेळ जास्त नव्हता ना हातात!

अरबन फूड कि काय नाव होते दुकानाचे. तिथल्या मुलीला इंग्रजी नीट कळत नव्हती आणि मला तिची अरबी भाषा. मी आपलं एक सफरचंद घेतलं आणि तिला "मनी?" असं विचारलं. तिने काहीतरी अरबी मध्ये सांगितलं पण मला काही हिशोब लागला नाही. मी माझ्याजवळ असलेले युरो तिला दाखवले ती नाही म्हणाली . मग मी रुपये दाखवले त्यालाही ती नाहीच म्हणाली. आता आली का पंचाईत? ती मुलगी अरब करन्सीच मागत होती. विमान सुटण्याची वेळ जवळ येत होती, हिला भूक लागली होती. मधुमेह असल्यामुळे तिला काहीतरी खाणे गरजेचे होते. जवळ कुठे करन्सी बदल करण्याचे ऑफिस दिसत नव्हते.

माझ्या चेहऱ्यावर माझ्या मनातली चलबिचल स्पष्ट दिसत असणार. मी त्या मुलीला विनंती करत होतो की तू जास्त युरो घे पण सफरचंद दे पण ती "लिराच" पाहिजे म्हणुन अडून बसली. तिथे बसलेला एक तिशीतला प्रवाशी आमच्यातला संवाद शांतपणे ऐकत होता. मग तो उठून माझ्याजवळ आला आणि त्या मुलीला त्याने अरबी भाषेत विचारले "किती झाले?" तिने पैसे सांगितले तर त्याने लगेच तिला सहा लिरा दिले आणि माझ्याकडे बघून आश्वासक हसला. माझ्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद त्याच्याही चेहऱ्यावर दिसला!

मी त्याला माझ्याजवळचे युरो दिले. त्याने अगदी अदबीने पैसे नाकारले आणि म्हणाला, "आप मेरे अब्बा के उम्रके हो! आपसे कैसे पैसे ले सकता हूँ मैं?"  त्याच्या ह्या उत्तराने तर मला वाटलं कि "देवासारखा धावून आला पोरगा!" वेळेअभावी तिथून निघताना मी त्याला अगदी मनातून धन्यवाद देऊन छोटी गळाभेट घेतली त्याची आणि आणि त्याचा निरोप घेतला. पण अचानक लक्षात आलं कि आपण साधं नावही नाही विचारलं पोराला. मागे वळून मी त्याला विचारलं  "नाम क्या है बेटा तुम्हारा?"

निखळ हसत तो उत्तरला " मोहम्मद!"

जगात असणाऱ्या माणुसकीवरचा माझा विश्वास अजूनच दृढ झाला त्या दिवशी!



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

गंगेत घोडं नहालं

आई बाबा येऊन महिना दीड महिना झालाय पण त्यांना त्यांचं दर्शनच होत नव्हतं. रोज वाटायचं आज तरी भेटतील किंवा दिसतील पण कसचं काय. आमच्या आणि त्यांच्या बाहेर पडायच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे भेटीचा योग जुळतच नव्हता. तरीही एक दीड महिन्यात एकदाही दर्शन होऊ नये म्हणजे फार झालं. भारतातून बहिणीचा फोन आला तर तिलाही चिंता लागून राहिली होती की मावशीला अजून चक्क त्याचं दर्शन नाही!

 आपण अंदाज घेऊन त्या बाहेर पडत आहेत असं वाटुन पटकन दार उघडावं तर लिफ्टचा दरवाजा लागत असायचा आणि त्या गायब. घरात होणारी हळहळ तर वेगळीच. "अरेरे थोडक्यात भेट हुकली."  म्हणजे एकंदर लोकांना शंका यायला लागली होती की इतक्या दिवस हि पोस्ट लिहितेय ह्यांच्यावर ते काय एखादं काल्पनिक पात्र आहे कि काय? माझा उगीचच स्वतःवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागला ना! मेल्याहून मेल्यासारखे होणे म्हणजे काय हे कळायला लागलं. म्हटलं फेबुवर लोकांना कळलं तर पोस्ट टाकायचे वांदे होतील.

  पण नाही.. देवालाच डोळे हो! एक दिवस माझा विश्वास सार्थ ठरला आणि मला एक आयडियाची कल्पना सुचली. ते फुल न फुलाची पाकळी सारखं भेट नाहीतर दर्शन तरी म्हणून आईला म्हटलं "अगं काकू बाहेर निघाल्या आहेत बहुतेक. पटकन गॅलरित जा. सायकल घेऊन जात असतील तर दिसतील." बिचारी आई देवाचा जप सोडून गॅलरीत हजर झाली. काकूंनी सायकल काढताना वर कटाक्ष टाकला आणि आईला "हॅलो" म्हटले एकदाचे आणि माझा जीव भांड्यात पडला. म्हटलं म्युनिचला बोलावून मॅगी काकूंना नाही भेटवलं तर भारतात तोंड दाखवायला जागा नाही राहणार आणि लोक म्हणायचे "हॅट तेरी जिंदगानीपें!"

आणि मनाला शांती तेव्हा लाभली जेव्हा काकू समक्ष आईला भेटल्या.

 उपवास म्हटलं कि साबुदाणा वडे करण्याचा शिरस्ता फार जुना आहे. काल रात्री वडे तळल्यामुळे स्मोक डिटेक्टेर कोकलू नये म्हणून रात्री जरा वेळ दार उघडं ठेवलं आणि तेवढ्यात काय आश्चर्य काकू बाहेरून आल्या! माझ्याशी बोलायला थांबल्या आणि म्हणाल्या "अगं तुझ्या घरातलं ते हे", बापरे केवढा मोठा गोळा आला पोटात! आता कशाचा आवाज येतोय ह्यांना? कोणी "ते हे" म्हणाले कि भीतीच वाटते आणि मॅगी काकू असं बोलल्या म्हणजे नक्की काय असेल देव जाणे. शेवटी त्यांना आठवलं "ते हे" म्हणजे इंटरकॉम. पोटातला भीतीचा गोळा गायब! मी पटकन सांगून टाकलं " इंटरकॉम नीट चालू आहे." हे " ते हे" प्रकरण जागतिक आहे एकंदर.

  आईला बाहेर बोलावून काकुंशी रीतसर ओळख करून दिली. काकूंचे जर्मन मिश्रित इंग्लिश आणि आईचे मराठी मिश्रित इंग्लिश असा त्यांचा मनोरंजनात्मक संवाद ऐकून मला माझ्या मराठी, इंग्लिश आणि जर्मन ज्ञानाविषयी जरा शंका आलीच आणि मी आता ह्या दोघींमध्ये नक्की कोणत्या भाषेत बोलावे हा मोठा प्रश्न पडला! शेवटी गुड नाईट म्हणून त्या दोघीनी एकमेकींचा आरोप घेतला.

  काल रात्री "गंगेत घोडं नहालं" म्हणीची प्रचिती आल्यामुळे फार निवांत झोप लागली!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

वाचकांना आवडलेले काही