गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

गोडमट्टक

इथे थंडी पडायला लागली आणि क्रिसमस जवळ आला की ठिकठिकाणी भाजलेल्या सुकामेव्याच्या टपऱ्या लागायला लागतात. त्यातल्या त्यात भाजके बदाम जास्त असतात. 

आम्ही म्युनिकमध्ये आल्यानंतरच्या पहिल्या क्रिसमसच्या आधी फिरायला निघालो होतो. तेव्हा माझा उत्साह हाडं गोठवणाऱ्या थंडीतही वाखाणण्याजोगा होता (हे वाक्य लिहिल्यावर माझाच स्वतःवरच विश्वास बसत नाहीये)! 

तर, अश्या उत्साहात मी फिरत होते आणि माझ्या नजरेस ही बदामाची टपरी पडली. ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात मी टपरीजवळ गेले आणि अर्थातच आत असलेल्या जर्मन आज्जींनी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं. माझ्या उत्साहाची दाणादाण उडवत आज्जींनी प्रश्न विचारला की काय पाहिजे? मी आवाजात ओढूनताणून उत्साह  आणत समोर दिसणारे बदाम पाहिजे असं सांगितलं. 

आज्जींनी मस्तपैकी एका कागदी पुड्यात गरम गरम बदाम दिले. मला एकदम आपल्याकडे हातगाडीवर मिळणारे चणेफुटाणे आठवले. पटकन पैसे देऊन मी एक बदाम तोंडात टाकला आणि हाय रे कर्मा तो बदाम गोडमट्टक होता. मी भस्सकन त्या आज्जींना म्हणाले “अहो हे बदाम तर गोड आहेत”! जर्मन आज्जींनी मी परग्रहवासी असल्यासारखा माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या. 

भाजलेले बदाम म्हणजे आपल्याकडे हातगाडीवर मिळणाऱ्या खाऱ्या शेंगदाण्यांसारखेच असणार, हेच डोक्यात ठेऊन बदाम घेतले! बरं पाट्या वाचणे किंवा पुड्यांवरचे नावं वाचणे वगैरे माझ्या  खिजगणणतीतही नव्हतं. पुण्यात राहत असतानाची सवय अन दुसरं काय! त्या टपरीवरच्या पाटीवर शुद्ध जर्मनीमध्ये लिहिलेलं होतं की शर्करावगुंठीत भाजलेले बदाम मिळतील म्हणून. इथल्या लोकांना खूपच आवडतात म्हणे. 

मग काय, पूर्ण क्रिसमस मार्केट फिरत मी एकटीच ते गोडमट्टक बदाम कसेबसे संपवायचा प्रयत्न करत होते. बदाम गोड आहेत म्हणल्याम्हणल्या ज्युनिअर आणि सिनिअर पुराणिकांनी त्यांच्याकडे आणि माझ्याकडेही सपशेल दुर्लक्ष केलं!

अगदी हीच गत पॉपकॉर्न खरेदीला झाली होती पहील्यांदा. पॉपकॉर्नच्या पुड्यावरचं ”गोड पॉपकॉर्न” असं वाचण्याची तसदीही न घेता मी पन्नास सेंटला मोठ्ठा पुडा मिळतोय ह्या आनंदात तो उचलला. घरी येऊन उत्साहात पुडा फोडून पॉपकॉर्न तोंडात टाकला आणि गोडमट्टक पॉपकॉर्न खाऊन वाचाच बसली माझी! पॉपकॉर्न गोड असूच शकत नाही, ह्या जन्मभर बाळगलेल्या गोड गैरसमजाचा गोड पॉपकॉर्नने घात केला. वर, मुलाने शाळा घेतली ती वेगळीच, “आई त्या पुड्यावर स्पष्ट लिहिलंय गोड पोपोकॉर्न म्हणून, तू न वाचताच घेऊन आलीस!“ 

एकदा तर लाल सिमला मिरची घातलेलं आईस्क्रीम बघितलं तेव्हापासून इथले खाण्याचे पदार्थ घेण्याची भीतीच बसलीये. न जाणो गोड वेफर्स बनवले ह्या लोकांनी तर!!


#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही