रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

हिप्पी दादा

त्या दिवशी जुन्या घराजवळच्या फर्निशिंगच्या दुकानात सेल आहे असा मेसेज आला. म्हणलं चला चक्कर टाकून येऊ. यदाकदाचित मॅगी काकू भेटल्या तर तेवढंच बरं वाटेल जरा. 

मी गेले तर बिलिंग ताई सोडल्या तर दुकानात कोणीच दिसलं नाही. त्या दुकानात रांगेने बेड्स मांडलेले असतात आणि त्यावर वेगवेगळ्या किमतीच्या मॅट्रेसेस आणि उश्या ठेवलेल्या असतात. जेणेकरून लोकांना जर मॅट्रेस आणि उशी तपासून घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. त्याबाबतीत मला गंमतच वाटते खरंतर. लोक चक्क त्या बेडवर झोपून बघतात! 

मी आपली नक्की कोणत्या गोष्टींवर किती टक्के सूट आहे ते बघत होते. उश्यांवरही भरगच्च सूट आहे असं लिहिलं होतं म्हणून मी उशी हातात घेऊन बघत होते. तर बिलिंग ताई आल्या आणि म्हणाल्या “उशीवर डोकं ठेवून झोपून पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल उशी कशी आहे ते." 

आता दुकानात ती उशी कशी आहे ते बघायला त्यावर डोकं ठेवून बघायचं ही कल्पनाच करवत नव्हती मला. म्हणजे बघा हं भारतात आपण कधी गादीवाल्यांकडे जाऊन असं काही म्हणलं तर!! नकोच तो विचार. मी आपली संकोचून त्या ताईंना ”नाही ठीक आहे. मी अशीच बघते उशी." तर ताई लगे आग्रह करू लागल्या की “असं कसं, झोपून बघाच तुम्ही" मी “अहो नाही!” बिलिंग ताई “अहो बघा एकदा!”

आता इतका आग्रह त्या करत आहेत म्हणल्यावर आपल्याला बरं वाटत नाही ना कोणाचं मन मोडायला. म्हणून मग मी दुकानात नक्की कोणी नाहीये ना ह्याची खात्री करून घेतली आणि शूज काढायला लागले, तर लांबून ताई चित्कारल्या “काही गरज नाहीये शूज काढायची, झोपा तश्याच!“ पण एव्हाना मी शूज काढले होते. त्या बेडवर बसले आणि मी त्या उशीवर डोकं ठेवून बघणार तितक्यात एका कोपऱ्यातून आवाज आला 

“अहो इतका काय संकोच करताय, बघा झोपून! आपलंच दुकान समजा!”

मी पटकन उठून आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि मनात म्हणलं “ अरे ये कौन बोला." एक हिप्पी दिसणारा दादा कोपऱ्यातल्या बेडवर निवांत लोळत होता. तो तिथून उठून आला आणि म्हणाला  “अहो झोपा हो काही नाही होत." 

दोन्ही हातात दोन तीन फ्रेंडशिप बँड्स, केसांचा बुचडा बांधलेला, गळ्यात तुळशीमाळेसारखी माळ, डोळ्यावर गॉगल, हातावर, पायावर जिथे तिथे गोंदलेलं (टॅटू हो!), फिक्क्या निळ्या रंगाची बर्म्युडा आणि वर नावाला अघळपघळ बनियन!! ब्रिटिश इंग्रजीत त्याने मला विचारलं ”तुम्ही भारतीय ना? तुमच्या कपाळावरच्या रेड डॉटमुळे मी ओळखलं तुम्हाला!“ मी “हो”. 

हिप्पी दादाने त्यानंतर प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली की विचारायलाच नको. इथे कश्या? काय करता? म्युनिक आवडतं का? घरदार, मूलबाळ इत्यादी इत्यादी. मनात म्हणलं आता काय घरी जेवायला येतो का काय भाऊ? त्याची सरबत्ती सुरु असतानाच मी एक दोन उश्या चांगल्या वाटल्या म्हणून बघत होते. पण दादाचं थांबायचं नाव नाही. 

तो कसा भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरला आहे त्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात त्याने केलीच होती तर त्याची मैत्रीण (गर्लफ्रेंड हो!) दुकानात शिरली. मला वाटलं आता दादाचा तोंडाचा पट्टा नक्कीच बंद होईल. मैत्रीण का “डर” अन दुसरं काय! पण कसचं काय, दादा बोलतच होता. 

मी घेतलेल्या उश्या घेऊन बिलिंग ताईकडे गेले तर दादाही तिथे हजर. तो बोलतोय, त्याची मैत्रीण त्याचं अघळपघळ बनियन नीट करतेय, मी बिलिंग ताईंशी उश्यांवर किती सूट मिळेल ते विचारतेय, बिलिंग ताई माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत आहेत पण दादाची तोंडाची टकळी चालूच! दादा माझ्याशी बोलतोय, मधेच त्याच्या मैत्रिणीशी बोलतोय, त्यात तो मधेच बिलिंग ताईंना काहीतरी विचारतोय!! बिलिंग ताईच्या चेहऱ्यावरचे भाव “अरे ये हो क्या रहा है दुर्योधन!“ (संदर्भ: जाने भी दो यारो).

ह्या गोंधळात त्याची मैत्रीण मात्र त्याचं बनियन इमानेइतबारे सावरत होती आणि तो नक्की कोणाशी आणि काय बोलतोय ह्याचा अंदाज घेत होती. तिचं इंग्रजी कच्चं होतं हो! हिप्पी दादा त्याच्या बनियनसारखाच अघळपघळ होता अगदी. 

इतक्या गोंधळात, इतक्या स्थितप्रज्ञतेने बिल करणाऱ्या जर्मन ताईंना बघून घाबरले ना मी! बिल गंडणार नक्कीच. जर्मन बिलिंगवाल्यांचा दांडगा अनुभव आहे इतक्या वर्षांचा!! 

दादा म्हणाला भेटू पुन्हा असच आणि मी उश्या आणि बिल घेऊन दुकानाबाहेर आले एकदाची. एकदा बिल बघून घेऊ म्हणलं. बिल बघितलं तर ताईंनी एका उशीवर सूट दिली होती पण दुसऱ्या उशीवर सूट द्यायला त्या विसरल्या होत्या. आपली शंका खरी ठरल्याबद्दल हसावं की रडावं तेच कळेना कारण मला पुन्हा दुकानात जावं लागणार होतं. 

मी आत गेले आणि ताईंना ही गोष्ट लक्षात आणून दिली तर बिचाऱ्या ताईंनी माझी इतक्या वेळा माफी मागितली की मला वाटलं आता काय पाया बिया पडतात का काय!! “आता मी तुमचं नवीन बिल बनवते आणि तुमचे जास्तीचे पैसे तुम्हाला परत करते हं. माफ करा जरा गोंधळच झाला माझा!” असं म्हणून ताईने पून्हा बिल बनवायला घेतलं. 

तेवढ्यात कोपऱ्यातल्या बेडवर झोपलेला हिप्पी दादा मला बघून मैत्रिणीसह तिथे आला आणि त्याने पुन्हा तोंडाची टकळी चालू केली. मी आणि बिलिंग ताईने एकमेकींकडे बघून मनातच कपाळावर हात मारून घेतला!!

#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही