शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

किल्ली

तुम्ही कचरा टाकायला म्हणून २-३ छोट्या पिशव्या एका हातात घेता मग लक्षात येतं कि बाहेर थंडी आहे म्हणून त्या पिशव्या दाराच्या बाहेर ठेऊन पटकन जॅकेट अंगावर चढवता. मग लक्षात येतं कि घराची किल्लीच घेतली नाहीये म्हणून घरात जाऊन किल्ली आणेपर्यंत तुमच्या लक्षात येतं कि मॅगी काकू त्यांच्या घराचं दार उघडत आहेत म्हणून तुम्ही पटकन किल्ली जॅकेटच्या खिशात टाकून, कचऱ्याच्या पिशव्या कश्याबश्या उचलून तिथून चक्क पळ काढता.

कचरा डस्टबिन मध्ये टाकून आजूबाजूच्या झाडांवर फुललेली फुलं आणि नवीनच येऊ घातलेली कोवळी पानं बघत रमतगमत तुम्ही घराकडे निघता. ह्या रमण्यात आणि गमण्यात तुम्ही उगीचच जॅकेटच्या खिशात हात घालता आणि... तुमच्या पायाखालची जमीन सरकते. हाय रे कर्मा तुमच्या खिशात घराची किल्ली नसते. तुम्ही पटकन दुसरा खिसा चेक करता लेकिन किल्ली का कही नामोनिशान नहीं मिलता.

आता तुम्हाला जाणीव होते कि इथेच तर कचरा टाकायला जायचय असं म्हणून तुम्ही मोबाईल आणलेला नाहीये आणि कचरा टाकायला जाताना तशी पर्स घेऊन जायची पद्धत आपल्याकडे अजून तरी रूढ नाहीये त्यामुळे तुमच्याजवळ पर्स नसते आणि ओघानेच एकहि सेंट नसतो. त्यामुळे बाहेर जाऊन ह्यांना फोन करायचा प्रश्न निकालात निघतो. ह्यांचा विचार येताच त्याचा चष्मा डोळ्यांसमोर आय मिन चष्म्याच्या आतले मोठे डोळे दिसतात. आता काय? हा प्रश्न आ वासून तुमच्या समोर उभा असतो. मघाशी बघितलेल्या फुलपानात किल्ल्या दिसायला लागतात. तुमचे पाय अचानक तुम्हाला सांगतात कि बाई थन्डी आहे कारण पायात फक्त स्लीपर असते. किल्ली घरातच राहिल्याच्या विचाराने तुम्हालाही थन्डीची जाणीव होते. 

मग विचार येतो इथून मॅगी काकूंना आवाज देऊ त्या गॅलरीत येतील आणि बिल्डिंगच दार उघडतील; कमीतकमी बिल्डिंगच्या आत तरी जाऊ. पण काकू कदाचित बाहेर गेलेल्या असतात. मग तुम्ही बिल्डिंगच्या खाली येऊन मैत्रिणीच्या घराची बेल वाजवता तर तीही घरात नसते. आता जीवाची नुसती किल्ली किल्ली व्हायला लागते. तरीही तुम्ही एक दोन ओळखीच्या लोकांच्या घरची बेल वाजवता पण पुण्यातल्या सारखं इथेही एक ते चार संचारबंदी असते. कोणीही उत्तर देत नाही. एव्हाना थन्डीनी पाय गारठून गेलेले असतात. दुसरी किल्ली संध्याकाळी ७ पर्यन्त तरी घरी येणार नाहीये हे कळून चुकतं त्यात लेक शाळेतून आल्यावर तो जे काय चार प्रेमाचे शब्द बोलेल तेही डोक्यात येतात. असे लाखो विचार तुमच्या डोक्यात किल्ली करत असतात... म्हणजे डोक्यात कल्ला करत असतात.

तेवढ्यात एक कुरियरवाले काका कोणाचं तरी कुरियर घेऊन येतात आणि तुमच्याकडे विचित्र नजरेने बघतात. त्यांनी ज्या कोणाचं कुरियर आणलंय ते बिल्डिंगचं दार उघडतात आणि तुम्ही पटकन त्यांच्या मागोमाग आत जाता तर कुरियर काका तुम्हाला हटकतातच "इथेच राहता का तुम्ही?" तुम्हीही तोऱ्यात सांगता हो म्हणून. ते निघून गेल्यावर पुन्हा आता काय? हा प्रश्न तुमच्या समोर किल्ली करत असतो.. म्हणजे नाचत असतो.

मग तुम्ही ठरवता कि आपल्या घराच्या मजल्यावरच्या पायऱ्यांवर बसुया आणि मॅगी काकू आल्या कि ह्यांना फोन करू. पण तुम्हाला जाणीव होते कि तुम्हाला ह्यांच्या फोन नंबर मधले २-४ आकडेच आठवत आहेत, पूर्ण नम्बर चक्क पाठ नाहीये. किस जनम का बदला ले रहे हो भगवान? असे विचार पुन्हा डोक्यात किल्ली करत असताना तुम्ही लिफ्टच्या बाहेर येता आणि तुमच्या घराच्या दारात असलेल्या पायपुसण्यावर घराची किल्ली तुमच्याकडे बघून वाकुल्या दाखवत असते. मॅगी काकूंना टाळायच्या गडबडीत किल्ली जॅकेटच्या खिशात न जाता पायपुसण्यार पडलेली असते. तिला प्रेमाने हातात घेऊन, कुलूप उघडून आत आल्यावर तुम्ही आधी जॅकेटच्या खिशात २ युरोचं नाणं ठेवता आणि मग ह्यांचा फोन नम्बर घोटून घोटून पाठ करता.

पण ते काहीही असो मॅगी काकु जवळपास असल्या कि मला पोस्ट लिहायला विषय मिळतोच!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही