मला असं वाटतं की माणसाने प्रत्येक देशांतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करायलाच पाहिजे. तिथल्या रेल्वे, बस, बोटीमध्ये फिरताना येणारे काही अनुभव खरोखर आयुष्यभर लक्षात राहतात.
मागच्या महिन्यात युरोपातल्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या देशात फिरून आलो. तिथे खास निसर्गसौंदर्य बघता यावं यासाठी त्यांनी एक ट्रेन रूट बनवला आहे. त्या ट्रेनचा प्रवास साधारण तीन साडेतीन तासाचा आहे. मोठमोठ्या काचेच्या खिडक्या, छतावरही पारदर्शक काच लावलेली त्यामुळे आपलं भान हरपलं नाही तर नवलंच!
पण माझं भान ह्या ट्रेनमध्ये आमच्या बाजूच्या जागेवर बसलेल्या छोट्या दोस्तांमुळे हरपलं होतं. आम्ही तिघे चार आसनी जागेवर बसलो होतो आणि आमच्या जागेला समांतर असलेल्या चार आसनी जागेवर एक चिनी कुटुंब बसले होते. आई वडील एक २-३ वर्षांची चिमुरडी, एक ५-६ वर्षांचा छोटू, आणि त्यांची आजी. ट्रेन निघाल्यापासून दोन्ही लेकरं त्यांच्या समोरच्या पुस्तकांमध्ये काहीतरी लिहीत होते नाहीतर वाचत होते.
थोड्या वेळात ती गोंडस चिमुरडी तिच्या बाबांच्या कुशीत शांत झोपली. तोवर तिचा भाऊ वाचन करत होता. थोड्या वेळाने ती चिमुरडी झोपेतून उठली. मग आईवडिलांनी दोन्ही लेकरांना फक्त १५ मिनिटांसाठी मोबाईलवर व्हिडीओज लावून दिले. १५ मिनिटांनी त्या लेकरांनी स्वतःहून मोबाईल आईवडिलांकडे सोपवले, आईने दिलेले ब्रेड खाल्ले आणि पुन्हा त्यांच्या समोरच्या पुस्तकांमध्ये ती लेकरं गुंग झाली. आईकडे एका पिशवीत दोन्ही लेकरांसाठी पुस्तकांचा साठा होता. कोडे सोडवणे, अंकांवरून चित्र तयार करणे, लहान लहान गणितं सोडवणे, अशी ती पुस्तकं होती. एक पुस्तक संपलं की दुसरं पुस्तक समोर हजर होतं!
तीन साडेतीन तासांच्या प्रवासात मला एकदाही दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज आला नाही. मोबाईल पाहिजे म्हणून एकानेही हट्ट अथवा तमाशा केला नाही. मी आवक होऊन हे सगळं नजरेच्या कोपऱ्यातून पाहत होते. धन्य ते आईवडील आणि धन्य ती मुलं! आपण म्हणा किंवा बाकीच्यांनी चिनी लोकांना कितीही शिव्या दिल्या तरी त्या लोकांची मानसिकता, जिद्द आणि चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे ह्यात शंकाच नाही.
दुसरा अनुभव दुसऱ्या दिवसाचा. आम्ही एका उंच पर्वताच्या आतमधून पडणाऱ्या एका रौद्र प्रपाताला बघायला गेलो. ती एक घळ होती आणि तिच्या आजूबाजूने उंचच उंच पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांच्या वेगवेळ्या उंचीवर तो प्रचंड धबधबा बघायला जागा केलेल्या होत्या. त्या धबधब्याचा आवाजही मनात धडकी भरवत होता. आपल्याकडच्या पूर्वीच्या जुन्या वाड्यामध्ये कशा वरच्या मजल्यावर जायला उंच पायऱ्या असायच्या तशा त्या पायऱ्या होत्या. त्यात धबधब्याच्या पाण्यामुळे त्या थोड्या निसरड्याही होत्या. आम्हा तिघांमध्ये मी सगळ्यात मागे होते.
मी निवांतपणे पायऱ्या चढत असताना, एक पंचाहत्तरीच्या आजी, साधारण ऐंशी वर्षाचे आजोबा, त्यांचा ८-१० वर्षाचा नातू आणि १०-१२ वर्षांची नात, असं कुटूंब मला मागे टाकून पुढे गेलं ना. आजी आजोबांची ह्या वयातली चपळता पाहून मी मटकन खालीच बसले. त्यांना पाहून “लानत है तेरी जिंदगानीपर” असे विचार मनात यायला लागले!
नातवंडं आजी आजोबांना आणि आजी आजोबा नातवंडांना व्यवस्थित मार्गदर्शन करत होते की कठड्याजवळ जाऊ नका, जास्त खाली वाकून बघू नका वगैरे. पण कोणीही एकमेकांचे हात धरून पायऱ्या चढत नव्हतं. प्रत्येक जण मस्तपैकी धबधबा बघून हरखून जात होतं. त्या जोडप्याला बघून खरोखर जाणवलं कि ह्या वयात आरोग्य कसं टिकवून ठेवायचं ते इकडच्या जेष्ठ नागरिकांकडून शिकावं. इथले जेष्ठ नागरिक सायकल चालवणे, हायकिंग करणे, बोट चालवणे इत्यादी गोष्टी लीलया करतात.
असे अनुभव आले की जाणवतं “आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त ते, त्या चिंगऱ्या चिनी मुलांसारखं आणि त्या जर्मन आजी आजोबांसारखं जगता आलं पाहिजे!”
#माझी_म्युनिक_डायरी