गुरुवार, १३ मार्च, २०२५

चुकीला माफी नाही

मागच्या आठवड्यात इथे कार्निव्हलची सुट्टी होती आठ दिवस. सोमवारी शाळा सुरु झाल्या. आत्ता ही बातमी वाचली की एका विमानतळावर २१ मुलांना पोलिसांनी शाळेच्या परवानगीशिवाय सुट्टीवर फिरतांना पकडलं आणि त्यांच्या आईवडिलांना १००० युरोचा दंड ठोठावला. सगळी मुलं आईवडिलांसोबत होती. खरंतर अशा बातम्या इथे नवीन नाहीत. बऱ्याच भारतीय लोकांनाही असा दंड भरावा लागला आहे. 

जर्मनीत साधारणपणे प्रत्येक ऋतू बदलला आठ किंवा पंधरा दिवसांची सरकारी सुट्टी शाळांना असते आणि सरकारी सुट्टीला जोडून सुट्टी कधीच मिळत नाही कारण काय तर म्हणे “कायदा” आहे. जर तशी सुट्टी पाहिजे असे तर शाळेकडून रितसर परवानगी पत्र घेऊन फिरावं लागतं. ह्यावर सरकारने असं कारण दिलंय की शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मुलभूत हक्क आहे आणि पालकांनीही गोष्ट कसोशीने पाळलीच पाहिजे. 

सरकारी सुट्टीशिवाय तुमचं मूल घरी असेल तर एकतर ते आजारी असणार किंवा त्याने शाळेकडून एखाद्या कामासाठी परवानगी पत्र घेतलेलं असणार. असं काही नसेल तर मग अवघड असतं. कारण शाळा सुरु असताना एखादं लेकरू उंडारत असेल तर पोलिसांना त्याला जाब विचारायचा अधिकार आहे. 

आम्ही म्युनिकला आलो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती. मी आपलं मनात गणित करून ठेवलं होतं की नाताळच्या सुट्टीला जोडून १५ दिवस सुट्टी घ्यायची आणि भारतात जाऊन यायचं. मला वाटलं पुण्यातल्या सारखं शाळेत रजेचा अर्ज दिला की झालं. मी मुलाच्या हातून अर्ज पाठवला आणि त्याच्या बाईंनी मला सरळ भेटायलाच बोलावलं! मी बुचकळ्यात पडले की रजेचा अर्जच तर दिला त्यात भेटायचं कशाला? मी काय पाप केलं! 

बाईंना भेटले तर त्यांनी मला नियमपत्रिका दाखवून समजावलं की कायद्यानुसार तुम्हाला सुट्टीला जोडून सुट्टी मिळणार नाही. तरी मी यंटमसारखं त्यांच्या मागेच लागले पण बाई कट्टर जर्मन आहेत आणि जर्मन लोकांइतके नियम पाळणारे लोक जगात नाहीयेत ह्याचा मला प्रत्यय आला आणि मी तो विचार तेव्हा सोडला. 

पण असा यंटमपण करायची लहर मला अधूनमधून येतच असते. ह्यावर्षी मुलाची दहावी झालीये तर मला वाटलं नियम जरा शिथील झाला असेल म्हणून मी पुन्हा त्याच्या गुरुजींच्या मागे लागले की त्याला नाताळच्या सुट्टीला जोडून सुट्टी द्या म्हणून. माझ्या सततच्या इमेल्सला वैतागून गुरुजींनी हात टेकले आणि ते मुलाला म्हणाले ”तुझ्या आईला समजव बाळा, मी थकलो आता! त्यांना सरकारी नियम दाखवला तरी त्या ऐकत नाहीत! त्यांना सांग तुम्हाला १००० युरो भरायचे असतील तर खुशाल सुट्टी टाका!”

मग काय लेकानेही घरी येऊन शाळा घेतली माझी आणि ठणकावून सांगितलं की चुकीला माफी नाही बरं आई!! म्हणलं हे बरंय गुरुची विद्या गुरुलाच. 

तरी बरं आमच्यावेळी असा काही नियम नव्हता, नाहीतर  आईवडिलांनी शाळेत घालायच्या ऐवजी दिलं असतं शेतात पाठवून, गुरं वळायला! हाय काय अन नाय काय. 



#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही