म्युनिक नावाच्या ह्या सुंदर शहरावर माझं अक्षरशः प्रेम बसलंय कारण मी बाहेर पडलेय आणि मला वेगळा काही अनुभव आला नाहीये असं क्वचितच घडतं आणि हे अनुभवही खूप काही शिकवून जातात!
आज खूप दिवसांनी मस्त सूर्यप्रकाश होता आणि थंडीही फार नव्हती त्यामुळे म्हणलं जरा घराबाहेर पडूच! तसंही इतके दिवस असलेली अतिथंडी आणि सततच्या लॉकडाऊनचा वैताग आलाच होता म्हणा.
तापमान दहाच्या वर गेलं आणि लख्ख सुर्यप्रकाश असला की इथल्या लोकांना त्यांची घरं ऊचलू ऊचलू फेकतात आणि मग ते कोरोनाच्या बापालाही जुमानत नाहीत. त्यामुळे अगदीच अपेक्षित असलेलं दृश्य बाहेर पडल्यावर दिसलं; प्रचंड प्रमाणात जनता आपापल्या मित्रमैत्रिणी आणि लेकराबाळांसह नदीकाठी, बागेत इत्यादी ठिकाणी फिरत होती! आम्हीही मास्क लावुन नदीकिनारी चक्कर टाकायला गेलो.
आज मस्त “जाडोंकी नर्म धूप” होती आणि तीच धूप खात आम्ही गर्दी टाळून पुलावर ऊभे होतो तेव्हढ्यात खालच्या लोकांनी “ओह" असा मोठ्ठा आवाज केला म्हणुन आम्ही सगळे लोक ज्या दिशेला पाहत होते तिकडे पाहिलं तर एक दादा नदीपात्रातल्या छोट्या बेटावर पडला होता बहुतेक!
तो वरून, कसा पडला हे कळायला काही मार्ग नव्हता पण त्याच्या पायाला जोरदार लागलं होतं हे नक्की कारण बिचारा एकाच पायावर उभा होता. आता लागलं आहे तर खाली बसावं ना त्याने पण नाही; महाशयांनी चैतन्यकांडी शिलगावली, आम्ही थक्क!
तोवर त्याच्या मित्राने इमर्जंसीला फोन केला आणि पुढच्या पाच मिनिटात सायरनच्या आवाजात पाच सहा अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे दाखल झाल्या. आता त्या दादाला पाय दुखावल्यामुळे काही सुचत नसावं बहुतेक कारण तो तिथेच आडवा झाला होता.
आता अग्निशामक दलाचे लोक त्या जागेचा अंदाज घेत होते आणि डॉक्टरला त्या दादापर्यंत कसं पोहोचवता येईल ते बघत होते कारण ती जागा नदीपात्रात असल्यामुळे त्यांना थोडं अवघड जात होतं. शिडी आणुन पटापट ५-६ लोक दादाजवळ पोहोचले आणि आमच्यासहित सगळ्या लोकांचा टांगणीला लागलेला जीव थोडा खाली आला.
तोवर पोलीस आणि ऍम्ब्युलन्स पण पुलावर पोहोचले होते. आता उत्सुकता होती की हे लोक त्या अवघड जागेवरून त्या दादाला वर कसं घेणार त्याची. पण पोलिसमामानी, पुलावर उभ्या असलेल्या आमच्यासारख्या लोकांना तिथुन पिटाळायला सुरुवात केली कारण एक मोठी क्रेन असलेली गाडी त्यांना तिथे लावायची होती.
मग काय, मी पळत पळत खाली नदीकिनारी पोहोचले सुद्धा; दादाचं रेस्क्यु ऑपरेशन पुर्ण बघायचं होतं ना! मी पाहिलं तेव्हा डॉक्टर दादावर प्रथमोपचार करत होते. एकजण सलाईन धरून होता, दुसरी त्याच्या पायावर उपचार करत होती, अजून बाकीचे दोघे तिला मदत करत होते आणि अजून दोघे तिघे दादासाठी स्ट्रेचर तयार करत होते.
तेवढ्यात आकाशात घरघर ऐकु आली; मला वाटलं ह्यांनी काय एअर ऍम्ब्युलन्स बोलावली की काय! पण नाही, ते छोटं विमान होतं!
दादाला स्टेबल केल्यावर सगळ्यांनी अत्यंत हुशारीने त्याला स्ट्रेचरवर ठेवलं तोपर्यंत क्रेनवाले काका क्रेन घेऊन वर उभेच होते. मग त्या लोकांनी क्रेनला लावलेली दोरी दादाच्या स्ट्रेचरला जोडली. त्यानंतर अगदी शांतपणे आणि सूत्रबद्ध पद्धतीने क्रेनची दोरी हळुहळू वर जायला लागली!
हे सगळं चालु असताना एकजण तिथे उपचारादरम्यान झालेला कचरा गोळा करत होता; मी तर हातच जोडले त्यावेळी! हे सगळं शिस्तबद्धपणे चाललेलं काम, आम्ही आणि नदीकिनाऱ्यावर असलेले लोक डोळ्याची पापणीही न लवता पाहत होतो. शेवटी एकदम शांतपणे दादाची स्ट्रेचर पुलाच्या कठड्याजवळ पोहोचली आणि वर असलेल्या अग्निशामक दलाच्या लोकांच्या हातात तो पोहोचताच, आम्ही आणि बाकीचे सगळे जे प्राण कंठाशी आणुन हे सगळं बघत होतो, त्या सगळ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह शिट्टया वाजवायला सुरुवात केली!
तर, ह्या सगळ्या गदारोळात पुलावर नक्की दहा गाड्या आलेल्या होत्या, २ पोलिसगाड्या, ६ अग्निशामक दलाच्या आणि २ अजुन कुठल्या तरी. ह्या रेस्क्यु ऑपरेशनसाठी त्यांनी वाहतुक अडवुन ठेवलेली होती तरीही लोक कोणत्याही प्रकारचा आततायीपणा म्हणजेच सतत हॉर्न वाजवणे वगैरे न करता गाड्या घेऊन ऊभे होते!
दादाला घेऊन ऍम्ब्युलन्स निघुन गेल्यावर, पुढच्या पाचच मिनिटात पुलावरची वाहतुक सुरळीत झाली आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक