सध्या कोरोनाकृपेकरून चिरंजिवांची शाळा ऑनलाईन असल्यामुळे, शाळेतून चक्क वेगवेगळे पदार्थ करायला सामान पाठवत आहेत! जेवणाचे पैसे परत न करता त्यांनी हा पर्याय शोधलाय. भाज्या, फळे, तांदुळ, पास्ता, दही, बटर इत्यादी गोष्टी असतात.
दर आठवड्यात करायच्या युरोपिअन आणि जर्मन पदार्थांची कृती शाळेच्या पोर्टलवर असते आणि त्यासाठी लागणारी एक ना एक जिन्नस शाळेच्याच ट्रान्सपोर्टने प्रत्यके विद्यार्थ्याच्या घरी पोहोचती केली जाते! सगळे बसचालक जेष्ठ नागरीक आहेत. काल जे काका हे सामान घेऊन आले होते त्यांना पाहुन तर वाटलं की नक्की पंचाहत्तरीचे असतील.
खरंतर ही संकल्पना फार आवडलीये आम्हाला कारण शाळेच्या ट्रान्सपोर्ट स्टाफला पण काम मिळतंय आणि कुकींग स्टाफला पण! आपल्यामुळे ह्या भयंकर #कोरोना परिस्थितीत कोणाला तरी थोडीशी का होईना मदत होतेय याचा आनंद वाटतोय!
असे काही एक एक युरोपिअन पदार्थ आणि कृती असते की ज्यांची नावं सुद्धा आपण जन्मात ऐकलेली नसतात, तर ते पदार्थ करण्याचा आणि खाण्याचा प्रश्नच येत नाही! त्यामुळे जे काही सामान येतं त्यात मी भारतीयच पदार्थ करते बऱ्याचदा. पण कृती वाचुन जर वाटलं की हा पदार्थ आपण आणि घरातले खाऊ शकतो तरच तो युरोपिअन पदार्थ करते. पास्ता आता छानच जमायला लागलाय!
तशी कृती फार अवघड नसते पण आपल्याला एखाद्या पदार्थाची चव आधी माहितीच नसेल तर आपण उगीच संभ्रमात असतो. त्यात ईथल्या बऱ्याच पदार्थांमध्ये दूध आणि मीठ एकत्र वापरायला सांगतात जे मला अजिबातच पटत नाही. असो.
एकदा तर कोको पावडर मिश्रित रवा आला होता आणि म्हणे पॉरिज करा ह्याची. त्या रव्याची चॉकलेट खीर भन्नाट झाली होती. एकदा इतक्या मोठ्या मोठ्या सिमला मिरच्या आल्या होत्या की आठवडाभर रोज त्याचं काही ना काही करत होते.
भाज्या तर इतक्या मोठ्या असतात की संपता संपत नाहीत. अक्षरशः एका मोठ्या बटाट्याची भाजी आम्ही तिघे सकाळ संध्याकाळच्या जेवणात खाऊनही संपत नाही. मग काय उचलली भाजी आणि घातली थालीपिठात! हाय काय अन नाय काय! भाज्या संपवण्याचा एकमेव मार्ग!
कालच्या सामानात भलं मोठ्ठ बीट आलं होतं! एवढ्या मोठ्या बीटाची कोशिंबीर मला एकटीलाच आठवडाभर खावी लागली असती म्हणुन केला त्याचा हलवा. काही पदार्थ दिसायलाच इतके आकर्षक असतात की पटकन एक घास तोंडात टाकावा वाटतो, हा हलवा अगदी तसाच झालाय.
दुसरं म्हणजे दोन मोठ्ठे लीक, २ भलेमोठे बटाटे सुद्धा आले आहेत! त्यातल्या फक्त अर्धा बटाटा आणि चतकोर लिकचं सुप आम्हाला पुरलं! लीक नामक भाजी ईथे आल्यावरच पाहिली! कांद्याच्या पातीचा फार मोठ्ठा भाऊ म्हणजे लीक, पण चव पातीएवढी उग्र नसते. सूप चांगलं झालं होतं.
असे एक एक पदार्थ केले की एकमन वाटतं की जरा चव म्हणुन मॅगी काकुंना देऊनच यावा एखादा पदार्थ, पण मग लगेच विचार येतो की उगीच हात दाखवुन अवलक्षण कशाला! नाही का! म्युनिकमध्ये आधीच घर मिळायची मारामार आहे, मी दिलेला पदार्थ खाऊन काकुंनी घरच सोडायला लावलं तर कुठे जाणार!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक