तुम्ही मग गोगोसारखं म्हणालच मला “ये सापळा सापळा क्या है? सापळा सापळा!“ पण आता क्राईममास्टर गोगोचे दिवस नाही राहीले म्हणा! असो, आपण आपलं अराजकीयच लिहावं! उगं कश्याला घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं!
तर, विषय होता की सतत सापळा दिसत असेल तर काय? त्याचं काय आहे ना, आमच्या समोरच्या इमारतीतल्या ह्या खिडकीत हा जो सापळा आहे ना तो गेल्या हॅलोवीन पासून त्याच खिडकीत विराजमान आहे!
काय यंटमपणा आहे राव? खिडकीत काय तर म्हणे सापळा!
हॅलोवीनला तिथल्या लेकराने त्या सापळ्याला काहीतरी विचित्र कपडे घातले होते, मग क्रिसमसमध्ये त्याच्यापुढे फुलांचा गुच्छ आला! मी आपलं शून्याच्या खालच्या तापमानात त्या सापळ्याला ते लेकरू स्वेटर कधी घालतय त्याची वाट पाहत होते पण जानेवारीमध्ये सापळा बिचारा तसाच! नंतर फेब्रुवारीमध्ये कार्निव्हलमध्ये सापळ्याला टीशर्ट मिळाला थोडे दिवस आणि परवा गुड फ्रायडेला शर्ट होता चेक्सचा!
लेकाला म्हणाले बघ त्या मुलाचं किती प्रेम आहे त्या सापळ्यावर! तर आमचा नवटीनेजर मला म्हणाला “आई तु जास्त हॉरर आणि कॉमेडी स्टोरीज एकत्र वाचत जाऊ नकोस प्लिज, मग तू असंच बोलतेस!”
गुड फ्रायडेला ह्यांना म्हणाले “त्या सापळ्याचा चेक्सचा शर्ट छान आहे नाही का?” तर म्हणे “तुला खरंच विश्रांतीची गरज आहे, भारतात जाऊनच ये!“
पण एक मात्र अजूनही कळलं नाहीये की हा सापळा असा आमच्याकडेच तोंड करून, ह्याच खिडकीत, बारा महिने अठरा काळ का ठेवलाय? त्यात हे झाड हे असं, हिवाळ्यात सतत अंधार असायचा, पुन्हा मला धारपांच्या कादंबऱ्या आठवायच्या. तरी बरं रात्री तिथे कुठले लाईट इफेक्ट्स नसतात नाहीतर...हातभार फा&@ म्हणजे काय असते ते कळलं असतं! “जळी स्थळी काष्ठी पाषाणी” म्हणीचा अर्थ आता कळतोय, स्वप्नातही येऊन गेला!
एक मन वाटलं मॅगी काकुंच्या खिडकीतून असा सापळा दिसला असता तर त्यांनी काय केलं असतं? जाऊदे आपल्याला काय!
पण जर आता हा सापळा त्यांनी हलवला तर मला मात्र अजिबात करमणार नाही हे मात्र नक्की!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक