शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

आग्रह

आज काही कामानिमित्त शहरापासुन थोडं लांब जावं लागलं. तिथलं काम आटपुन परत जवळच्या बस थांब्यावर आले. शेवटचा बस थांबा असल्यामुळे बस उभीच होती. आत जाऊन बसले तर चिटपाखरू नव्हतं, ना बस मध्ये ना बाहेर!

मला वाटलं चालक दादा गेले सुट्टा मारायला. पण नाही.. दादा बस पुसत होते. बस निघायला साधारण ५-७ मिनिट बाकी होते, तेवढ्यात चालक दादांनी पटापट बस पुसली, आत येऊन झाडुन काढायला लागले. 

मी बसले होते तिथे येऊन म्हणाले “जरा पाय बाजुला घेता का? मी स्वच्छ करून घेतो.” मी म्हणलं माफ करा मी बाहेर जाते. तर म्हणाले “नाही हो बसा. फार काही कचरा नाहीये पण मी आपला स्वच्छ करत असतो ह्या थांब्यावर. जरा वेळ मिळतो!“ मला अश्या लोकांचं फार कौतुक वाटतं! 

तेवढ्यात एक सत्तरीतल्या काकु बसमध्ये चढल्या. रोजची ठरलेली बस असावी बहुदा त्यांची कारण चालक दादा आणि त्यांनी एकमेकांना नमस्कार वगैरे केला! इथे नमस्कार करत नाहीत पण तत्समच काहीतरी म्हणतात एकमेकांना. 

चालक दादाची झाडझुड झाली आणि ते काकुंना म्हणाले “आज पण मास्क घरीच विसरल्या वाटतं?” त्या कसनुसं हसत हो म्हणाल्या. दादानी पटकन केबिनमधुन मास्कचा बॉक्स आणला आणि एक मास्क काकुंना दिला. 

नंतर माझ्याजवळ बॉक्स आणुन म्हणाले “घ्या एक मास्क!” मी सर्जिकल मास्क लावला होता म्हणुन म्हणाले “नको, मी लावलाय कि मास्क!“

तर, दादा “अहो घ्या हो. काही होत नाही!”

मी “अहो पण दादा आहे कि मास्क मी लावलेला अजुन कशाला?”

दादा “अहो, हा N95 आहे. तुम्ही लावलाय तसा नाहीये. घ्या!”

मी मनातच “अरेच्या! बसमध्ये इन मिन तीन माणसं, त्यात कोरोना आहे कि नाही अशी शंका यावी, असं वातावरण! जर्मन सरकारने बस आणि मेट्रोमध्ये मास्कसक्ती लागु केलेली असली तरी मास्कचा आग्रह? तेही एक मास्क लावलेला असताना? भैय्या आप ठीक तो हो ना? मास्कचा आग्रह कुणी करतं का दादा?“

मागे ऑगस्टमध्ये छ. संभाजीनगरमध्ये जेव्हा पार सराफा, पानदरिब्यापासून ते गुलमंडी, औरंगपूरा ते समर्थनगर पर्यंत मी मास्क लावुन फिरत होते तेव्हा लोक माझ्याकडे मी परग्रहवासी असल्यासारखं बघत होते आणि इथे हा दादा मला मास्कचा आग्रह करतोय! डोळेच भरून आले हो. असो. 

तर, दादाने फारच आग्रह केल्यामुळे शेवटी घेतला एक मास्क मी!इतका आग्रह केल्यावर त्याच्या आग्रहाला मान द्यायला नको का? आधीच म्युनिकमध्ये कोणी कशाचा आग्रह करत नाही. दादा एवढा मास्कचा आग्रह करतोच आहे तर घ्यावा म्हणलं एक मास्क मा बा का जा?

मास्क बघितला तर बदकतोंड्या होता! मी पटकन म्हणाले अरे हा तर बदकतोंड्या मास्क.. अजितदादा वापरतात कि... अगदी तस्साच! पण दादाला मराठी कळत नसल्यामुळे ते काही न बोलता बस चालवायला निघुन गेले! 

आता अजितदादा कोण ते विचारू नका, आपलं लिखाण #अराजकीय असतंय बरं का! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


#माझी_म्युनिक_डायरी

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

कोंबडा

आज जी बातमी वाचली ती वाचुन बरेच लोक चक्रावुन जाऊ शकतात पण मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. कारण मी सात वर्ष मॅगी काकुंच्या शेजारी राहिलेली आहे!

तर बातमी अशी आहे कि एका बाईच्या तक्रारीमुळे, एका कोंबड्याला, कोर्टाच्या आदेशावरून साउंडप्रुफ (मराठीत ध्वनिरोधक) खोलीत कोंडणार आहेत म्हणे. 

रिपोर्ट असं सांगुन राह्यला म्हणे कि त्या काकु शांतता लाभावी म्हणुन खेडेगावात रहायला गेलत्या, पन त्यांच्या घरापासुन फकस्त २० मीटर अंतरावर ह्यो कोंबडा ठिवला होता म्हणे आणि त्याच्या आरवण्यापायी ह्यांची झोपमोड होऊन राह्यली होती म्हणे. मग  काकुंनी तो कोंबडा कोणकोणत्या येळाना आरवतो ते लिहुन ठिवलं होतं म्हणे! त्याच्या संध्याकाळपासूनच्या आरवण्याचा काकुंना लै त्रास झाला म्हणे. तर ह्या कोंबड्यापायी त्यांची मनःशांती ढळली म्हणे. आन मग त्यांनी त्या कोंबड्याला आणि त्याच्या मालकाला कोर्टात खेचलं म्हणे. आन तिथं लिहून ठिवलेल्या कोंबड्याच्या अरवण्याच्या येळा दाखिवल्या म्हणे. आन काकु कोर्टात केस जिंकल्या म्हणे. आन म्हनुन त्या कोंबड्याला बिचाऱ्याला कोंडुन ठिवणार हायेत म्हणे! 

आता कसं हुईल त्या कोंबड्याचं? माझ्या तर जिवाला लईच घोर लागुन राह्यला हाय! तरी बरं आपल्याकडं म्हणुन ठिवलं आहे की कोंबडं झाकलं तरी उजाडायचं रहात नाही, न्हायतर लईच पंचाईत झाली असती त्या लोकायची. 

आता हितं कुनी म्हनुन कुन्नी केकाटणार न्हाय कि हा कोंबड्यावर लैच अन्याय होतो हाय म्हनुन! ना ते प्राणीप्रेमी पेटा, ना थनबर्गची ग्रेटा! काय लाईफ हाय का नाय प्राण्यांचं म्हन्ते मी! विश्वास नसल तर, बातमीची लिंक कमेंटमध्ये लिवलीये, वाचा! 

हे जर्मन लोक त्यांच्या शांततेसाठी काय करतील ह्याचा नेम नाही! जे आहे ते असं आहे. त्या काकु नक्कीच मॅगी काकुंच्या नातेवाईक असाव्यात, अशी मला दाट शंका आहे!

असो आपल्याला काय! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही