रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

त्यांचं सध्या काय चालु आहे?

मागे एकदा म्युनिक मधल्या भारतीय ब्युटी पार्लर मध्ये गेले होते. म्युनिक मधलं भारतीय ब्युटी पार्लर असल्यामुळे तिथे समस्त भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधल्या लेडीज बायका भेटतात. तेलगू, तमिळ, बंगाली, पंजाबी, हिंदी, गुजराती अश्या अनेक भाषा बोलणाऱ्या भरपूर जणी त्या निमित्ताने ओळखीच्या झाल्या आहेत. तसं आपल्याला सगळे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय सारखेच वाटतात. कारण आपण पडलो महाराष्ट्रीयन. त्यांना बिचाऱ्यांना मी नक्की कोणत्या राज्यातली आहे हे कळत नसावं बहुतेक कारण माझ्या रंगावरून उत्तर भारतीय बायका मला दक्षिण भारतीय समजतात आणि जिथे तिथे हिंदी बोलल्यामुळे दक्षिण भारतीय बायका मला उत्तर भारतीय समजतात.  

तर दिवाळी जवळ आल्यामुळे पार्लर मध्ये लेडीज बायकांची गर्दी होती. पार्लरवाल्या ताई हिंदी भाषिक असल्यामुळे मी त्यांच्याशी हिंदीत बोलले आणि बाकी दोघी तिघी नक्की कोणत्या भाषेत बोलत होत्या ते त्यांच्या बोलण्यात "प्रभास" चा उल्लेख आल्यामुळे माझ्या टवकारलेल्या कानांनी माझ्या मेंदूला "तेलगू" अशी सूचना केल्यामुळे मला कळले. आता "प्रभास" कोण, कुठला हे जर आपल्या सारख्या लेडीज बायकांना माहित नसेल तर धुत्त अपनी जिंदगानी पे. तो बाहुबली सिनेमा काय बघितला आणि... 

तर विषय एकंदर मी, पार्लर आणि लेडीज बायका होता. आधी तिथे हिंदी भाषिक ताई त्यांचं काम करण्यात मग्न असाव्यात आणि ह्या तेलगू ताया त्यांच्या भाषेत गॉसिप करण्यात. पण माझी तिथे एंट्री होताच हिंदी भाषिक ताईंना जरा बरं वाटलं कारण त्यांच्या बरोबर गॉसिप करायला कोणीतरी आलं होतं. हा सगळं तेलगू, हिंदी किलबिलाट तिथे चालु असताना, अजून एका दक्षिण भारतीय भाषेवाल्या ताई तिथे अवतरल्या. त्यांची आणि माझी आधीपासून ओळख असल्यामुळे आम्ही इंग्रजी मध्ये बोलायला लागलो. त्यामुळे पुढे तिथे जो काही भाषिक जांगडगुत्ता चालू होता ह्याची तुम्ही नक्कीच कल्पना करु शकता. 

मी आपली मेरा नम्बर कब आयेगा? असा विचार मराठीत करत एकीकडे इंग्रजी आणि हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि अचानक तिथे तेलगू भाषिक तायांमध्ये "बिग बॉस" नामक एका भारतीय टीव्हीवर चालू असलेल्या शोचा विषय निघाला. ते ऐकून हिंदी, तेलगू आणि तमिळ ताया लगेच इंग्रजीमध्ये, चक्क एकमेकींशी बोलायला लागल्या. 

हा विवक्षित "बिग बॉस" नावाचा शो मराठी मध्ये पण असतो हे तुम्हाला कितीही माहित नाही असे वाटत असले तरी फेसबुकवर असल्यामुळे लोकांच्या त्याविषयीच्या रंजक पोस्ट वाचून, न बघताही त्याची खडानखडा माहिती तुम्हाला असते. त्यामुळे आता मीही अगदी मन लावुन समस्त भारतीय भाषिक लेडीज बायकांच्या इंग्रजी संवादाकडे लक्ष देत होते. प्रत्येकजण स्वतःच्या प्रातांतील "बिग बॉस" वषयी सांगत होती. 

एकंदर सूर असा होता कि तद्दन भिकार शो आहे, लोकं फालतू भांडत बसतात, सगळं स्क्रिप्टेड असतं, नुसता शो ऑफ असतो, प्रचंड लफडे असतात, हिचं त्याच्याशी, तिचं ह्याच्याशी, काहीजणी खूप अंगप्रदर्शन करतात वगैरे वगैरे. प्रत्येक जण आपापलं मत नोंदवत होती आणि हिंदी भाषिक ताई बऱ्याच वर्षांपासुन म्युनिकमध्ये असल्यामुळे म्हणाल्या की जर्मनीच्या टीव्ही वर पण असतंय बरं बिग बॉस आणि ते खूपच ओपन असतंय, त्यात तर लोक एकमेकांसमोर कपडेही बदलतात. इतका वेळ श्रोत्याची भूमिका घेतलेली मी तिच्या ह्या वाक्यावर म्हणाले की "That`s what people want to watch, right? They are providing you the content." 

तिथे एकच हश्या पिकला आणि सगळ्या एकदम शांतच झाल्या. भयाण शांतता पसरली. मी तिथून निघेपर्यंत एकीचाही पुन्हा आवाज नाही आला. प्रत्येकीच्या हातात फोन होता आणि त्या सगळ्या फेसबुकवर रमल्या. Which is different kind of Big Boss. मी आपलं निघताना सगळ्यांना शुभ दीपावली म्हटलं तर "कोण आहे हि बाई?" अश्या नजरेने सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी पटकन तिथून सटकले; न जाणो त्या सगळ्या मला बिग बॉसचा एखादा एपिसोड दाखवायच्या आणि माझाच गेम व्हायचा. 

मागे एकदा असच माझ्या मराठी मैत्रिणीने विचारलं होतं कि कोणती मराठी सिरीयल बघतेस आजकाल? तर मी बापुडवाणा चेहरा करत कोणतीच नाही म्हटल्यावर तिने जो कटाक्ष माझ्यावर टाकला ना तो मी कधीच नाही विसरणार आणि तिच्या धाकापायी मी परत एकदा युट्युबवर "एका लग्नाची दुसरी गोष्ट" सिरियलचं पारायण केलं होतं. सध्या कोणती मराठी सिरीयल बघतेय असं कोणी विचारलं तर आता माझं उत्तर तयार असतं. पण प्रचंड पिअर प्रेशर आहे हे!!
आता मला कळलं कि मला इथे जास्त मैत्रिणी का नाहीयेत ते. 

बरं ते जाऊद्या, सध्या बिग बॉस मध्ये काय चालु आहे?



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही