सोमवार, ११ मार्च, २०२४

आम्ही, सुजाण(?) नागरिक आणि पोलिसमामा

तर त्याचं झालं असं की काल आम्ही आमच्या एका सुहृदांसोबत म्युनिकजवळील एका छोट्या गावात त्यांनी घेतलेलं घर बघायला गेलो होतो. 

घराचं बांधकाम आता शेवटच्या टप्प्यात आलंय. रविवार असल्यामुळे कोणी कामगारही काम करत नसतील म्हणून आम्ही दोन्ही कुटुंब निवांत दुपारी तिथे पोहोचलो. आमचे सुहृद अगदी आनंदाने एक एक खोली दाखवत होते. कुठे काय असेल, फर्निचर कसं करणार, कोणती खोली कशी सजवणार हे सगळं सांगत असताना त्या पती पत्नीचा उत्साह ओसंडून वाहत होता. 

आम्ही चौघे निवांत घराविषयी चर्चा करण्यात व्यग्र होतो पण आमची चर्चा संपतच नाहीये हे बघून, आमचे दोन टिनेजर्स आणि छोटी, चर्चेला कंटाळून घराबाहेर जाऊन उभे राहिले. 

आम्ही अगदी जोरदार चर्चा करत होतो,  स्वयंपाकघरात काय कुठे ठेवलं तर किती जागा अडेल वगैरे. तर मैत्रीण म्हणाली की मी टेप आणली आहे आपण माप घेऊन बघूया. मैत्रिणीच्या ह्यांनी स्वयंपाकघराचं माप घ्यायला सुरुवात केली तेवढयात माझं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं तर मला पोलिसांची गाडी दिसली. मनात म्हणलं एवढ्या शांत भागात पोलीस कशाला आले असतील बरं? मी मनातला विचार झटकून पुन्हा चर्चेत सहभागी झाले. 

आणि बाहेरून आवाज यायला लागले “हॅलो, कोणी आहे का घरात?“ अर्थात ते जर्मनमध्ये बोलत होते. आवाज ऐकून आम्ही सगळेच चपापलो आणि दारात येऊन बघतो तर काय, दोन धिप्पाड पोलीस! आम्ही सगळे बुचकळ्यात पडलो ना! 

त्या दोघांनी प्रश्नाच्या फैरी झाडायला सुरुवात केली, तेही जर्मनमध्ये. पोलीस, त्यातल्या त्यात अत्यंत धिप्पाड पोलीस, अन वरून फाडफाड जर्मनमध्ये प्रश्नावर प्रश्न विचारत होते. आमची जरा तंतरलीच. तरीही त्यांच्या बोलण्यातला एक प्रश्न कसाबसा कळला आणि तो ऐकून हसावं की रडावं तेच कळेना, म्हणे “ही घरफोडी आहे का?“ अरे भावा, तू कधी खरंच एखादा चोर चोरी करत असेल तर त्याला जाऊन असं विचारशील का?

बरं ते जाऊदे, आम्ही कुठल्या अंगाने अट्टल चोर दिसतोय जे सहकुटुंब हसत हसत, जोरदार चर्चा करत स्वतःच्या घरात घरफोडी करतोय! 

मग मला पोलिसच्या गाडीचा उलगडा झाला. पोलीस चक्क आमची चौकशी करायला आले होते! कोणत्या तरी  सुजाण(?) नागरिकाने म्हणे त्यांना फोन करून कळवलं होतं की इथे कोणीतरी घरफोडी करत आहे आणि म्हणून ते तत्परतेने आले होते. आमच्या सुहृदांनी त्यांना व्यवस्थित समजावलं की हे त्यांचंच घर आहे, त्याचा पुरावाही दिला. ते बघून त्यांनाही हसू आलं आणि ते आल्या पावली निघून गेले. 

बरं नेमकं झालं असं की लोकांच्या शंकेलाही वाव होता की २ पोरसवदा तरुण बाहेर उभे आहेत लक्ष द्यायला आणि घरात २-४ लोक काहीतरी उद्योग करत आहेत. पण म्हणून तीन गाड्या आणायच्या? बहुत नाइन्साफी है. हो, तीन गाड्या आल्या होत्या पोलिसांच्या! धन्य ते सुजाण नागरीक आणि धन्य ते पोलीस. 

आम्ही बाहेर येऊन बघितलं तर “तो” सुजाण सायकलस्वार लांब उभा राहून आमच्याकडे संशयित कटाक्ष टाकत होता. आम्हाला वाटलं त्या बेण्याला “अबे रुक” म्हणून तिथंच धरावं आणि बुकलून काढावं! पोलिसांना बोलवतो म्हणजे काय रे हं! 

नंतर हसून हसून आम्हा सगळ्यांची पुरेवाट झाली कारण पोलिसांनी बाहेर पोरांचीही चौकशी केली होतो, त्यांना त्यांचे आयकार्ड्स दाखवायला लावले. विजा दाखवा म्हणाले तर मुलं म्हणाले की आमचे आईवडील आत आहेत त्यांच्याकडे आमचे विजा आहेत. आम्ही काय विजा सोबत घेऊन फिरतो का काय पोलिसमामा?

एकंदर काय तर आम्ही स्वतःच्याच घरात घरफोडी करतोय ह्या आरोपातून आमची निर्दोष सुटका झाली! 


#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही